दुसऱ्याच्या मयतावर रडण्यासाठी या रुदाली स्त्रियांना पैसे देऊन बोलवण्यात येतं…

रडणं हि जगातली सगळ्यात सोपी कला मानली जाते. पण कधी कधी रडणं हे सिरीयस मानलं जात, लग्नात पाठ्वणीची वेळ असो किंवा पोरीनं गुलीगत धोका दिलेला असो किंवा घरातलं कुणी देवाघरी गेलं असो या वेळी रडून रडून लोकं त्रास करून घेतात. स्वतःसाठी कोणीही रडतं ओ पण दुसऱ्याच्या मरणावर रडणारे लोकं किती महान असतील याचीही कल्पना येते, आज जाणून घेऊया हा किस्सा रुदाली महिलांचा. रडणं हा त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय मानला जातो.

राजस्थानमध्ये आणि इतर काही मोजक्या भागांमध्ये रुदाली महिला दिसतात. रुदाली म्हणजे काय तर गावामध्ये कुठल्याही प्रतिष्ठित माणसाचं निधन झालं तर या स्त्रियांना रुदालीसाठी बोलावणं येतं. दुसऱ्याच्या मयतावर रडण्यासाठी या रुदाली स्त्रियांना पैसे देऊन बोलवण्यात येतं. रुदाली करणाऱ्या स्त्रिया या रडण्यात पारंगत असतात. ते अशा प्रकारे रडतात कि चांगल्या रांगड्या माणसाच्या डोळ्यातसुद्धा त्यांचं रडणं बघून पाणी येईल. 

असही सांगण्यात येतं कि या रुदाली करणाऱ्या स्त्रिया रडण्यात निष्णात असतात पण त्या स्त्रिया सांगतात कि आम्ही बनावटी रडत नाही. जेव्हा आसपासच्या गावांमधून रडण्याचं आवताण आम्हाला दिलं जातं तेव्हा आम्ही अगोदर मयत झालेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवतो, त्याच्या घरच्यांची, नातेवाईकांची माहिती मिळवतो आणि मेलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्यातर्फे आम्ही रडतो. रडतोही असं कि जस आमच्याच कुठल्यातरी सख्ख्या माणसाचं निधन झालं असावं.

५० रुपयाच्या हिशोबाने १३ दिवस रडण्याचे या रुदाली करणाऱ्या स्त्रियांना पैसे मिळतात आणि दिवसाचं अन्नसुद्धा त्यांना दिलं जातं. कुणाच्याही घरात जाण्याची या स्त्रियांना परवानगी नसते. त्यामुळे घराच्या अंगणात बसून या स्त्रिया रुदालीचं काम करतात. अनेक लोकं त्यांचा हा नक्की काय प्रकार चाललाय पाहत असतात. 

सुरवातीला मुसमुसत रडणाऱ्या या स्त्रिया हळूहळू गाण्याच्या सुरत आणि ओरडून ओरडून रडू लागतात. मरणाऱ्या व्यक्तीच्या उरलेल्या नातेवाईकांचं नाव घेऊन मोठमोठ्याने गात रडायला सुरवात करतात. मधेच हात आपटत, ऊर झोडत या स्त्रिया रुदाली करतात. जी स्त्री उत्तम प्रकारे आणि मोठ्या आवाजात रडते ती स्त्री सगळ्यात उत्तम रुदाली करणारी स्त्री मानली जाते.

हे सगळं प्रकरण झाल्यावर चर्चा रंगतात कि अमक्याच्या घरी चांगली रुदाली झाली वैगऱे. या स्त्रियांचा एक खास पोशाख असतो काळे कपडे. रुदाली करण्यासाठी जाणाऱ्या स्त्रिया काळी घागरा चोळी, काली ओढणी असा पोशाख करून जातात. रुदालीया हे अपशकुन मानलं जातं कारण आनंदाच्या वेळी यांना कुणीही बोलावत नाही. गावात जर कुठे आनंदाचं काम सुरु असेल तर रुदाली करायला जाणाऱ्या स्त्रिया दिसल्या तर ते काम तात्काळ थांबवलं जातं.

लोक या रुदाली करणाऱ्या स्त्रियांची वस्ती गावाच्या बाहेर वसवतात. त्यांना झालेल्या मुलांना ते रडायला शिकवतात जेणेकरून ते हि परंपरा पुढे चालवतील. हि परंपरा राजस्थानमध्ये मागील २०० वर्षांपासून सुरू आहे. मोठमोठ्या परिवारांमध्ये रडणं हे दुबळेपणाचं लक्षण मानलं जातं म्हणून हि रुदालीची पद्धत सुरु झाल्याचं सांगण्यात येतं. 

याच परंपरेवर आधारित डिंपल कपाडियाचा रुदाली हा सिनेमा आला होता. या सिनेमाला सुद्धा २५ वर्षे होऊन गेली. हि परंपरा आजही राजस्थानच्या हथेली आणि आसपासच्या भागात चालते. याचे दुष्परिणाम आणि परंपरेचं पालन या द्विधा मनस्थितीत रुदाली आहे…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.