तिघा भावांना मार्केटिंगची आयडिया सुचली आणि सुरु झाला रूपाच्या चड्डीचा प्रवास
२०१७ मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, रुपा इनरवेअरचा.
भाई अगर हम रूपा की चड्डी पहनते है तो रूपा क्या पहनती है ?
व्हिडिओ बघून गडाबडा लोळून, पोट धरून हसलो. एवढं खो खो हसताना सुद्धा नाजूक जागा सांभाळण्याचा जो कम्फर्ट दिला होता ना रूपाने..राव एकदम लाजवाब. मग रुपाचं ते वाक्य एकदम तंतोतंत लागू पडत ते म्हणजे
ये आराम का मामला है !
कळायला लागलं त्या वयात पहिल्यांदा सांभाळून घेतलं होतं ते रूपानेच. सलग वर्षभर रदड रदड रदडल्यावर हिला ठिगळं लागायची. ठिगळं लागली तर सहाएक महिने जायची. त्यामुळे मलाच नाय तर संबंध भारतभर अजून ही रुपा पोरांचा, पुरुषांचा आणि म्हाताऱ्यांचा कम्फर्ट बघते. समस्त पुरुष वर्गाच्या आयुष्यातली जणू देवताच ही रुपा.
हा रुपा ब्रँड असाच नाही झाला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात ते काय उगाच नाही. अशाच समस्त पुरुष वर्गाची लज्जा रक्षण करणारी रुपा अंडरवेअरच्या निर्मितीची ही गोष्ट.
तर तीन तरुण मुलं होती. एक पी. आर अग्रवाल, जी. पी अग्रवाल आणि के.बी अग्रवाल. हे तिघे भाऊ आपल्या वडिलांच्या कापड दुकानात काम करायचे. जशी आत्ताची दुकान असतात का तसंच त्यांच्या दुकानात चड्ड्या विक्रीचा कार्यक्रम चालायचा.
दुकानात काम करता करता या भावांच्या लक्षात आलं की, चड्डयांची विक्री जास्त होते. चड्यांना मार्केट आहे त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता कापड दुकानात नोकरी काय करायची नाही, आपण आपलं कापड व्यवसायात उतरुया. आणि फक्त चड्डयाच नाही तर मोजे, स्टॉकिंग्स हे सुद्धा विकायला सुरुवात केली.
पटना मध्ये या भावांनी आणि त्यांच्या वडिलांनी १९६८ मध्ये बिनोद होजिअरीची सुरुवात केली. हळूहळू धंद्यात जसा जम बसू लागला तसं या पोरांनी रूपाची मुहूर्तमेढ रोवली. जेव्हा रुपा ब्रँडची सुरुवात झाली तेव्हा जास्त असा काही पैसा या पोरांकडे नव्हता. विक्रीची संसाधन सुद्धा मर्यादीतच होती. पटना मध्ये त्यांचा एक एजंट होता जो मेड-टू-ऑर्डर शिपमेंट असणाऱ्या रिटेल ग्राहकांना जोडायला मदत करायला लागला.
तोपर्यंत तरी रूपाचा बिजनेस वन-ऑन-वनच सुरु होता. तयार झालेला माल ठेवायला जागा होती ना तो बल्क मध्ये विकण्याची काय सोय होती. पण या भावंडांच्या मेहनतीचे परिणाम रुपाची उत्पादन क्षमता वाढली. त्यांनी लगेचच बाजूच राज्य असलेल्या पश्चिम बंगालकडे आपला मोर्चा वळवला. कारण त्यांना माहीत होतं पश्चिम बंगाल मोठी बाजारपेठ आहे आणि हळूहळू ते मार्केट पण काबीज केलं.
पुरुषांसाठी बनियान, अंडरवेअर, बॉक्सर तर महिलांसाठी अंडर गारमेंट्स लहान मुलांसाठी इनरवेअर अशी रेंज बाजारात आणली. रूपा ब्रॅण्डची Rupa Frontline, Softline, Euro जास्त फेमस आहे.
आज भारतात एकही घर असं सापडणार नाही ज्या घरात रूपाची एन्ट्री झाली नसेल. या रूपाची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स डोमजुर (पश्चिम बंगाल), तिरुपुर (तमिलनाडु), बेंगलुरु (कर्नाटक) गाजियाबाद (एनसीआर) याठिकाणी आहेत. नाही म्हंटल तरी दिवसाला सात लाख चड्ड्या इथं तयार होतात.
सुरुवातीच्या काळात होजिअरी सारख्या दुकानात मिळणाऱ्या या चड्ड्या आता Amazon, Flipkart, Myntra अशा वेबसाइटवर पण मिळतात. कोरोनाच्या काळात जेव्हा जग मंदीच्या सावटाखाली होत तेव्हा रुपाचा वेणू गगनाला भिडत होता. रूपा ने 1,261.22 करोड़ रुपये फायदा मिळवला होता.
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असतात. मात्र वस्त्र म्हणजे चड्डी जी सदैव रक्षणासाठी तत्पर असते.