आर. आर. आबांना ठावूक होतं कॅन्सर झालाय ?

तरिही पक्षाचा प्रचार सोडला नाही.

( पत्रकार अजित झळके हे दै. सकाळ चे राजकिय पत्रकार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांना आलेला अनुभव येथे मांडण्यात आला आहे.) 

आबा गेले, तीन वर्षे झाली.
आबांच्या अनेक सभा, पत्रकार बैठकांना मी हजर राहिलो. आडवे-तिडवे प्रश्‍नही विचारले पण सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील आबांची शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील सभा मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आजही आबांचा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा येतो.

लोकसभेला संजयकाका छप्पर फाड मतांनी विजयी झाले होते. भाजप सुसाट सुटला होता. आता विधानसभेची बारी होती. तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातून भाजपने अजितराव घोरपडेंना उमेदवारी दिली होती. काका खासदार होते, नरेंद्र मोदी सभेला आले होते. रान पेटलं होतं. आबांना प्रचंड आव्हान निर्माण झालं होतं. या लाटेत भलेभले पालापाचोळ्यासारखे उडून गेले होते. आबांच्या मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. या तापलेल्या शिवारात मी तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या दौऱ्यावर गेलो होतो. मतदार संघाचा कानोसा घ्यायचा आणि “फिरस्ता‘ सदरात तो मांडायचा होता. सकाळी एरंडोलीतूनच प्रवास सुरु झाला आणि दंडोबाची खिंड ओलांडून आबांच्या मतदार संघात पोहचलो.

आबा कुठे आहेत, याचे अपडेट घेतले होते. त्यामुळे सकाळी 11 ते 12 च्या सुमारास शिरढोणची सभा गाठायची ठरवलं होतं. आबा तासभर उशीरा म्हणजे बारा-सव्वाबारा वाजता आले. मोठाल्या झाडाखाली सभा सुरु झाली. गर्दी चांगली होती. मी कॅनॉनचा एसएलआर कॅमेरा सोबत घेतला होता. एक कोन पकडून मी सभा ऐकायला उभा होतो. आबांचे फोटो टिपत होतो. त्यावेळी आबांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता. तणाव होता. आबा अंतर्मुख होतेच, मात्र असा ताण पूर्वी मी तरी पाहिला नव्हता.

त्या सभेच्या दोन दिवस आधी त्यांनी मनसेचा उमेदवार आणि बलात्कार या विषयाला धरून एक वादग्रस्त विधान केले होतं, त्याचे पडसाद उमटले होते, त्याचा तो ताण असावा, असा माझा प्राथमिक कयास होता.
आबांनी चहा मागवला. पांढऱ्या कपातून चहा आला. आबा त्या कपातील चहात बराच वेळ टक लावून पहात होते. चहा संपला, थोड्या वेळाने सभाही. आबांनी मोजकं, पण नेहमीच्या शैलीत घणाघाती भाषणं केलं होतं. तिथल्या मातीशी आपली नाळ सांगणारे काही दाखले दिले होते. मी आबांच्या फोटोसोबत काही ओळी लिहल्या होत्या, त्यात “आबा चर्चा तर होणारच’ अशा शीर्षकाखाली आबा तणावात असल्याचा उल्लेख होता.

 

फोटो – अजित झळके

आबांनी निवडणूक जिंकली पण काही महिन्यांनी एका आकस्मित गोष्टीचा उलगडा झाला. आबांना कर्करोग झाल्याची बातमी आली. एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर आबांचा तो चेहरा उभा राहिला. चहाच्या कपात टक लावून पाहणारे आबा आता मला वेगळेच दिसत होते. आबांना तंबाखू खायची सवय होती ते गुटखा खूपच खायचे असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
आबांचा त्यानंच घात केला. त्या दिवशी आबांनी चहा मागवला अन्‌ त्या कपात ते एकटक पहात होते त्याचा अर्थ मी लावण्याचा प्रयत्न केला. तल्लफ झाल्यावर तंबाखू ऐवजी नेहमी चहाच घेतला असता तर..!

त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ताण कशाचा असेल, याची पक्की खात्री आता पटली होती. आबा तेंव्हा निवडणूक जिंकण्याचा विचार करत असावेत, असे वाटले होते पण ते झूठ होते आबांसमोर जगण्याची लढाई सुरु झाली होती. त्या विचारात ते स्वतः स्वतःशी बोलत असावेत, याची मनाला खात्री पटली. तो तणावातला चेहरा आतून किती यातना सहन करत असेल, याचा विचारही सून्न करणारा होता. कर्करोग झाल्याची जाणीव असून आबांनी उपचाराला दिरंगाई केल्याची सल त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता रोज एकदा तरी बोलून दाखवतो. ती सल त्यांच्या मनाला तेंव्हाही बोचत असेल का ? असे आज वाटते.

PTI

आबांची मी कव्हर केलेली ती शेवटची सभा. त्यानंतर सांगलीत एका पत्रकार बैठकीला होतो पुन्हा आबांच्या अंत्यविधीलाच जाण्याचा दुर्दैवी योग आला.
आबा आज हवे होते, हे मी सांगण्याची गरज नाही. केवळ त्यांचा कार्यकर्ता नव्हे तर संबंध महाराष्ट्र पोरका करून आबा गेले.

आज राज्यात जे काही सुरु आहे, अशावेळी आबा हातोडा बनून बरसले असते. त्यांच्या घणाघाताने विधानसभा दणाणून गेली असती पण आबांच्या स्मृतीदिनी या आठवणी जागवताना तो चेहरा पुन्हा पुन्हा आठवतोय. आबा तेंव्हा जिंकण्याचा नव्हे तर जगण्याचाच विचार करत असावेत, असं राहून-राहून वाटतयं. आबा विधानसभेला पराभूत झाले असते तरी चालले असते, मात्र त्यांनी “ती’ लढाई जिंकायला हवी होती.

– अजित झळके A2Z पोलिटिक्स

Leave A Reply

Your email address will not be published.