ती चूक केली नसती तर आज तो कमीतकमी ८० हजार कोटीचा मालक असता !

आता चुका कोण करत नाही ओ? आम्ही पण एकेकाळी इंजिनीअरींग सोडून एमपीएशशी करायचा निर्णय घेतलेलाच. अजून बाप आठवल तस शिव्या घालतो. प्रत्येकजण चुका करत असत्यात. आणि अरिजितसिंगची गाणी ऐकत पश्चाताप करत बसत्यात.

अशीच एक चूक एका माणसाने केला ती चूक त्याला १ लाख कोटी रुपयाला पडली. नाव रोनाल्ड वेन.

तर हे रोन्या होतं अमेरीकेतल्या ओहायो प्रांताचं. शिक्षणाने टेक्निकल ड्राफ्ट्समन. म्हणजे एक प्रकारचं इंजिनियरिंगच. डिझाईनिंग वगैरे वगैरेचा हा महारथी. वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वप्ननगरी लॉस एंजलिसला आला.

आल्या आल्या तारुण्याचा जोश होता. नोकऱ्या केल्या, तुफान पैसा कमावला. यामुळे आलेल्या कॉन्फिडन्समध्ये आंत्रप्र्युनर व्हायचं स्वप्न बघितलं. तावातावाने पहिल्याच फटक्यात एक स्लॉट मशीन बनवणारी कंपनी उघडली. उघडली म्हणता म्हणता बंद पडली. त्याला डिझाईनची अक्कल होती मात्र बिझनेस सेन्स नव्हता.

गडी मग खाली मान घालून अटारी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला. आता चाळीशीत आलेला रोनाल्ड तिथे internal corporate documentation systems बनवायचा. तस तो तिथं व्यवस्थित सेटल झाला.

रोन्याची इथं गाठ दोन स्टीव्ह नावाच्या पोरांशी पडली. त्यातलं एक होत ते टेक्निकली हुशार होतं. कॉम्प्युटरबरोबर खेळणे वगैरे त्याचे छंद. दुसरा स्टीव्ह पण नर्डच होता पण ते बेणं जास्तच हुशार होतं.

पहिल्याच नाव स्टीव्ह वाजनियाक तर दुसरा स्टीव्ह जॉब्ज. बारा गावचं पाणी पिऊन आलेलं स्टीव्ह जॉब्स रोज एक आयडिया सांगायचं. कधी शेक्सपियर वर बोलणारा कधी गांजाचे महत्व सांगणारा तर कधी इलेक्ट्रॉनिक जगात काय काय चमत्कार करू शकता येईल या वर प्रवचन देणारा स्टीव्ह आणि त्याच भक्ती भावाने ऐकणारे वाजनियाक आणि रोनाल्ड वेन या तिघांचा ग्रुप चांगलाच जमला होता.

या स्टीव्ह जॉब्जच्या चाप्टरपणाची गोष्ट सांगायची झाली तर एकदा त्याने आणि वाजनियाकने एका गेमसाठी सर्किट बोर्ड डिझाईन केलेलं. त्यासाठी अटारी कंपनीने त्यांना ५००० डॉलर बोनस दिला पण जॉब्जने त्याला आपल्याला फक्त ७०० डॉलर मिळाले म्हणून सांगितलं. जॉब्जची हि स्कीम कळायला वाजनियाकला दहा वर्षे लागली.

वेन पेक्षाही ही दोन्ही कार्टी किती तर पटीने लहान होती पण त्यांच्यात असलेलं टॅलेंट वेनला दिसत होतं.

एकदा त्याने या दोन्ही स्टीव्ह ना घरी जेवायला बोलावलं. नेहमी प्रमाणे भाषण ठोकता ठोकता स्टीव्ह जॉब्जने आपली स्वतःची कॉम्प्युटर कंपनी सुरु करायची कल्पना मांडली. वाजनियाक त्यांच्यासाठी कॉम्प्युटर बनवणार, जॉब्ज आपलं मार्केटिंग स्किल वापरून ते विकणार अशी डील होती. दोघ ४५-४५% शेअर्सचे मालक होणार होते.

वेनला या भागीदारीत १० % द्यायचं ठरलं. कारण काय माहिताय ? तर वेन या दोघांच्या पेक्षा वयाने मोठा आहे, जास्त समजूतदार आहे, जर उद्या दोन्ही स्टीव्हची भांडणे झाली तर वेनचा शब्द फायनल.

वेनने स्वतः या कंपनीचे पार्टनरशिप ऍग्रिमेंट बनवले आणि १ एप्रिल १९७६ ला ही कंपनी अस्तित्वात आली.

याला नाव देण्यात आलं होतं अ‍ॅपल कॉम्प्युटर्स.

एप्रिल फुल डे च्या दिवशी कंपनी सुरु करणारी ही माणसं किती उलट्या डोक्याची असतील याची कल्पनाच केलेली बरी. रोन्याने त्यांच्यासाठी कंपनीचा पहिला लोगो बनवून दिला. वाजनियाकने बनवलेल्या पहिल्या अ‍ॅपल कॉम्पुटरचा मॅन्युअल देखील रोनाल्डनेच बनवलेलं.

वाजनियाकने कॉम्प्युटर बनवला आणि जॉब्जने सांगितल्या प्रमाणे गिऱ्हाईक देखील आणलं. द बाइट शॉप नावाच्या कंपनीला त्यांना कॉम्प्युटर बनवून द्यायचे होते. यासाठी भांडवल लागणार होतं. जॉब्जने खटपट करून १५ हजार डॉलरच लोन देखील उभं केलं.

इथंच रोनाल्ड रावांची टर्र्कन फाटली.

या आधी पाच वर्षांपूर्वी केलेल्या धंद्यात त्याला मोठं नुकसान उचलायला लागलेलं. मान मोडून ते कर्ज फेडलं होतं आणि जॉब्जने आणखी एक मोठं कर्ज पहिल्याच आठवड्यात घेतलं आणि बाईट शॉपचा रेप्युटेशन बघता ते कधी बिलाचे पैसे लवकर देत नाहीत हा इतिहास होता. उद्या जरा पेमेंटला पुढं माग झालं तर सगळं कर्ज आपल्या उरावर येऊन बसणार असा समज रोनाल्ड वेनचा झाला.

याला कारणही होतं, स्टीव्ह जॉब्ज-स्टीव्ह वाजनियाक हि दोघंही बॅचलर, फाटकी मंडळी. त्यांचं वय होत वीस-पंचवीस. त्यांना काय फरक पडणार नाही ओ, नुकसान झालं तर आपलं घरदार विकलं जाणार याचा अंदाज रोनाल्ड वेनला आला. शिवाय स्टीव्ह जॉब्ज किती चाप्टर आहे याचा देखील त्याला अंदाज आलाच होता.

या पोरांची संगत वाईट रे बाबा असं म्हणत रोनाल्ड राव कंपनी स्थापन झाल्याच्या बरोबर बाराव्या दिवशी रजिस्ट्रार ऑफिस मध्ये गेले आणि आपलं नाव अ‍ॅपलच्या पार्टनरशिप मधून काढून घेतलं. १२ एप्रिल १९७६ रोजी स्टीव्ह जॉब्जने त्याला १० %च्या  शेअर्सच्या बदल्यात ८०० डॉलर दिले.

मिडलक्लास मेन्टॅलिटी पकडून गडी परत अटारी कंपनीत नोकरीला आला.

तिथं परत मान मोडून काही वर्ष काम केलं, दोन वर्षांनी पगार वाढीसाठी स्विच केलं, अशा दोन चार कंपन्या फिरला.मग स्वतःच एक स्टॅम्प विकणारी कंपनी सुरु केली. याच नाव होतं Wayne’s Philatelics आणि याचा लोगो पण अ‍ॅपलच्या सुरवातीच्या लोगो सारखाच होता.

त्याच हे चाललं होतं आणि तिकडे अ‍ॅपल हळूहळू कॉम्प्युटर जगात धुमाकूळ घालायला सुरवात देखील केली होती. १९८५ मध्ये स्टीव्ह वाजनियाक पण कंपनीतून बाहेर पडला होता.

दरम्यानच्या काळात स्टीव्ह जॉब्जने रोनाल्डला त्याच्या एका मित्राची कंपनी विकत घ्यायची आहे त्याच डील करून दे म्हणून सांगितलं, तो बऱ्याचदा रोनाल्डला परत देखील बोलवायचा पण वेन तयार झाला नाही. इतकंच नाही तर अ‍ॅपलची ऑर आपल्या मित्राला देखील सांगितली नाही.

स्वतःच्या पायावर धोंडा तर मारलाच पण मित्राच पण कोट्यवधींचा नुकसान केलं.

लोकं शेअर मार्केट मध्ये गंडतात, प्रेमात गंडतात, परीक्षेत गंडतात, लई लई चार दिवस रडून मोकळं होता येतंय. पण इथं रोनाल्ड वेन नामक माणूस आपले अ‍ॅपलचे १० % शेअर्स विकून किती नुकसान करून घेतला माहित आहे?

आजच्या भाषेत हिशोब काढू. साधारण आज अ‍ॅपलची बाजारपेठेतली किंमत दोन लाख कोटी डॉलर्सच्या वर आहे. साधारण एक डॉलर म्हणजे ७४ रुपये पकडलं तर सगळं हिशोब केला तर रोनाल्डच्या वाटणीला कमीतकमी ८० हजार ते १ लाख कोटी रुपये आले असते.

बर ते जाऊ द्या, तुम्ही म्हणाल कि ते नशीब असतंय. पण मध्यंतरी एकदा रोनाल्ड रावांनी एका माणसाला अ‍ॅपलचा पहिला ऍग्रिमेंट केलेला पेपर ज्यावर स्टीव्ह जॉब्ज, वाजनियाक आणि त्याची स्वतःची सही होती तो ५०० डॉलरला विकला.

त्या साध्या कागदाची २०११ साली एका लिलावात १.६ मिलियन डॉलर एवढी रक्कम आली आहे. म्हणजे रुपयाच्या भाषेत ११ कोटी रुपये.

आता तुम्ही सांगा किती वेळा नशिबाला दोष देणार?

आता रोनाल्ड साहेब रिटायर झाले आहेत. एका छोट्याशा घरात राहतात, अजूनही स्टॅम्प विकणे, दुर्मिळ नाणी विकणे हा उद्योग छोट्या प्रमाणात का असेना सुरु आहे. वय सध्या ८४ असेल.  अधूनमधून कुठल्यातरी डॉक्युमेंट्री मध्ये झळकत्यात. गडी मनातून किती जरी शिव्या बाहेर येत असल्या तरी जे झालं ते चांगलं झालं असच सांगत राहतोय.   

एवढ्या वर्षात त्यांनी एकही अ‍ॅपलच प्रॉडक्ट घेतलं नव्हतं. परवडलं नसेल किंवा खुन्नस म्हणून घेतलं नसेल माहित नाही. पण मध्यंतरी एक आय पॉड विकत घेतला आणि ही शपथ मोडली.

टिपिकल पुणेरी पेन्शनर म्हाताऱ्यांप्रमाणे त्यांनी एक आपल्या जीवनावर एक पुस्तक देखील लिहिलं, कितीजणांनी वाचलं माहित नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.