डिझेल साहेबांना एक अपघात झाला म्हणून सगळ्या जगाला डिझेल इंजिन मिळालं….

पेट्रोल डिझेल किती वाढलंय माहीत आहे का ? खूपच… अक्षरशः पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने सामान्यांच्या नाकात दम करून ठेवलाय. आता ज्यांच्याकडे चार चाकी पेट्रोल गाड्या आहेत त्यांना असं वाटत असेल उगाच पेट्रोल गाडी घेतली. त्यापेक्षा डिझेल घेतली असती तर परवडलं असतं. पण असं का ?

तर दगडापेक्षा वीट मऊ अशी काहीशी परिस्थिती डिझेलची असते. म्हणजे डिझेल हे पेट्रोल पेक्षा तीन ते चार रुपयांनी स्वस्त असत. पण भिडूंनो विचार करा, डिझेल इंजिनचा शोध लागला नसता तर. पण नाही. आपल्या एका भावानं खूप सारे प्रयोग करून शेवटी डिझेल इंजिनचा शोध लावलाच. आणि आपल्यावर उपकार केले. अशा या भावाचा किस्सा सांगणं तर बनतच ना.

तर ज्याने डिझेल इंजिनचा शोध लावला त्या जर्मन तंत्रज्ञ डीझेल इंजिनाच्या जनकाच नाव आहे रूडोल्फ ख्रिश्चन कार्ल डीझेल.

भावाच्या नावात पण डिझेल आहे. 

तर रूडोल्फ हे पेशाने मशीन इंजिनियर होते. डीझेल या क्रूड ऑइलवर चालणारं इंजिन बनविण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. १८९२ मध्ये, त्यांना डीझेल इंजिनाचे पेटंट मिळविले.

पण त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता.

रूडोल्फचा जन्म फ्रान्समधल्या पॅरिसचा. त्यांचे वडील बावरियामधून स्थलांतर करून फ्रान्समध्ये स्थायिक झाले होते. बावरियातील आऊग्जबुर्ग मध्ये त्यांचा पुस्तक-बांधणीचा व्यवसाय होता. पॅरिस येथे आल्यानंतर त्यांनी चामड्याचा धंदा सुरू केला. पण १८७० मध्ये तोंड फुटलेल्या फ्रँको-प्रशियन युध्दामुळे त्यांना फ्रान्स सोडून लंडनला जावं लागलं.

रूडोल्फचे शिक्षण आऊग्जबर्ग येथील रॉयल कंट्री ट्रेड स्कूलमध्ये झाले. दोन वर्षांत शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून गणल्या गेलेल्या रूडोल्फ याने म्यूनिक येथील रॉयल बावरियन पॉलिटेक्निक संस्थेत पुढचं शिक्षण घेतल. 

पुढं १८९० मध्ये डीझेल कुटुंबासह बर्लिनला आले. एकदा असच वाफेच्या इंजिनाची उभारणी करताना अमोनिया वायूमुळे झालेल्या स्फोटात ते जबर जखमी झाले. कित्येक महिने ते अंथरुणाला खिळूनच होते. या सगळ्या उपदव्यापामुळे त्यांनी कमी रिस्क असलेलं असं इंजिन बनवायचं ठरवलं. त्या कामात त्यांनी इतकं वाहून घेतलं की, १८९३ मध्ये त्यांनी एका नव्या इंजिनाचा शोध लावला.

एकतर त्या काळातील स्वस्त इंधन म्हणून वापरली जाणारी कोळशाची भुकटी व नंतर खनिज तेल वापरून इंजिन चालविण्याचा अयशस्वी प्रयत्न झालाच होता. पण खूप प्रयत्नानंतर १८९७ मध्ये कॉम्प्रेस्ड हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वी रीत्या तयार केले. हे इंजिन २५ हॉर्स पॉवरचे, उभ्या सिलिंडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे काम्बशण होणारे, चार टायरांचे, जड, दणकट, मंद गतीचे परंतु उच्च औष्णिक कार्य क्षमतेचे होते.

आणि हेच ते डिझेल इंजिन..

तीस वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर, त्यांनी बर्लिन येथील जर्मन रेश कार्यालयातून ऑगस्ट १८९२ मध्ये डीझेल इंजिनचे पेटंट मिळविल होतं. त्यानंतरचा दोन वर्षाचा काळ प्रायोगिक चाचण्यात गेला. त्यावेळी इंजिनाच्या रचनेत विविध प्रकारचे बदल घडवून आणण्यात आले. तसेच त्या इंजिनात वापरल्या जाणाऱ्या इंधंनामुळे जास्तीत जास्त गतिक्षमता असणारे इंजिन तयार व्हावे म्हणून डीझेल सतत प्रयत्नशील राहिले.

त्यांनी या इंजिनात पेट्रोल, केरोसीन, वनस्पति तेल अशा इंधनांचा प्रयोगदेखील करून पाहिले आणि त्या विविध प्रयोगांत निरनिराळ्या कार्यक्षमतेच्या इंजिनाची निर्मिती होत गेली. त्यांचे कार्य त्यांनी थिअरी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अ रॅशनल हिट मोटार या नावाने प्रकाशित केले.

ऑक्टोबर १८९८ मध्ये डीझेल आणि मशीन फॅब्रिक या कंपनीने २२ परवाने मुक्त करून हे इंजिन बाजारात विक्रीस आणले. त्याच वेळी म्यूनिकमध्ये भरलेल्या तंत्रज्ञान प्रदर्शनात ह्या इंजिनाने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. याच प्रदर्शनात डीझेलवर चालणाऱ्या इंजिनाद्वारे कॉम्प्रेसर आणि जनरेटर चालवून दाखविण्यात आलं.

हळूहळू जगातील सर्व औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांनी डीझेल इंजिनात रस घेऊन आपआपल्या देशासाठी परवाने मिळविले व त्या इंजिनात छोटे-मोठे बदल करीत इंजिने तयार केली. १९०४ च्या दरम्यान डीझेल इंजिन वाहतुकीसाठी कल्पना प्रबळ झाली. १९०८ मध्ये या इंजिनाचे जर्मनीतून रशियात आगमन झाले.

पहिली ८५ वर्षे डीझेल इंजिन हे विविध प्रकारे उपयोगात आणले जात होते, तरी त्यात सातत्याने सुधारणा होत होती. आज जगात सर्वत्र रेल्वेप्रवास, जहाजे, वाहतुकीची वाहने, शेतीची साधन उपकरण तसेच लष्करात ह्या इंजिनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे.

पेट्रोलसारखे इंधन महागल्यामुळ कारगाड्यांत सुध्दा डीझेलचे इंजिन वापरण्यावर भर दिला गेला. शंभर वर्षापूर्वी जर्मन तंत्रज्ञ डीझेल यांनी डीझेल या खनिज तेल इंधनावर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला आणि २००३ मध्ये तंत्रज्ञानाच्या जगतात त्याची शताब्दी साजरी करण्यात आली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.