आर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.

रॉयल एन्फिल्ड बुलेट. फक्त भारतातच नाही तर जगातल्या मोटारबाईक्सचा महाराजा. फटफट आवाज करत भारदस्त बुलेट निघाली की रस्त्यावरील बाकीच्या गाड्या आदराने बाजूला होतात. भारतात आजवर अनेक गाड्या आल्या आणि गेल्या. येझडी जावा, यामाहा सारख्या गाड्यांबद्दल एक वेगळाच नॉस्टॅलजिया आपल्या मनात राहिला.

मात्र त्यांच्याही आधी आलेली गेली ऐंशी वर्षे जगावर राज्य करणारी बुलेट आपल्या धडधड करणाऱ्या आवाजात अजूनही आब राखून आहे.

ही खरं तर मूळची ब्रिटिश कंपनी. एकोणिसाव्या शतकात एका सायकल बनवणाऱ्या कंपनीचं  दिवाळं निघालं आणि बँकेने सेल्स मॅनेजर अल्बर्ट एडी, इंजिनियर रॉबर्ट वॉकर स्मिथ यांच्या हातात हि कंपनी सोपवली. पुढे त्यांना एन्फिल्ड या गावी असलेल्या ब्रिटिश आर्मीच्या शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या कारखान्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

यातूनच जन्म झाला रॉयल एन्फिल्ड कंपनीचा.

१९०१ साली पहिल्यांदा त्यांनी मोटरसायकली बनवण्यास सुरवात केली. पहिल्या महायुद्धात त्यांनी बनवलेल्या गाड्या ब्रिटिश रॉयल आर्मीसाठी वरदान ठरल्या. त्यांची विश्वासार्हता आणि मजबुती महायुद्धात तर उपयोगाला आलीच पण सामान्य जनतेतही त्याची क्रेझ निर्माण झाली.

याच रॉयल एन्फिल्डने १९३१ साली पहिल्यांदा बुलेट बनवली. आज आपण बघतो त्याच्यापेक्षा ही बुलेट थोडी वेगळी होती मात्र तेव्हा पासून आजवर टिकलेला जगातला हा एकमेव ब्रँड. रॉयल ब्रिटिश आर्मीने ३५० सीसी वाल्या हजारो गाड्या बुक केल्या. ३००० बुलेट तर फक्त एअरफोर्सला देण्यात आली.

बुलेट दुसऱ्या महायुद्धात प्रचंड गाजली. फक्त ब्रिटनमध्येच नाही तर त्यांची सेना जिथे जिथे लढली तिथे तिथे बुलेट पळत होती.

महायुद्धाच्या नंतर रॉयल एन्फिल्डने आपले पंख पसरण्यास सुरवात केली. बुलेटची निर्यात त्यांनी सुरु केली. भारत नव्यानेच स्वतंत्र झाला होता. अशातच आजच्या चेन्नईच्या मद्रास मोटार कंपनीने इंग्लंडमधून  या बुलेट गाड्या मागवल्या आणि त्याची विक्री सुरु केली.

के आर सुंदरन अय्यर आणि त्यांचा पुतण्या इ ईश्वरन या दोघांनी स्थापन केलेली हि मद्रास मोटार कंपनी. सुंदरम अय्यर एकेकाळी सायकल दुरुस्त करायचे. क्लार्क असलेल्या पुतण्याला हाताशी धरून त्यांनी कंपनी स्थापन केली. गाड्यांचं अफाट ज्ञान त्यांना होत. बुलेटच्या तर ते प्रेमातच होते. इंग्लंडमधून सायकली मागवून ते भारतात विकायचे. यातूनच त्यांनी बुलेटची देखील आयात करण्यास सुरु केली.

अशातच एकदा त्यांना भारतीय आर्मीकडून ३०० बुलेटची ऑर्डर मिळेल का अशी विचारणा झाली. सुंदरन अय्यर एका पायावर तयार होते पण आधी भारत सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार होती. 

भारतीय जवानांना बॉर्डरवर गस्त घालण्य्साठी मोटारसायकलींची आवश्यकता होती. आपल्याकडे काही मोटरबाईक्स होत्या मात्र राजस्थानच्या वाळवंटापासून ते काश्मीरच्या बर्फाळ पहाडावर दम टिकेल अशा या गाड्या नव्हत्या. आर्मीच्या सगळ्या कसोट्यांवर बुलेट खरी उतरत होती.

नेहरूंनी बुलेटला परवानगी दिली पण एकच अट  घातली.

“गाड्या मेड इन इंडियाचं असल्या पाहिजेत आणि त्या एखाद्या भारतीय कंपनीच्या सोबत जॉईंट व्हेंचर करून बनवल्या गेलेल्या असल्या पाहिजेत “

गेली दीडशे वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. या गुलामगिरीच्या काळात भारतात कोणतेही उद्योगधंदे उभे राहू शकले नाहीत. स्वातंत्र्यलढ्यातही लोकमान्य टिळकांच्या पासून स्वदेशी वस्तुंचा आग्रह सुरू होता पण कित्येक गोष्टींची निर्मिती भारतात होऊ शकत नसल्यामूळे अनेकांना मनात असूनही स्वदेशीचे सूत्र पाळता येत नव्हते.

या सगळ्या मुळे भारत हजारो वर्षांनी मागे पडला होता .

१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्य रात्री भारत देश स्वतंत्र झाला. गुलामगिरीच्या साखळदंडातून आपली मुक्तता झाली. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू अशा दूरदृष्टीच्या नेत्यांकडे कारभार आला. महात्मा गांधींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत बनवणे त्यांचं स्वप्न होत.

त्यानुसार अगदी सुईपासून ते अंतराळ यानापर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती भारतातच झाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेक उद्योगांची पायाभरणी केली. भारतीय आर्मी साठी लागणाऱ्या गाड्या आपल्या देशातच बनल्या जाव्यात हि त्यांची इच्छा असणे साहजिकच होते. परदेशी कंपनीला स्थानिक कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करायला लावण्या मागे आपल्या देशातील अनेकांना रोजगार सुद्धा मिळणार होता तर होताच शिवाय हि आधुनिक टेक्नॉलॉजी आपल्याला शिकता येऊन भविष्यात स्वदेशी कंपन्यांना गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात उतरणे सोपे जाणार होते. .

रॉयल एन्फिल्डने सगळ्या अटी मान्य केल्या. मद्रास कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करायचा करार केला.

एन्फिल्ड इंडियाचे ५१% शेअर्स सुंदरम यांच्याकडे आणि रॉयल एन्फिल्डकडे ४९% शेअर्स अशी वाटणी झाली. तेव्हाचे कॉमर्स मिनिस्टर टीटी कृष्णम्माचारी यांची सुंदरम यांच्याशी मैत्री होती त्यामुळे हा करार करताना ब्रिटिश कंपनीच्या तुलनेत भारतीय कंपनीला जास्त फेव्हर मिळाले.

१९५५ साली चेन्नई जवळ तिरुवायूरकुट्टी येथे कारखाना सुरु झाला. सुरवातीला इंग्लंडमधून येणाऱ्या बुलेटचे स्पेअर पार्ट जुळवून गाड्या बनत होत्या. पण १९६२ सालापर्यंत पहिली पूर्णपणे मेड इन इंडिया बुलेट तयार झाली.

भारतीय आर्मीने बुलेट क्लासिक ३५० सीसीच्या एकावेळी ५०० गाड्यांची ऑर्डर दिली. हा त्याकाळचा विक्रम होता.

तेव्हा पासून आजवर लाखो बुलेट या कारखान्यात तयार झाल्या आहेत. बुलेटचे १९५५चे मॉडेल जवळपास आजही तेच आहे. मधल्या काळात इंग्लंडमधली कंपनी बंद पडली, भारतातली कंपनी आयशर कंपनीने विकत घेतली.

गेल्या काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ लाल यांनी या रॉयल एन्फिल्डचे मॅनेजमेंट हातात घेतल्यापासून बुलेटने कट कातच टाकली. सेल्फ स्टार्ट वगैरे आधुनिक सोयी देऊन रांगड्या व्हिंटेज बुलेटला त्याने मॉडर्न बनवले. म्हणजे एकेकाळी गावाकडे धोतर फेटा घालणाऱ्या पाटलाच्या तालमीबाज पोराकडे धड धडणारी बुलेट आता मोठ्या शहरात सिक्स पॅक जिम मारणाऱ्या पोराकडे देखील दिसू लागली.

पिढ्या बदलल्या पण आजही बुलेटचे दीवाणेपण कमी होत नाही.

जगात हार्ले डेव्हिडसन आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या वजनी मोटरबाईक्स च्या स्पर्धेत रॉयल एन्फिल्ड बुलेट सुद्धा उठून दिसते. तिचा व्हिंटेज लूक आज भारतातून ५० देशात निर्यात होईल इतका फेमस झालाय. फक्त बुलेटच नाही तर एन्फिल्डच्या अनेक गाड्या जगाच्या मार्केटमध्ये भाव खात आहेत.

इंग्लंडमध्ये बनलेली रॉयल एन्फिल्ड आज भारताची ओळख सांगणारा ब्रँड बनलाय. आजही आपले जवान बुलेट घेऊन सीमेवर फिरतात तेव्हा शत्रूच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहत नाहीत.

नेहरूंनी तेव्हा घेतलेला एक निर्णय आपल्याला बुलेट आयात करण्यापासून ते निर्यात करण्यापर्यंत नेऊन पोहचवलंय. सत्तर वर्षात एवढी प्रगती काय वाईट नाही.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.