व्ही शांताराम, सत्यजित रे यांच्या चित्रपटांना हुलकावणी देणारा गोल्डन ग्लोब RRR ने मिळवलाय

फिल्मफेअर अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड वगैरे वगैरे असे बरेच अवॉर्ड सेरेमनीज होत असतात. पण, काही अवॉर्ड्स असे आहेत की, जे मिळवणं हे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीला हवे हवेसे वाटत असतात. अर्थात, प्रत्येक अवॉर्डचं ज्याच्या त्याच्या ठिकाणी  महत्त्व आहे.

जागतिक पातळीवर भारी समजल्या जाणाऱ्या अशा काही अवॉर्ड्सपैकीच एक म्हणजे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये भारताच्या एका चित्रपटाने बाजी मारली. एस. एस. राजामौलीचा आर. आर. आर. या चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजीनल साँग हा अवॉर्ड मिळालाय. आता हा अवॉर्ड मिळाला आणि पुन्हा एकदा आर आर आर चित्रपट चर्चेत आलाय.

फक्त नॅशनल मीडियाच नाही तर, इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा आर आर आर चं नाव झळकतंय.

भारतीय चित्रपटसुष्टीसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. मागच्या वर्ष-दीड वर्षाचा विचार केला तर, साऊथ इंडियन चित्रपट हे खरंच बॉलीवूडच्या तुलनेत कमाल करतायत. पण, विषय तो नाहीये.. विषय हा आहे की जो गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला म्हणून आरआरआर चं इतकं कौतूक होतंय तो अवॉर्ड नेमका कुठला, कुणी सुरू केलेला आणि इतका महत्वाचा का आहे?

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स नक्की काय आहे ते बघुया.

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स हे हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने जानेवारी १९४४ मध्ये सुरू केलेले, अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही क्षेत्रांतील उत्कृष्ट कलाकृतींची ओळख करून दिलेले सन्मान आहेत.

हा झाला इतिहास पण, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स महत्त्वाचे का आहेत तर, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स हे प्रत्येक प्रकारच्या कलाकृतीसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिले जातात. चित्रपटसुष्टीत दिल्या जाणाऱ्या अवॉर्ड्सपैकी महत्त्वाच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर, सर्वात महत्त्वाच्या अवॉर्ड्स लिस्टमध्ये गोल्डन ग्लोब दुसऱ्या क्रमांकावर बसतो.

आर आर आर ची टीम अवॉर्ड शोमध्ये उपस्थित होती.

२०२३ साल हे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स चं ८० वं वर्ष होतं. हा कार्यक्रम कॅलिफॉर्नियामध्ये आयोजिक केला गेला होता. या अवॉर्ड शो साठी चित्रपटाला नॉन-इंग्लिश कॅटेगरीतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचंही नामांकन मिळालं होतं त्यामुळे दिग्दर्शक एस एस राजामौली, अभिनेता ज्युनियर एनटीआर, राम चरण अशी टीम यावेळी उपस्थित होती.

बेस्ट ओरिजीनल साँगचा अवॉर्ड मिळाल्यावर नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एम एम कीरावानी यांनी मंचावर जाऊन हा अवॉर्ड स्विकारला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले,

“हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे. माझी पत्नी यावेळी उपस्थित आहे. हा पुरस्कार आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आहे. त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला तसेच त्यांनी मला सपोर्ट केला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

याआधीही भारतीय सिनेमांनी गोल्डन ग्लोब पर्यंत मजल मारली आहे.

सर्वात आधी व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखें बारा हाथ’ हा चित्रपट गोल्डन ग्लोबसाठी नॉमिनेट झाला होता. सॅम्युअल गोल्डविन आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या कॅटेगरीसाठी नॉमिनेशन मिळालं होतं. पण, अवॉर्ड मिळाला नव्हता.

सत्यजित रे यांचा ‘अपूर संसार’ या चित्रटाला १९६१ साली फॉरेन लँग्वेजमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं नॉमिनेशन मिळालं होतं. यावेळीही नॉमिनेशन मिळालं होतं पण, अवॉर्ड काही हाती लागला नाहीय

रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी दिग्दर्शन केलेला ‘गांधी’ हा चित्रपट गोल्डन ग्लोबमध्ये झळकला होता. फक्त नॉमिनेशनच नाही तर, या चित्रपटाने विविध पुरस्कारही पटकवले होते. मोशन पिक्चरमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता, मोशन पिक्चरमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, मोशन पिक्चरमधील सर्वोत्कृष्ट पटकथा, आणि  सर्वोत्कृष्ट नवीन चेहरा – अभिनेता हे सर्व पुरस्कार या चित्रपटाने पटकवले होते.

मीरा नायर यांचा ‘सलाम बाँबे’ हा चित्रपट त्यावेळी गाजलाही होता आणि या चित्रपटाने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश चित्रपटासाठीचं नॉमिनेशनही मिळवलं होतं.

मीरा नायर यांच्याच ‘मॉन्सून वेडिंग’  या चित्रपटाला फॉरेन लँग्वेजमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं नॉमिनेशन मिळालं होतं.

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये एक पुरस्कार पटकल्यानं दिग्दर्शक किंवा आरआरआर चित्रपटाच्या टीमला तर आनंद झालाच असेल. याशिवाय, संपुर्ण भारतीय चित्रपटसृष्टीलाच एक नवी उभारी आणि आणखी जबरदस्त कलाकृती बनवण्याची प्रेरणाही मिळाली असेल.

आता गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये भारतीय सिनेमाचा डंका वाजल्यानंतर ऑस्करमध्ये भारतीय सिनेमाला यश मिळतंय का याकडे सिनेसृष्टीचं लक्ष लागलं असेल. आरआरआर, काश्मीर फाईल्स, कांतारा या सिनेमांसोबतच मराठीतले मी वसंतराव आणि तुझ्यासाठी काहीही या दोन चित्रपटांनाही ऑस्करसाठी नॉमिनेशव मिळालं आहे.

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Suresh Ghogare says

    आर .आर. आर. हा चित्रपट महान आदिवासी क्रांतिकारांवर बनवलेला आहे. आम्हाला अभिमान वाटला आणि आमची आदिवासींची संस्कृति आणि भाषा, परंपरा, युद्ध संघर्ष… खूप छान हा भारताचा पहिला आदिवासी समाजाचा चित्रपट इतिहास सांगितला गेला आहे. जय आदिवासी… जय जोहार… जल, जंगल, जमीन… जय भारत!🌍🏞️👳🏻🚩🏹🙇🏻‍♂️🙏🏻🇮🇳❤️💚

Leave A Reply

Your email address will not be published.