प्रायव्हेट फोटोज, भ्रष्टाचार आणि बरंच काही… IAS आणि IPS ऑफिसरमध्ये जुंपलीये

कर्नाटकात वातावरण तापलंय. तसं आपल्याकडचं पण वातावरण तापलेलंच आहे पण आपल्याकडं राजकीय राड्यांमुळं तापलंय. तिकडचं वातावरण तापलेलं असण्यामागचं कारण मात्र वेगळंय. कारण काय ते पुढं बघुया… पण हे वातावरण इतकं तापलंय की, थेट राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्यापासून ते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना या प्रकरणात लक्ष घालावं लागलंय.

प्रकरण कसलं ओ? राडा म्हणलं तरी चालतंय. पण हा राडा काय कुणी भाई-गुंड या लोकांनी केलेला नाहीये. तर, सोशल मीडियावर सुरू झालेलं दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचं हे प्रकरण आहे. बरं दोन्हीही महिला अधिकारी आहेत.

यातल्या रूपा दिवाकर मौदगिल या आयपीएस अधिकारी आहेत तर, दुसरं नाव म्हणजे रोहिणी सिंधुरी. रोहिणी  या आयएएस अधिकारी आहेत. आता यांचं नेमकं काय मॅटर झालाय?

तर, आयपीएस असलेल्या रूपा यांनी रोहिणी यांचे काही पर्सनल फोटोज हे आपल्या फेसबूक पेजवर शेअर केले… हे फोटोज शेअर करताना त्यांनी रोहिणी यांच्यावर काही आरोपही केलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, हे फोटोज रोहिणी यांनी पुरूष आयएएस अधिकाऱ्यांना पाठवले होते. हे फोटोज पाठवून त्यांनी Civil Services Conduct चं उल्लंघन केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. हे फोटोज पोस्ट करण्याच्या आदल्या दिवशी रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले होते.
हे झालं रुपांनी केलेल्या आरोपांबद्दल…

यानंतर सिंधुरी यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिलीये. शिवाय,

“ते फोटोज हे रुपा यांनी सोशल मीडियावरून मिळवलेले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचे स्क्रीनशॉट्स काढून ते फोटोज त्यांनी पोस्ट केलेत. त्यांच्या आरोपात काहीह तथ्य नाहीये”

रुपा यांनी वैयक्तिक राग मनात ठेऊन हे आरोप केले असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. तर, रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर केलेल्या Civil Services Conduct उल्लंघनाचेच आरोप सिंधुरी यांनी रुपा यांच्यावर केलेत.

“मानसिक आजार ही एक मोठी समस्या आहे, त्यावर औषधोपचार आणि समुपदेशनाद्वारे लक्ष देणे गरजेचं आहे. जेव्हा जबाबदार पदांवर असलेल्या लोकांवर त्याचा परिणाम होतो तेव्हा ते अधिक धोकादायक बनतं. रूपा IPS माझ्या विरोधात खोट्या, वैयक्तिक बदनामी मोहीम चालवत आहेत.” असं म्हणत सिंधुरी यांनी रूपा यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचं म्हटलंय.

दरम्यान या सगळ्या प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी लक्ष घातलंय. या प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले,

“आम्ही शांत बसलेलो नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्या दोघीही एवढ्या वाईट पद्धतीने वागतायत. अगदी रस्त्यावरच्या भांडणात सामान्य लोकही अशा पद्धती बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक मुद्द्यांवर वाट्टेल ते करू द्या, पण माध्यमांसमोर येताना, माध्यमांमध्ये व्यक्त होताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.”

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, “मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी अधिकाऱ्यांना शिस्त राखण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललोय. त्यांनी आपल्या तक्रारी लेखी दिल्या आहेत. मुख्य अधीक्षक याचा आढावा घेत आहेत.”

आता या दोन्ही लेडी ऑफिसर्स चर्चेत आहेत. पण या दोघींनाही माध्यमांच्या हेडलाईन्समध्ये राहायची तशी सवयच आहे. कधी चांगल्या तर कधी वाईट कारणांमुळे या दोघी चर्चेत असतात.

आधी ज्यांनी आरोप करत या प्रकरणाला सुरूवात केलीये त्या रूपा मौदगिल यांची कारकीर्द कशी राहिलीये आणि कशामुळं चर्चेत राहिलीये ते बघुया.

१) माजी मुख्यमंत्र्यांना अटक.

२००० च्या बॅचमधून आयपीएस झालेल्या रूपा या सध्या कर्नाटक राज्य हस्तकला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतायत. त्या पहिल्यांदा चर्चेत आलेल्या ते २००४. साली मध्य प्रदेश हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक केली होती.

या अटकेनंतर झालेल्या दंग्यात ६ जणांचा मृत्यू झाला असल्याचीही नोंंद आहे.

२) राष्ट्रपती पदक मिळवलं.

२०१६ साली त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. या पदकानंतर मग रूपा या विविध कारणांनी चर्चेत राहत गेल्या.

३) वरिष्ठांवर आरोप केले होते.

२०१७ साली त्यांची नियुक्ती कारागृहांच्या उपमहानिरीक्षक पदी करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकारी एच एन सत्यनारायण राव यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या विवेकानंदन कृष्णवेली शशीकला या तुरूंगात शिक्षा भोगत होत्या.
शशीकला यांना विशेष ट्रीटमेंट दिली जातेय असा आरोप त्यावेळी रूपा यांनी केला होता. ही ट्रीटमेंट एच एन सत्यनाराण राव यांच्या सांगण्यावरून दिली जातेय आणि तसं करण्यासाठी त्यांच्यात दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

यानंतर राव यांनी रूपाला तिने केलेले आरोप सिद्ध करण्यास सांगितलं आणि जसं सिनेमात सीनियरला नडणाऱ्या पोलीसाला ट्राफिक डीपार्टमेंटमध्ये टाकलं जातं तसं रूपा यांना कारागृह विभागातून काढून ट्राफिक विभागाच्या आयुक्त करण्यात आलं.

हे सगळं झालं तरी, रूपा यांनी  अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार दाखल केलीच होती. त्यानंतर राव यांनी मानहानीचा दाला दाखल केला होता. पण ही मानहानीची केस हाय कोर्टाने २०२२ मध्ये रद्द केली.

४) २०२२मध्ये पुन्हा वरिष्ठांशी वाद.

सेफ सिटी प्रोजेक्टसंदर्भात हा वाद होता या वादात झालं असं होतं की, वरिष्ठ अधिकारी हेमंत निंबाळकर यांनी रूपा यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांत त्यांनी म्हटलं होतं की, ‘सेफ सिटी प्रोजेक्टच्या टेंडरसंदर्भातली काही संवेदनशील माहिती मिळवण्याचा रूपा यांनी प्रयत्न केलाय. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी’ अशी मागणी केली होती.

यानंतर रूपा यांनी टेंडर संदर्भातली माहिती मिळवत असल्याचं कबूलही केलं होतं. पण ही माहिती त्यांनी टेंडरचा अभ्यास करण्यासाठी मिळवली होती असं स्पष्टीकरणही दिलं होतं.

५) अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप.

सध्या रूपा काम करत असलेल्या कर्नाटक राज्य हस्तकला विकास महामंडळामध्येच मागच्या वर्षी त्यांचा वाद झाला होता. या मंडळाचे अध्यक्ष असलेले राघवेंद्र शेट्टी आणि रूपा या दोघांनीही एकमेकांवर अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला होता.

दुसऱ्या बाजुला असलेल्या २००९ च्या बॅचच्या आयएएस रोहिणी सिंधूरी यांचाही इतिहास चर्चेत राहण्याच्या बाबतीत बराच मोठा आहे.

१) आयएएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येचं प्रकरण.

आयएएस अधिकारी डी के रवी यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणात सिंधूरी यांचं नाव पुढं आलेलं. त्यामागचं कारण म्हणजे डी के रवी यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सिंधूरी यांना बरेच मेसेजेस पाठवले होते.
या प्रकरणाची चौकशी थेट सीबीआय द्वारे करण्यात आलेली. २०१६ साली सीबीआयने त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली असल्याचं सांगत ही केस बंद केली.

२) काँग्रेस नेत्यांसोबत वाद.

कर्नाटकातल्या हसन या जिल्ह्यात उप-जिल्हाधिकारी असताना त्यांचं त्या जिल्ह्याचे प्रभारी असलेले आमदार ए मंजू यांच्याशी वाद झाले होते. काँग्रेस-जेडीएस चं सरकार आल्यानंतर त्यांंचं सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एच डी रेवन्ना यांच्याशी वाद झाले होते. ज्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली करण्यात आली.

३) सरकारी निवासस्थानाचं नुकसान केल्याचा आरोप.

त्यांची मैसूर इथे बदली करण्यात आली. इकडे उप-जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानात पूल बांधून त्या निवासस्थानाचं नुकास केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

४) कोरोनाकाळातही आरोप झालेले.

कोरोना काळात मैसूरपासून जवळ असलेल्या चामराजननगरमध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्या रुग्णांना वेळेत ऑक्सीजन सिलींडर मिळू शकले नाहीत आणि ते सिलेंडर तिथे नेण्यापासून सिंधुरी यांनी रोखले होते असे आरोप झाले होते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्ट आणि राज्य नियुक्त समितीने सिंधुरी यांना क्लीनचीट दिली.

५)गायक लकी अली याने आरोप केले होते.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध गायक लकी अली याने त्याच्या मैसूरमधल्या एका प्रॉपर्टीसंदर्भात सिंधूरी यांच्यावर आरोप केलेले. लकी अलीचं असं म्हणणं होतं की त्याच्या मैसूरमधल्या जमिनीचा भू-माफियांनी जबरदस्ती ताबा घेतलाय आणि या सगळ्यात भू-माफियांना सिंधूरी यांचं सहकार्य असल्याचाही आरोप लकी अलीने केला होता. तिच्याकडून मात्र हे सगळे आरोप फेटाळण्यात आले.

एकंदरीत बघितलं तर, रूपा आयपीएस आणि आयएएस सिंधूरी या दोघीही आजपर्यंतच्या आपल्या करीअरमध्ये सतत चर्चेत आणि वादात राहिलेल्या आहेत. आता या दोघी एकमेकींवर टीका करतायत आणि या प्रकरणाकडे थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलंय.

त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे मुख्य अधीक्षक लवकरच या सगळ्या प्रकरणाचा तपास पूर्ण करतील आणि या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे समोर येईल.

आता मात्र या सगळ्या राड्यामुळे, या दोन्ही अधिकाऱ्यांना पोस्टींग न देता त्यांची ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.