31st चं सेलिब्रेशन सोडा, गोव्यात रोनाल्डोच्या पुतळ्यावरुन राडा सुरू आहे
दुपारी जरा लोकांच्या इंस्ट्राग्राम स्टोऱ्या बघावं म्हणलं, तर निम्मी दुनिया सध्या गोव्यात आहे. सेलिब्रेटी म्हणू नका, शाळेतले मित्र म्हणू नका… प्रत्येकाच्या स्टोरीला एकच विषय आहे… गोवा!
आता निम्मी दुनिया तिकडं एन्जॉय करतीये, यामागे पण एकदम सिंपल कारण आहे. कसंय वर्ष संपत आलंय, त्यामुळे ३१ डिसेंबरला जल्लोष करायला हवाच आणि जल्लोष करायला गोव्यासारखं ठिकाण दुसरं कुठलंच नाही. त्यामुळं गोव्यातले बिचेस, हॉटेल ३१ डिसेंबरच्या दरम्यान भरभरुन वाहत असतात.
गोवा म्हणजे काय फक्त सुंदर बिच, बिकिनी घालणाऱ्या ललना, शर्टलेस बापे, किल्ले, चर्च एवढंच नाही. तिकडं लय बाप जेवण मिळतं, दारुचा तर मुद्दाच नाही आणि हा तिकडचा सगळ्यात फेमस खेळ आहे फुटबॉल. गोव्याच्या बीचवर, घरांच्या अंगणात आणि मैदानात कुठेही फुटबॉल खेळणारे भिडू तुम्हाला शंभर टक्के दिसतात.
इथली पोरं सचिन तेंडुलकरला देव मानत नाहीत, बॅट झाल्यावर रडून गोंधळ घालत नाहीत, इकडं पोरांचं प्रेम आहे फुटबॉलवर. सगळ्या जगात असणारा रोनाल्डो भारी की मेस्सी हा वाद गोव्यातही आहेच. पण इथली जनता रोनाल्डोला थोडं झुकतं माप देते. या मागचं कारण म्हणजे, गोव्यावर कित्येक वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं. सीआर 7 पण पोर्तुगालचा, त्यामुळं आमचं काळीज म्हणत त्याची जरा जास्त फॅन फॉलोईंग गोव्यामध्ये आहे.
आता भावाची फॅन फॉलोईंग आहे, म्हणल्यावर कायतर खळबळ झाली पाहिजे असं तिथल्या एका नेत्याला वाटलं. त्यामुळं ठरलं की, गोव्यात रोनाल्डोचा पुतळा बांधावा. आलं मनात केलं क्षणात म्हणत पुतळा उभा राहिला आणि त्याचं थाटात उद्घाटनही झालं. कलंगुट गावातल्या एका बागेत हा ४०० किलोचा पुतळा उभारण्यात आला आहे.
हा पुतळा उभा करण्यामागं नेमका थॉट काय आहे?
तर स्थानिक आमदार आणि गोव्याचे बंदर मंत्री मायकल लोबो म्हणाले, ‘एवढी जास्त लोकसंख्या असूनही आपला भारतीय फुटबॉल संघ लहान देशांच्या संघांना हरवण्यात अपयशी ठरतो. गोव्याला आणि भारताला फुटबॉलमध्ये ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंसाठी चांगली मैदानं, चांगले प्रशिक्षक आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. भारतात पहिल्यांदा रोनाल्डोचा पुतळा उभा राहिला आहे. लाडक्या फुटबॉल खेळाला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी हा पुतळा गोव्यातल्या तरुणांना प्रेरणा देईल. जे लोक या रोनाल्डो पार्कमध्ये येतील त्यांना देशासाठी खेळण्याची प्रेरणा मिळेल.’
पण या पुतळ्यावरुन गोव्यात राडा होतोय. काही स्थानिक लोकांचा या पुतळ्याला विरोध आहे. काहींनी पुतळ्याजवळ जमून काळे झेंडे दाखवत निदर्शनं केलीयेत. विरोध करणाऱ्या स्थानिक लोकांपैकी महत्त्वाचं नाव म्हणजे, वर्ल्ड फेमस टिटोज नाईट क्लबचे मालक रिकार्डो डिसुझा.
डिसुझा अंकल म्हणाले, ‘समीर नाईक, ब्रुनो काँटिन्हो अशा स्थानिक खेळाडूंचे पुतळे उभारण्याचं सोडून रोनाल्डोचा पुतळा उभारण्यात आल्यानं मी प्रचंड निराश झालो आहे. आपल्या आयकॉन खेळाडूंचा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे.’
दुसऱ्या बाजूला काही लोकांनी रोनाल्डो हा पोर्तुगीज खेळाडू असल्यानं त्याच्या पुतळ्याला विरोध केला आहे. ‘गोव्यावर प्रदीर्घ काळासाठी पोर्तुगीजांनी राज्य केलं. असं असूनही त्यांच्याच खेळाडूचा पुतळा उभा करणं हा गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्यांचा अपमान आहे. गोव्याच्या स्वातंत्र्याला ६० वर्ष पूर्ण होत असताना हे घडणं दुर्दैवी आहे,’ असं आंदोलकांचं म्हणणं आहे.
थोडक्यात काय, तर सेलिब्रेशन राहिलं बाजूला आणि फुटबॉल सुपरस्टारच्या पुतळ्यावरुनच खडाजंगी सुरू झालीये. तुम्ही गोव्यात असाल आणि फुटबॉल फॅन असाल तर एकदा पुतळा बघून यायला विसरू नका. उद्या काय बॅन-बिन लावला तर बघायचं राहायला नको.
हे ही वाच भिडू:
- रोनाल्डो असो वा मेस्सी सगळेच पितात शाहूची लस्सी….
- पाच वर्षाचे युद्ध संपवणारे ड्रोग्बाचे ते पाच गोल…
- जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि आमच्या फेल झालेल्या गोवा प्लॅनला आज ९ वर्ष पूर्ण झाली