रुक्मीणी बाईने देवदासींच्या नाचाला बनवलं “भरतनाट्यम”

जाती आधारित वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम भारतात सर्वच स्तरांवर केलं जातं. अगदी कला क्षेत्र ही त्यासाठी काही नवं नाही. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे भरतनाट्यम.

देवदासींच्या दासीअट्टम किंवा मग सादिर या नाचाचं रूपांतर उच्चभ्रू महिलांनी भरतनाट्यम मध्ये केलं. आणि मग भरतनाट्यम इलाईट क्लासच नृत्य म्हणून ख्यातनाम झालं. देवदासींच हे नृत्य शिकण्यासाठी शाळा आणि अकादम्या उघडल्या गेल्या, जिथं प्रवेश घेणे सर्वसामान्यांसाठी सोप्प नव्हतं. या नृत्यात पैसा आणि कीर्ती आली. त्याचे शो परदेशात होऊ लागले.

पण ज्यांचा उदरनिर्वाह या नृत्यावर चालत होता त्याच देवदासी यातनं बाहेर फेकल्या गेल्या. 

दक्षिण भारतात प्राचीन काळापासून मंदिरात देवदासी ठेवण्याची प्रथा होती. तस बघायला गेलं तर आजही ही प्रथा पूर्णपणे संपलेली नाही. त्याविरोधात पहिला कायदा १९४७ मध्ये करण्यात आला होता.

या देवदासींच काम होत मंदिरातील देवतासमोर नृत्य करणे. परंतु प्रत्यक्षात ही प्रथा इतरही अनेक प्रकारांमध्ये चालू होती. ज्यात देवदासींच शारीरिक शोषण व्हायचं. देवदासी प्रत्यक्षात अत्यंत नीच मानल्या गेलेल्या जातीच्या मुली होत्या. ज्यांना दबाव किंवा धार्मिक अंधश्रद्धा यामुळे त्यांच्या कुटूंबाने देवतांना अर्पण केलं होत. या मुलींचं एकदा का देवाशी लग्न लागलं कि त्यानंतर तिला कोणत्याही पुरुषाशी लग्न करता यायचं नाही.

हिंदू आगम शास्त्रानुसार नृत्य आणि संगीत ही ईश्वराच्या उपासनेचे आवश्यक भाग आहेत. हिंदू मंदिरात शेकडो देवदासी असायच्या. त्यांना नृत्य आणि संगीताचीही जाण होती. ही मंदिरे राजा आणि जमीनदारांकरवी संरक्षित केली होती.

खरं तर, देवदासी हे मंदिरातील पुरोहित आणि संरक्षक राजे-जमीनदार यांची मालमत्ता होती. आणि या दासींचा लैंगिक गुलाम म्हणून वापर व्हायचा. या देवदासींनी सादर केलेल्या नृत्यास सादिर किंवा दासीअट्टम अस म्हणत.

१९ व्या शतकापर्यंत देवदासी राज्यांच्या संरक्षणामुळे चांगल्या स्थितीत होते. ब्रिटीश काळात त्यांची  परिस्थिती अधिकच खालावली, यापैकी बर्‍याच जणींनी वेश्या व्यवसाय करण्यास सुरवात केली.

जमींदार किंवा राजांकडून जन्मलेल्या या देवदासीच्या मुलांना नटुआनार म्हणत. हे नटुआनार मंदिरात वाद्ये वाजवत असत किंवा त्यांच्या समाजातील महिलांना नृत्य शिकवत. तामिळनाडूमध्ये या नटुआनारच्या माध्यमातून नृत्य शिकून काही उच्चवर्गीय स्त्रियांनी दासीअट्टमला भरतनाट्यमचे रूप दिलं.

आणि हाच भरतनाट्यम शब्द पहिल्यांदा १९३० च्या दशकात वापरला गेला होता.

भरतनाट्यमला दासीअट्टम बनवण्याचं काम रुक्मणी देवी अरुंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. मदुराईच्या तामिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या रुक्मणी देवी लहानपणापासूनच खूप महत्वाकांक्षी होत्या. त्या प्रख्यात नर्तक एना पावलोवा कडून बॅले डान्स आणि मीनाक्षी पिल्लईकडून दासीअट्टम शिकल्या. रुक्मणी देवीने जॉर्ज अरुंदेल या ब्रिटिश थियोसोसिस्टशी लग्न केले. राज्यसभेवर नामांकित झालेल्या रुक्मणी या पहिल्या महिला होत्या.

रुक्मणीने प्रथम युरोपियन नृत्यनाट्याचे शिक्षण घेतले. पण जेव्हा या नृत्य प्रकारात तिला नाव मिळवता येणार नाही हे समजले तेव्हा तिने तिचे लक्ष भारतीय नृत्यांकडे वळविले. १९३६ मध्ये रुक्मणीने चेन्नईजवळ कलाक्षेत्र नावाची शाळा उघडली जिथे त्यांनी देवदासींच्या नृत्य सादिर नाट्यम किंवा  दासीअट्टमला नवीन रूप दिले आणि त्याचे नाव भरतनाट्यम ठेवले.

स्वातंत्र्यानंतर देवदासींच हे नृत्य सादर करण्यासाठी उच्च जातीतील उच्चभ्रू महिला परदेशात जाऊ लागल्या. कारण आता दासीअट्टम भरतनाट्यम झाले होते. ते ‘शुद्ध’ झाले आणि त्याला शास्त्रीय स्वरूप देण्यात आले. भरतनाट्यम हे परदेशात भारताचे मुख्य नृत्य मानल जायचं.

याशिवाय भरतनाट्यमच्या नावाखाली अनेक महाविद्यालये, संगीत अकादमी, विद्यापीठांमध्ये शास्त्रीय नृत्य देखील तयार करण्यात आले ज्यामुळे बर्‍याच लोकांना रोजगार मिळाला. पण हे नृत्य सादर करणाऱ्या देवदासी मात्र यामुळे विस्मरणात गेल्या.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.