लग्न करताय भिडुनों? थांबा, सध्या कोणते नवीन नियम लावलेत ते वाचा

सध्या कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलयं, आता जरा कुठं नॉर्मल होतं आलेलं आयुष्यात त्यामुळे पुन्हा काही निर्बंध आले आहेत. यात काही ठिकाणी जमावबंदी केलीय तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊन केलय. साहजिकच आता जमावबंदी आहे म्हणजे गर्दी करता येणार नाहीये, त्यामुळे बोहल्यावर उभं राहणाऱ्यांचा मूड चांगलाच ऑफ झालाय.

आधीच ‘फेब्रुवारी ते मे’ हे चार महिने म्हणजे लग्नाचे हमखास मुहूर्त असलेला महिना. काहींची लग्न या मुहूर्तावर जमली पण होती. त्यांच्या पत्रिका वाटून झालेल्या, बॅण्ड, घोडा सांगून झालेला. पण आता हे सगळं कॅन्सल करायची वेळ आलीय.

मात्र भिडुनो कोरोना थांबवायचा असलं तर हे सगळं गरजेचं आहे. त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने जे काही नियम दिलेत ते पाळायचे आहेत. पण प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार तिथले नियम ठरवून देण्यात आले आहेत. आणि ते वेगवेगळे आहेत.

काळजी नसावी. वेगवेगळ्या नियमांमुळे कन्फयुज व्हायची गरज नाही, इथं सगळ्या ठिकाणचे नियम आणले आहेत. काय आहेत हे नियम आधी वाचा आणि मगच लग्नाच्या तयारीला सुरुवात करा.

एक तर सगळीकडे लग्नांना पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टनसिंगच पालन करायचं आहे.  

आता मुद्दा उपस्थितीचा आणि इतर नियमांचा. 

ठाणे / मुंबई 

ठाणे – मुंबई या ठिकाणी राज्य शासनानं जो ५० लोकांच्या उपस्थितीचा नियम ठरवून दिलाय तो लागू करण्यात आला आहे. सध्या तिथं या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात असून जर नियम मोडल्याची टीप मिळाली तर प्रशासनाकडून धाड टाकून कारवाई केली जात आहे.

दररोज किमान ५ लग्नाच्या हॉलवर धाड टाकण्याचे तसे आदेशच ठाण्याच्या महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. सोबतच या लग्नाचा एक व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठण्याचे आदेश पण त्यांनी दिले आहेत.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला आता फक्त दोन्ही बाजूची मिळून १०० लोकच उपस्थित राहू शकणार आहेत.

औरंगाबाद 

जिल्हयात मंगल कार्यालय आणि इतर ठिकाणी कुठेही लग्न करत असाल तर तिथं राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

अमरावती विभाग

अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाचही जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या सूचनांनुसार, वधू आणि वर पक्ष दोन्ही बाजूंकडील मिळून फक्त २५ लोकांनाच परवानगी देण्यात आलीय.  

जळगाव  

जळगावमध्ये पण लग्नात फक्त ५० वऱ्हाडी असणं आवश्यक आहे. आणि जर नियम मोडल्याचा पोलिसांना कळालं तर कार्यालयात, मंडपात थेट धाड टाकण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत.

पुणे

पुण्यात लग्न आणि इतर शुभ कार्यासाठी पुण्यात थोडी जास्त जण उपस्थित राहू शकत आहेत. सध्याच्या नियमानुसार पुण्यात लग्न कार्यासाठी २०० लोक उपस्थित राहू शकतात. पण त्यासोबतच लग्नाचं व्हिडिओ शूटिंग करून त्याची एक सीडी ५ दिवसांच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करायची आहे. 

सातारा 

लग्न समारंभाला वधू कडील ५० आणि वराकडील ५० अशा १०० लोकांना उपस्थित राहायची परवानगी आहे.

कोल्हापूर 

कोल्हापुरात लग्नासोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रम, अंत्यंविधी, अंत्ययात्रा अशा सगळ्यांसाठीच ५० लोक उपस्थिती राहू शकतात.

सांगली 

राज्य सरकारनं लग्न समारंभ आणि इतर शुभ कार्यांसाठी ५० लोकांची जी मर्यादा ठरवून दिलीय तीच मर्यादा सांगलीत अनिवार्य केली आहे.

तसंच लग्नातं चुकून एखादा पाहूणा कोरोनाची लक्षण असलेला आला आणि पुन्हा त्या पाहुण्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लगेच करता यावं म्हणून लग्नात आलेल्या इतर पाहुण्यांची आणि माणसांची नाव पण लिहून ठेवायची आहेत.

त्यासोबत तिथं उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाच थर्मल स्क्रिनिंग करणं आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील लग्नासाठी ५० लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. आणि जर यात कोणी पाहुणा इतर राज्यातून येणार असेल तर त्यांना दहा दिवसांच होम क्‍वारंटाइन सक्तीचं केलं आहे.

हे सगळे नियम बघा आणि मगचं पुढच्या तयारीला लागा नाहीतर नवऱ्याला पहिली रात्र जेल मध्ये पण काढायला लागू शकते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.