सुवर्ण मंदिरात असं काय घडलं की सन ऑफ सरदार इतके भडकलेत?

मागच्या दोन-तीन दिवसांत पंजाबमध्ये घडलेल्या घटनांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात एका तरुणानं पवित्र गुरु ग्रंथ साहिबचं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात रेहरास साहिबचं पठण सुरू होतं, त्याचवेळी या अज्ञात तरुणानं रेलिंगवरुन उडी मारत गुरु ग्रंथ साहिबसमोर असणारी तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. मंदिरात उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं आणि बाहेर नेलं. जमावानं केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये अशीच आणखी एक घटना घडल्याचंही समोर आलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांच्या आधारे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी केला.

पोलिसांकडून दुर्लक्ष आणि वेडेपणाचा शिक्का

शीख धर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या श्रद्धास्थळांचा, ग्रंथांचा किंवा वस्तूंचा अवमान करणाऱ्या घटना सर्वात जास्त पंजाबमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. मात्र शीख समुदायातील काहींच्या मते, ‘अवमान करणाऱ्या लोकांवर कारवाई होतेच असं नाही.’

सुवर्णमंदिरात घडलेल्या घटनेनंतर शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह यांनी, ‘अशा दुर्दैवी घटना अन्य ठिकाणीही घडल्या आहेत, मात्र सरकारनं त्यांना गंभीररित्या घेतलंच नाही. त्यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आधी असे गैरप्रकार करणाऱ्यांना अटक झाली तेव्हा त्यांना कुणाचा पाठिंबा आहे याची माहिती न घेता ‘त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही’ असा शिक्का मारुन त्यांना सोडून दिलं जातं. या दोषींना पाठिंबा कुणाचा आहे हे शोधता न येणं, हे सरकारचं आणि सरकारी एजन्सीचं अपयश आहे.’ अशी टीका केली.

अवमानाच्या मुख्य घटना

शीख समुदायाच्या धर्मस्थळांचा अवमान केल्याप्रकरणीची सर्वात मोठी आणि गाजलेली घटना म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार. सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सेनेला सुवर्ण मंदिरात शिरण्याचे आदेश दिले. त्याचे परिणाम म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करण्यात आली. 

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांनी शीखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह यांच्यासारखा पोशाख केला म्हणून शीख समुदायानं त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. शीख धर्मीय आणि राम रहीम सिंह यांचे अनुयायी यांच्यात अनेकदा संघर्षाची ठिणगीही पडली.

अवमानाशी निगडित शीख समुदायाचे नियम काय?

गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ. या धर्मग्रंथावर शीख समुदायाची इतकी श्रद्धा आहे की, गुरु ग्रंथ साहिबला जिवंत गुरु मानण्यात येतं. गुरु ग्रंथ साहिब एखाद्या राजाप्रमाणे आपला दरबार भरवतात आणि त्या दरबारात आपण सामील होतो. गुरु गोविंद सिंह यांनी सांगितल्यानुसार, ‘गुरु ग्रंथ साहिब आणि त्याच्याशी निगडित प्रत्येक गोष्ट ही पवित्र आहे. त्यामुळं या गोष्टींचा अवमान किंवा त्यांना झालेली ही हानी हा शीख धर्मीयांसाठी मोठा अपमान आहे.’

गुरुद्वाराचा शब्दश: अर्थ म्हणजे गुरूचा निवास. त्यामुळं गुरुद्वाऱ्यासोबतच गुरुच्या सेवेत वापरली जाणार प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. कुठल्याही गुरुद्वाऱ्यात जाताना, आपल्याला डोकं झाकून आणि पायात सॉक्स न घालता जावं लागतं. गुरूंनी सांगितलेले नियम मोडणं आणि इतिहासाची मोडतोड करणंही निषिद्ध मानलं जातं. शीख बांधव घालतात ती पगडी आणि त्यांच्याजवळ असणारं कृपाणही पवित्र आहे. इतकंच नाही, तर शीख बांधवांच्या केसांना किंवा दाढीला जबरदस्तीनं स्पर्श करणं किंवा त्यांचा अपमान करणंही निषिद्ध आहे.

अवमान करणाऱ्यांबाबत कायदा काय सांगतो-

आयपीसीच्या सेक्शन २९५ आणि २९५ अ नुसार गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यानुसार कोणत्याही ‘प्रार्थना स्थळाचं किंवा पवित्र मानल्या जाणाऱ्या गोष्टीचं नुकसान करणाऱ्याला किंवा अपवित्र करणाऱ्याला जास्तीत जास्त दोन वर्षांची कैद मिळू शकते. सेक्शन २९५ अ नुसार जाणूनबुजून एखाद्या धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र शीख नागरिकांकडून असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कमीत कमी २० वर्षांची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

त्यामुळं साहजिकच सुवर्ण मंदिरात घडलेल्या घटनेमुळं शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या आणि त्याचं पर्यावसान हाणामारीमध्ये झालं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.