मालाडच्या आर.आर पाटलांमुळे लोकांना टेलिफोन मिळायले लागले

मालाडचे एक सद्गृहस्थ..नाव रामकृष्ण आर. पाटील. जे कि आर. आर. पाटील म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्रसिद्धीची हाव न धरता त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य खरोखर अजब आहे. ते जाऊन बरीच वर्षे झालीत मात्र आजही त्यांची आठवण त्यांना ओळखणारी जनता काढत असते. आर. आर. पाटील यांच्यासारखी माणसे समाजात होऊन गेलीत म्हणूनच देशाचा गाडा चाललाय असंच त्यांच्या कार्यावरून वाटते असं म्हणलं जातं. काही जण असंही म्हणतात कि, त्यांच्या जागी दुसरा कुणी असता तर एव्हाना निवडणूका लढवून निदान नगरसेवक तरी नक्की झाला असता. पण कुठल्याही पदाची अभिलाषा न धरता त्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतल्यागत आपले कार्य सुरू ठेवले होते.

त्यांची ओळख म्हणजे, मालाड भागात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता त्यांचे अव्याहतपणे सामाजिक कार्य केले. १ जानेवारी २०११ ला त्यांच्या षष्ठब्दपूर्ती निमित्त त्यांचा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक ह्यांच्या हस्ते सत्कार झाला होता.  अतिशय नम्र, मनमिळाऊ, साधे आणि बोलघेवडे ही त्यांची वैशिष्ट्ये पहिल्याच भेटीत प्रत्येकालाच जाणवत असत.

त्यांचा जन्म १९५० चा होता. जेंव्हा ते अवघे १५ वर्षांचे होते तेंव्हा त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अनुग्रह केलेला आहे असं सांगण्यात येतं.

‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र गुरु महाराजांनी त्यांना दिला होता. गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माता-पित्याची आज्ञा नेहमी शिरसावंद्य मानली आणि पापभीरू राहाण्याचा सतत प्रयत्न केला होता. गुरुंबरोबर खूप लहान वयात त्यांना २३ दिवसांची तीर्थयात्राही करायला मिळाली. मालाडला गुरुंच्या कृष्णबाग ह्या स्थानी ते निष्काम सेवा करत आलेत. आणि गोंदवले येथे एस.टी. चे कार्यालय तसेच बसेसची व्यवस्था चोख ठेवण्यासाठी त्यांनी झटून प्रयत्न केले. 

इतकेच नव्हे तर त्यांच्याच प्रयत्नाने गोंदवले हे सरकारकडून अधिकृतरीत्या तीर्थक्षेत्र घोषित करून घ्यायची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.

चिनॉय कॉलेजातून बी. कॉम. पदवीसाठी शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली होती. त्यांना रा. स्व. संघात त्या दृष्टीने चांगले संस्कार लाभले. कन्याकुमारी येथल्या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या इमारतीसाठी निधी गोळा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. त्यात त्यांनी भरीव प्रोत्साहन दिले. मालाडच्या उत्कर्ष विद्यामंदीर शाळेचे ते विद्यार्थी होते. त्यांनी ह्या शाळेसाठी सतत ३० वर्षे निरलसपणे सेवा केली. ते शाळेच्या मंडळाचे बराच काळ सहचिटणीस होते. शाळेच्या कारभाराची घडी नीट बसवण्यात त्यांचा वाटा मोठा होता.

आणखी एक श्रेय त्यांना देणं महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या सर्वांकडे आलेले टेलिफोन.

पूर्वी टेलिफोन मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागायची. फार मोठं-मोठ्या राजकारणी नेत्यांकडेच टेलिफोन असायचे. सामान्यांना टेलिफोन म्हणजे मोठं काही तरी वाटायचं…पण काळानुसार त्याची निकड सर्वानाच जाणवत होती. पण टेलिफोन साठी पैसेही भरपूर मोजावे लागायचे. सर्वांनाच मोठी रक्कम मोजणं परवडत नसायचं. पण यातून काहीतरी मार्ग काढायला हवा या जाणिवेने पाटील ह्यांनी त्यासाठी मुंबई टेलिफोन्सच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. आपण जास्तीत जास्त दूरध्वनी केंद्रे उभारा म्हणून मागणी केली. तसेच नवीन दूरध्वनी केंद्रे उभारली जात नसल्याची सबब पुढे केली.

फक्त व्यवस्थापकांच्या भेटी घेऊन त्यांना मागण्या करून जास्त काही फरक पडणार नाही म्हणून त्यांनी थेट तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांची भेट घेतली. 

त्यांनी केलेल्या दूरध्वनी केंद्रे उभारली जावी या मागणीचा मुख्यमंत्री महाशयांनी विचार केला, त्यांच्या भेटीचा प्रभाव म्हणजे मुख्यमंत्री यांनी   दूरध्वनी केंद्रांसाठी सर्वत्र जमिनी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

त्यांच्या पाठ-पुराव्याचा परिणाम म्हणजे लागलीच दूरध्वनी केंद्रे उभी राहू लागली. सामान्य लोकं देखील  अर्ज टेलिफोन मिळावा म्हणून सरकारी कार्यालयात अर्ज करू लागली, विशेष म्हणजे अर्ज केल्याच्या काहीच काळात त्यांना टेलिफोन मिळू लागलेत.

थोडक्यात पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे घरो-घरी टेलिफोन दिसू लागले. 

बरं पाटील यांचं हेच के योगदान नव्हतं तर ह्या खेरीज त्यांनी मालाड येथील मालाड युवक मंडळाची व्यायामशाळा, समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय, नाट्यशिल्प नाट्यसंस्था, नादब्रह्म संगीत संस्था, साईकृपा तबला क्लास, लिबर्टी गार्डन गणेशोत्सव मंडळ, ब्राह्मणसभा अशा विविध क्षेत्रातल्या संस्थांच्या उभारणीत किंवा त्यांच्या विकासात त्यांनी कमालीचे योगदान दिलेले आहे. ते चैतन्य फाऊंडेशनचे विश्वस्तही होते आणि मराठी व्यापार मित्र मंडळाचे आजीव सभासदही आहेत.

त्यांची काही कामे लक्षवेधक असूनही प्रसिद्धीला आली नाहीत. एस.टी. गाड्यांमध्ये सुधारणा किंवा त्यांचे वेळापत्रक सादर व्हावे ह्यासाठी पाटील ह्यांनी खूप आटापिटा केलेला आहे. मुंबईत धावणाऱ्या बसेसवर आता आपल्याला बस क्रमांक आणि गंतव्य स्थान इलेक्ट्रॉनिक पाटीवर झळकताना दिसते त्याचे श्रेयही त्यांनाच जाते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.