दिल्लीमधले सगळे पुरुष तिला बघितल्यावर थरथर कापायचे.

रुक्साना सुलतान, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगची ती आई. पण एके काळी अख्ख्या दिल्लीमध्ये तिचा टेरर होता. 

अतिशय सुंदर पण तितकीच बेदरकर फटकळ अशा रुक्सानाचा शिविंदर सिंह या शीख जनरलशी घटस्फोट झाला होता. आपली मुलगी अमृता सिंगला घेऊन ती एकटीच राहायची. दिल्लीच्या प्रसिद्ध केनॉटप्लेस मध्ये ती बुटिक चालवायची. जिथे अनेक महागडे हिरेमोत्यांचे दागिने भाड्याने दिले जायचे.

इंदिरा गांधीनी जाहीर केलेल्या आणीबाणीचे ते दिवस होते.

एकदा तिच्या बुटिक मध्ये स्वतः पंतप्रधानाचे धाकटे सुपुत्र संजय गांधी आले होते. रुक्सानासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती. ती त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे खूप प्रभावित झाली.

आणीबाणीच्या वेळी संजय गांधीच भारतीय राजकारणात आगमन झालं आणि काही दिवसातच भारतीय राजकारणाच्या पटलावर पंतप्रधानाच्या समांतर संजय गांधीचं सत्ताकेंद्र झालं .

आणीबाणीसाठी त्याने पंचसूत्री आखली होती. वृक्षारोपण,साक्षरता, सौंदर्यीकरण, हुंडाबंदी आणि सर्वात महत्वाचे नसबंदी. हे सगळ जर का झालं तर भारत नक्की महासत्ता बनेल हा विश्वास संजय गांधीला होता. आणीबाणीच्या निम्मिताने या प्रश्नाना सोडवण्याचे मागे संजय गांधीची टीम लागली.

रुक्साना सुलतानाची गाठ एका कार्यक्रमामध्ये परत संजय गांधीशी पडली. यावेळी रुक्साना आपल्या रोखठोक स्टाईलमध्ये खुद्द संजय गांधी कडे जाऊन, ती म्हणाली,

“मला आपल्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे.”

संजय गांधीला तिचं कौतुक वाटलं. त्याने विचारलं,

“मुसलमानांमध्ये नसबंदीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम करणार का?”

रुक्साना एका पायावर तयार झाली.

रुक्साना संजय गांधीच्या कोअर टीममध्ये जाऊन पोहचली होती.

शिफॉन साडी, डोळ्यावर मोठा गॉगल, अंगावर हिरेमोत्यांची लयलूट आणि चेहऱ्यावर माज असलेले तीनचार पहिलवान बॉडीगार्ड अशा थाटात रुक्साना जुन्या दिल्लीच्या तंग गल्ल्यामधून घराघरात नसबंदीचे महत्व संगत फिरू लागली.

काही दिवसातच तिची कुप्रसिद्धी त्या भागात पसरली. नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी होती. लग्न न झालेल्या मुलापासून ते जख्ख म्हाताऱ्या माणसांची नसबंदी तिने करवून आणली.

संजय गांधी आपला आईस्क्रीम बडी आहे हे ती सगळ्यांना अभिमानाने सांगायची.

दिल्लीच्या सत्ता वर्तुळात संजय गांधीच्या खास माणसांचे वर्चस्व निर्माण झाले होते त्यात रुक्सानाच नावं कुचेष्टेने घेतले जाऊ लागले. स्वतः इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांनाही संजयच्या अवतीभवती असणारी ही रुक्साना पसंत नव्हती. संजय तिच्या कारस्थानाकडे दुर्लक्ष करतोय असं अनेकांचं म्हणण होत.

याच रुक्सानाने संजय गांधीसाठी मास्टरस्ट्रोक खेळला. युपीच्या मुजफ्फरनगर, मेरठ, गोरखपूर भागामध्ये नसबंदीमुळे दंगली सुरु झाल्या. नसबंदीबद्दलच्या अफवा मुस्लीम समाजात जोरात पसरल्या होत्या. तेव्हा संजय गांधीनी रुक्सानाला तिथे पाठवले. रुक्सानाने तिथल्या दोन इमामांना नसबंदीसाठी तयार केले.

शरीफ अहमद आणि नूर मोहम्मद नावाचे हे दोन मुस्लीम धर्मगुरु एका मोठ्या कार्यक्रमात लोकांच्या पुढे येऊन नसबंदीचे महत्त्व स्टेजवरून सांगू लागले. संजय गांधीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी स्वतःच्या खिशातले १०० रुपये दोघांना बक्षीस दिले. दुसर्या दिवशी हा फोटो बघून युपी मधल्या दंगली शांत झाल्या.

याचे संपूर्ण श्रेय रुक्साना सुलतानाला देण्यात आले.

तिचे राजकीय वजन वाढले. आपल्या वाढलेल्या ताकदीचा गैरवापर तिने सुरु केला. भलीभली माणसे तिच्यापुढे बोलताना थरथर कापायची. सुप्रसिद्ध गँगस्टर तिच्या दरबारात हात जोडून उभे असायचे. आपल्या शक्तीचं निर्लज्ज प्रदर्शन करताना तिला काही वावग वाटत नव्हत.

मात्र पुढे इंदिरा गांधीनी आणीबाणी मागे घेतली. संजय गांधीच्या टीमचं राजकीय महत्व वेगाने कमी झालं. आणीबाणीच्या चुका त्यांच्या पदरी टाकण्यात आल्या. त्यानंतर मात्र, तीन वर्षे राज्य केलेली रुक्साना परत कधीच राजकीय मंचावर दिसली नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.