इंडिया फायनल मारायच्या तयारीत होती मात्र कपिल देवची बायको ग्राउंडच सोडून गेली

१९८३ चा क्रिकेट वर्ल्ड कप. भारतीयांचा क्रिकेटकडे आणि जगाचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन  बदलणारा वर्ल्ड कप. कपिलदेवच्या टीमनं कुणाच्या ध्यानी मणी नसताना फायनलमध्ये धडक मारली होती. भारतच्या फायनलमध्ये पोहचण्याला लोक मात्र मजाकमध्ये घेत होते. कारण पण तसच होतं. भारतासमोर टीम होती वेस्ट इंडिजची. वेस्ट इंडिजची बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही टॉप क्लास. त्यात १९७५ आणि १९७९ असे पहिले दोन्ही वर्ल्ड कप क्लाइव्ह लॉयडच्या नेतृत्वखाली वेस्ट इंडिज संघानं जिंकले होते.

आता सलग तिसऱ्यांदा लॉयडनं लॉर्ड्सवर वर्ल्ड कप उचल्याणाची औपचारिकताच बाकी असल्याचं बोललं जात होतं.

फायनलची सुरवात पण लोकं जसा विचार करत होते तशीच झाली. अवघ्या दोन रन असतानाच  भारताची पहिली विकेट पडली.

सुनील गावसकर  फक्त २ रन करून परतल्यांनंतर भारताच्या डावाला जी गळती लागली ती भारताची पूर्ण टीम १८३वर ऑल आऊट होईपर्यंत थांबलीच नाही.

मेसर्स मार्शल, गार्नर, होल्डिंग आणि रॉबर्ट्स या वेस्टइंडीजच्या बॉलर्सनी आपलं काम चोख बजावलं होतं.

गॉर्डन ग्रीनिज, व्हिव्हियन रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉयड यांसारखे धुरुंधर बॅट्समन असलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाला हे १८३ रणांचं टार्गेट  आरामात पार करण्यासारखं होतं. 

त्यातही व्हिव्हियन रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉयड यांना या आधीच्या वर्ल्डकप फायनल्समध्ये शतकं मारण्याचा अनुभव.

लॉर्ड्सवर भारतीय प्रेक्षकांत सन्नाटा पसरला होता. आता फायनलची मॅचची तिकिटंपण महाग त्यामुळं मॅच मधेच सोडून जाता पण येईना. मग काहीतरी चमत्कार होईल आणि भारत मॅच जिंकेल या आशेवर प्रेक्षक मॅच बघत बसले होते.  

भारतीय खेम्याबरोबर गेलेल्या क्रिकेटपट्टुंच्या बायकांचे चेहेरेही स्कोरबोर्डवर लागलेली १८३ची टोटल बघून पडले होते.

 कपिल देव यांच्या पत्नी रोमी देवही आता पराभव निश्चित आहे असा विचार करून वैतागून गेल्या होत्या.

भारताचा पराभव त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहायचा नव्हता. मग त्यांनी लॉर्ड्स वरून निघून तडक हॉटेल गाठायचं ठरवलं. भारताचं जे काय होईल ते आपल्या डोळ्याआड होईल असा विचार करून त्यांनी स्टेडियम सोडलं.

‘अजून मॅच बाकी आहे . वाटल्यास दरवाज्यावर थांबून बघा’ असं  स्टेडिअमचा वॉचमन त्यांना सांगत होता. 

मात्र रोमी देव यांनी आपलं मन बनवलं होतं. त्यांना तिथे क्षणभरही थांबण्याची इच्छा नव्हती. तिथेच उभ्या असलेल्या मैत्रणीला आपले तिकीट देउन त्या हॉटेलवर परतल्या. 

गॉर्डन ग्रीनिज अवघ्या एका धावेवर परतूनही वेस्टइंडीज ला काही फरक पडला नव्हता. त्यांनतर आलेला व्हिव्हियन रिचर्ड्स मात्र भारतीय बॉलर्सची नुसती पिसं  काढत होता. 

मदनलालला लागोपाठ दोन फोर मारल्यानंतर त्याच्या बायकोलापण तिथं बसवेना. आपल्या मैत्रिणीला तिकीट देऊन मदनलालची बायकोपण हॉटेलवर परतली.  आता रोमी आणि मदनलालची बायको दोघी हॉटेलवर आल्या होत्या. मात्र दोघांच्याही मनात ग्रॉऊंडवर काय चाललं असेल याचीच दगदग चालू होती. शेवटी त्यांनी आपला हॉटेल मधला टीव्ही चालू केला.

कपिलदेवनं मदनलालच्या बॉलिंगवर  व्हिव्हियन रिचर्ड्सचा कॅच घेतला. आणि त्या आयकॉनिक कॅचनं आता मॅचचं रुपडंच पालटलं. 

हळूहळू सामना आता भारताच्या बाजूनं झुकला होता. वेस्टइंडीजचे सहा खेळाडू आता बाद झाल्यानंतर आपण आता मैदानावर जावं असं या दोघींना वाटू लागलं. पण त्यांना आता लॉर्ड्सवर पोहोचणं शक्य नव्हत. त्यामुळं त्यांना टीव्हीवरच भारताला जिंकताना पाहणं भाग पडलं.

मायकेल होल्डिंगची अमरनाथानं विकेट काढली आणि या दोघींनी हॉटेलमध्ये एकच कल्ला सुरु केला.

एवढा दंगा चालला होता कि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना नक्की २०२ रूम मध्ये काय चाललयं तेच कळेना. शेवटी न राहवून हि कामगार मंडळी काय चाललंय हे पाहण्यासाठी वर आली. वर येऊन पाहतात तर काय या बायांनी नुसता बाजार मांडलेला. या दोन बायका पलंगावर बेफाम उड्या मारत होत्या. 

शेवटी काय तर भारताचा ऐतिहासिक विजय त्यांना ‘याची देही याची डोळा’ पाहता आला नव्हता. मात्र टीव्हीवर त्यांनी या विजयाचा पुरेपूर आनंद घेतला होता.  

 हे हि वाच भिडू 

      

  

Leave A Reply

Your email address will not be published.