मळ्यात, घरात मित्रांसोबत दारू पिताय आणि पोलीस आले तर हे नियम आहेत

दारू पिण्यासाठी काय नियम आहेत, पार्टीचे काय नियम आहेत वाचा आणि शहाणे व्हा.

कधी कधी आम्हालाच कळत नाही आम्ही काय करतोय. म्हणजे जुने किस्से सांगावते, भन्नाट गोष्टी सांगाव्यात तर भिडू लोक असले इद्रिस प्रश्न विचारतेत की डोक्याच्या फ्यूजा टाईट होवून जातेत.

झालं अस की बोलभिडूवन या आमच्या मेल आयडीवर एका भिडूने प्रश्न विचारला प्रश्न असा होता की,

मळ्यात पार्टी करत होतो आणि अचानक पोलीस आले. पोलीस स्टेशनवर घेवून घरातल्यांना फोन लावला. अस कस काय. दारू प्यायला पण नियम असतेत का? आणि नियम असले तर ते काय असतात?

पोरानं प्रश्न तर मुद्याचा विचारलाय म्हणून आम्ही थेट एक्साईज एस.पी असणाऱ्या आमच्या मित्राला फोन लावला. कधीकाळी आम्ही पुण्यात एकत्र MPSC करायचो. त्याचा एकमेव फायदा म्हणजे काही मित्र पास होवून चांगल्या हुद्यावर गेले. मग आमच्या शंकाच निरसन करणं त्यांना मैत्रीत बांधिल होवून गेलं. फक्त त्याने एक अट टाकली नाव छापू नको नाहीतर राडा व्हायचा. अट मान्य करुन काही प्रश्न विचारले त्याची ही उत्तर.

दारू प्यायला काय नियम आहेत? 

वयाची २५ वर्ष पुर्ण केली की तूम्ही दारू पिवू शकता. ज्यामध्ये अल्कोहलचं प्रमाण पाच टक्यापेक्षा जास्त असतं अशी दारू पिण्यासाठी वयाची २५ वर्ष पुर्ण करणं गरजेचं आहे.

५ टक्यापेक्षा कमी अल्कोहल असणारी माइल्ड बियर, बिझर पिण्यासाठी वयाची २१ वर्ष पुर्ण करणं गरजेचं आहे. आत्ता बिझरमध्ये अल्कोहल नसतं म्हणू नका. मला पण अल्कोहल नसतय म्हणून मित्रांनी बिझर पाजलेली. ती पण चढलेली.

दारू पिण्यासाठी पण लायसन्स असतं का ? नसेल तर कारवाई होते का ? 

मग काय एक्साईज डिपार्टमेंटकडून दारू पिण्यासाठीचं लाईसन्स मिळतं. समजा दारू पिण्याचं लाईसन्स नसेल तर चुकून कारवाई केली जावू शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तर तुमच्यावर कारवाई होते. सहसा एक्साईज डिपार्टमेंट अशी कारवाई करायला जात नाही पण कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

त्यामुळे दारू पिण्याचं लायसन्स घेवून दारू पिल्यास उत्तम. म्हणजे परत समोरच्याला बोलायला जास्त स्कोप रहात नाही.

घरात, मळ्यात, शेतात पार्टी करायला लागलो आणि पोलीस आले तर कारवाई करणार का ? 

अशा कारवाईचं स्वरुप वेगळं असतं. म्हणजे तुम्ही पिवून राडा करायला लागला तर प्रतिबंधात्मक कारवाई करणारच. पण दारू पिताय म्हणून कारवाई करायची असेल तर उपस्थित लोक दहा पेक्षा जास्त पाहीजेत. तुम्ही दहा पेक्षा जास्त लोक एकत्र येवून दारू पित असाल तर एक्साईज डिपार्टमेंट तुमच्या बाटल्या सिल करुन तुमच्यावर कारवाई करु शकते.

दुकानात दारू बाटल्या घेवून आपल्या ध्येयाकडे जात असताना पोलीसांनी पकडलं तर ? 

यासाठीच दारू पिण्याचं लायसन्स आपल्याकडे असणं गरजेचं असतय. समजा पोलीसांनी पकडलं तर ड्रायव्हिंग लायसन्स सोबत दारू पिण्याच लायसन्स दाखवा. देशी असेल तर एक-एक लिटरचे दोनच खंबे एकावेळी स्वत:कडे ठेवू शकताय. इंग्लीश असेल तर एकावेळी एक डझन खंबे बाळगू शकताय.

बियर असेल तर २६०० मिलीच्या बारा बाटल्या एकावेळी ठेवू शकताय. बर हे गणित घरात साठवून ठेवायला पण तितकचं आहे. याहून अधिक बाटल्या तुमच्याकडे असल्या तर कारवाई करणार म्हणजे करणार.

समजा आम्हाला पार्टीच करायचीय आणि लयजण येणारायत मग काय करायचं ?

करा की नाय कोण म्हणलय. पण परमिट काढा आणि करा. दहा पेक्षा जास्त लोकं येणार असली तर अस परमिट आमचं खात दिवसाच्या हिशोबाने देतं. एका दिवसाची किंमत १० हजार रुपये असते. पण कधी तर १० पेक्षा जास्त लोकं असतील लय मोठ्ठी पार्टी करणार असाल तर. आणि समजा कमर्शियल पार्टी असली. म्हणजे कसं तर ते तुमचं सनबर्न वगैरे असतय ते कमर्शियल लायसन्स घेतात. फक्त इव्हेंट पुरतं. त्याची फी २० हजार असते दिवसाची.

हे लायसन्स कस काढायचं ? 

आमच्या डिपार्टमेंन्टला हे लायसन्स मिळतं. एक्साईज डिपार्टमेंटच्या साईटवर जावून प्रोसेस करा. तिथं सगळे डिटेल्स असतेत. तुम्ही जिथ पार्टी करणाराय त्याचा गुगल मॅप वगैरे अपलोड करायचा असतो. तुमचा फोटो, आयकार्ड, पत्ता वगैरे माहिती दिली की होतय. सोप्प असतय ते, महसूल कुणाला नकोय.

मित्रानं येताना गोव्यातनं बाटली आणल्या ती फोडली तर ? 

आणणं तर गुन्हाच आहे पण पिणं त्याच्यावरचा गुन्हाय. गुन्हा हैं यह ( सरफोरश पिक्चरच्या नसरुद्दीन शहाचा आवाज इथे काढण्यात आला होता) ड्युटी चुकवून आणला तरी सील करणार आणि पिला तर सील करणार, चार पैशासाठी अशा गोष्टी करु नका.

आत्ता पोलीसांना काय अधिकार आहे का की तुमचं डिपार्टमेंट येतं ?  

कसय महाराष्ट्रात पोलीसांना सगळे अधिकार आहेत. कागदपत्री ह्यो अधिकार नाही त्यो अधिकार नाही म्हणून चालत नाही. समजा एखाद्या ठिकाणी अल्कोहलचा मॅटर असला तर पोलीस आमच्या डिपार्टमेंन्टला फोन करतात. त्यांच्याकडे कागदपत्री तसा अधिकार नाही पण इतर गुन्ह्याबद्दल कारवाई होवू शकते. सो सगळं कस परवानगी घेवून व्हायला पाहीजे.

आमच्या प्रश्नाची उत्तर सांगून झाल्यावर त्यांनी त्यांच्या वेबसाईची लिंक पाठवली, 

ती लिंक खाली दिली आहे.

इथे क्लिक करा थेट वेबसाईटवर जाशीला.

यावर जावून अजून काही प्रश्न असतील तर उत्तर मिळतील. तरिही दारू पिणं वाईटचं गड्यानो.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.