हॉलिवूडमध्ये गाजलेल्या जंगल बुकचं बीज मुंबईत रोवलं गेलं होतं.

जगात आपण सगळं विसरू शकतो पण नॉस्टॅल्जीक गोष्टी आपली पाठ सोडत नाही. आता नॉस्टॅल्जीक गोष्टी बऱ्याच आहेत पण टीव्ही वर लागणाऱ्या मालिका हा लोकांसाठी एकेकाळी उत्सव होता. टीव्ही मालिका म्हणजे आताच्या ज्या सुरु आहेत त्या मुळात मालिका आहेत कि नाही हा प्रश्न आहे. पण आज आपण जंगल बुक भारतात तयार झालाय त्याचा किस्सा जाणून घेणार आहोत.

टीव्हीवर लागणारी मोगली सिरीयल तर सगळ्यांचा जीव कि प्राण होती. लहान लेकरं सोडा अगदी घरादारातले म्हातारे सुद्धा ती सिरीयल बघायचे. रानावनात झाडांवरून उड्या मारणारा मारणारा मोगली कैक लोकांच्या अजूनही चांगलाच स्मरणात आहे. 

गुलजार साहेबानी या मोगली सिरीयलसाठी गाणं लिहिलं होतं,

‘ जंगल जंगल बात चली हे पता चला हे, चड्डी पहन के फुल खिला हे ‘

हे गाणं त्याकाळच्या लहान मुलांचं राष्ट्रगीत होतं. अगदी घरातल्या आयाबायासुद्धा पोरांना हे गाणं घरी शिकवायच्या इतकं ते लोकप्रिय झालं होतं.

हि मोगलीची सिरीयल जगप्रसिद्ध पुस्तक ‘ दि जंगल बुक ‘ मधील कथानकावर आधारलेली होती. या पुस्तकाचा जगप्रसिद्ध लेखक ‘ रुडयार्ड किपलिंग ‘ हा नोबेल पारितोषिक विजेता महान साहित्यिक होता. आता रुडयार्ड किपलिंग आणि जंगल बुक हे जगाला माहिती झालं असेल पण तुम्हाला हे माहिती नसेल कि हा रुटयार्ड किपलिंग मुंबईत जन्माला आला आणि मुंबईपासूनच त्याच्या डोक्यात जंगल बुकचं बीज पेरलं गेलं.

आता मुंबईत रुटयार्ड किपलिंग जन्माला आला तो म्हणजे सीएसटी स्टेशनजवळच्या जेजे स्कुल ऑफ आर्टच्या आवारात. तो वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तिथंच वाढला पण त्याच्या मनात मुंबई कायमचीच कोरली गेली. मुंबईत जन्म झाला त्याला त्याचा इतका आनंद झाला होता कि त्याने मुंबई शहरावर कविता लिहिली होती. जगभर किपलिंग फिरला पण मुंबईच वर्णन करताना तो म्हणतो,

MOTHER OF ALL CITIES TO ME, FOR I WAS BORN IN HER GATE.

जेजे स्कुलमध्ये आजही किपलिंगच्या स्मारकाचा फलक आहे. जंगल बुक मधील प्राण्यांचे नाव जर आपण बघितले तर

बघिरा ( काळा चित्ता ), शेरखान ( बंगाल टायगर ), रक्षा ( मोगलीला सांभाळणारी आई लांडगी ), अकेला ( लांडगा ), दर्जी, हाथी असे अनेक प्राणी त्यात होते.

हि नाव भारतीय असण्याचं कारण म्हणजे हि पात्र लिहिताना किपलिंगच्या डोळ्यांपुढे भारतीय प्राणिसृष्टी होती.

आता किपलिंग भारतीय प्राण्यांकडे आकर्षित कसा झाला तर त्याचे वडील जॉन लॉकवुड हे शिल्पकार आणि चित्रकार होते. १८९० साली ब्रिटिशांनी एक कायदा पास केला तो कायदा होता प्राण्यांना कायद्याने क्रूरतेने वागविण्यास बंदी करणारा. हा कायदा भारतात नव्हता.

जॉन लॉकवुड यांनी त्या कायद्याचा संदर्भ देत भारतातले प्राणीपक्षी या विषयावर BEAST AND MAN IN INDIA नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकात १०० प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे आहेत. त्यातले ७२ चित्रे हि स्वतः जॉन लॉकवुड किपलिंग यांनी काढली आहे. या पुस्तकात प्राण्यांची सर्वांगीण चर्चा आहे. 

आता किपलिंग एवढी माहिती असल्यावर रुटयार्डने जंगल बुक लिहिलं यात नवल वाटण्याजोगं काही नाहीए. किपलिंगने हे प्राणी पक्षी सगळे एका कथेत गुंफले तेही अस्सल भारतीय नावं देऊन. मोगलीची पाळंमुळं हि मुंबईतून जगभरात वाढली गेली.

रुटयार्ड किपलिंग त्याच्या SOMETHING OF MYSELF FOR MY FRIENDS KNOWN AND UNKNOWN नावाच्या आत्मचरित्रात मुंबई बद्दल लिहिताना म्हणतो, त्यातल्या पहिल्याच प्रकरणाची ओळ आहे कि,

give me the first six years of a childs life and you can have the rest.

यातून किपलिंगला मुंबई किती प्रिय होती हे दिसून येतं. पुढे तो म्हणतो कि तिथे एक मिता नावाची हिंदू बाई मला सांभाळायला होती जी मला मंदिरात घेऊन जायची. प्रार्थना करायला शिकवायची. गोष्टी सांगायची.

जंगल बुकचा शोध खऱ्या अर्थाने मुंबईत लागला आणि आज आपण हॉलिवूडमध्ये त्याचं भव्य दिव्य रूप पाहत आहोत. रुटयार्ड किपलिंगने त्याच्या गोष्टीतील पात्रांची नाव अस्सल भारतीय बाजातली दिली जी फॉरेनमध्येही लोकप्रिय झाली. मुंबईचा मोगली आता चित्रपटाच्या रूपाने जगभर धुडगूस घालताना आपल्याला दिसतो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.