भांडुपच्या चाळीतल्या चिमुरडीने भारताचा तिरंगा इंग्लिश खाडीवर फडकवला होता

इंग्लंडच्या डोव्हर तटापासून फ्रान्सच्या तटावरील केप ब्लॅकपर्यंतचा हा खतरनाक धोकादायक सागरी मार्ग रुपाली रेपाळेनं पार केला तेही अवघ्या १२ व्या वर्षात. भांडुपच्या एका चाळीत राहणाऱ्या चिमुरड्या पोरीनं १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी इंग्लिश खाडीवर तिरंगा फडकवला. 

अशा या रुपालीच्या जिद्दीजी गोष्ट.

रामदास रेपाळे हे माथाडी कामगार, धड्डाकडा गडी. या रेपळ्यांनी जिद्दीन आपली लेक रुपालीला पाण्यात उतरवलं. पोहण्याची आवड निर्माण केली. गेटवे ते धरमतर पोहोणाऱ्या रुपालीच्या मनात रेपाळ्यांनी इंग्लिश खाडी रुपालीने जिंकायलाच हवी, असा विश्वास मनात रुजविला. तो सार्थ ठरला.

१ ऑगस्ट १९९४ ला रेपळ्यांनी रुपालीस घेऊन लंडनकडे निघायचे होते. पण २७ जुलैपर्यंत या मोहिमेसाठी लागणारी रक्कमच जमा झाली नव्हती. दोन लाख रुपये तरी हवे होते. मित्र सुरेश कोपरकर मदतीस धावले. ते रेपळ्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांकडे घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेत १ लाख रुपये दिले.

माथाड़ी नेते शिवाजीराव पाटलांनी ही मदत केली. तरीही अपेक्षित रक्कम जमली नाही. लंडनला आधार द्यायला कोणी नाही. अशा परिस्थितीत रुपालीसह त्यांनी लंडनकडे भरारी मारली. रुपालीचे कोच सुबोध सुळेही बरोबर होते. लंडनला पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी व्हिक्टोरिया शहरात ते पोहोचले. तेथून डोव्हरला गेले. डोव्हर गावातील एका साध्या लॉजवर रेपाळ्यांनी मुंबईहून नेलेले सामान टाकले. सामानात काय होते. तर मुंबईहून रुपालीच्या आईने दिलेले मीठ, मसाले, तांदूळ, लोणची.

या वस्तूनिशी रामदास रेपाळे तिथे स्वतःच जेवण बनवू लागले. कारण लंडनचा खर्च परवडणारा नव्हता. पुढील मोहिमेसाठी पैसे पुरवायचे होते. रोज जेमतेम चार पौंड ते खर्च करीत, तेही भाजी वगैरे घेण्यासाठी. रुपालीसाठी त्यांनी तिथे एक स्विमिंग सूट घेतला. त्याची किंमत ९० पौंड तीच काय त्यांची लंडनमधील मोठी खरेदी.

लंडनमधील वास्तव्यात त्यांनी कडक थंडीत चहा प्यायचे टाळले. खर्च वाढेल, पैसे संपतील चहा पंचवीस रुपयांना पडतो. एक हजार पौंड तर बोटीचा खर्च, डोव्हर गावातून मरिना बीचवर ते रुपालीस घेऊन चालत प्रॅक्टिससाठी जात. एक तासाची ही ‘वॉकिंग परेड’. लंडनवासी या परेडकडे पाहून कुचेष्टेने हसत. इंडियातील एक छोटी मुलगी इंग्लिश खाडी पार करायला आलीय.

तिच्याकडे प्रवासासाठीही पैसे नाहीत ही लंडन मधल्या लोकांची वृत्ती. दोन दिवसांनी ती नष्ट झाली. कारण चौथ्याच दिवशी रुपालीने चॅनल असोसिएशनची टेस्ट दिली आणि फक्त चार दिवसांच्या प्रॅक्टिसनंतर रुपाली ही अवघड टेस्ट पास झाली. लंडनमध्ये तिच्या नावाची चर्चा सुरू झाली.

१५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी पहाटे पाच वाजून ४२ मिनिटानी चिमुरड्या रुपालीने इंग्लडच्या किनाऱ्यावरून इंग्लिश खाडीत सूर मारला. महाकाय लाटांना चिरत ती पुढे झेपावू लागली. ती समुद्रात आणि बोटीत पायलट मायक ओराम, रामदास रेपाळ, कोच सुळे आणि परीक्षक.

मध्येच हवामान बिघडले. पायलट ओराम म्हणाला, पुढे जाता येणार नाही. रुपालीला इकडेच थांबवा रामदास रेपाळे म्हणाले, ते शक्य नाही. रुपालीची जिद्द असेल तर ती पुढे जाईल. यावर रुपाली म्हणाली, मी ओके आहे.

लाटांशी प्रतिकार करीत रुपाली पायलट बोटीच्याही पुढे निघाली तेव्हा परीक्षकही म्हणाले, पुढे चला.

१६ तासांचा हा सागरी प्रवास रुपालीने अधूनमधून वडिलांनी दिलेल्या ब्लॅक टी आणि त्यात १ चमचा ग्लुकोजवर पूर्ण केला. शेवटपर्यंत ती तशी उपाशीच राहिली. वडिलांकडे देण्यासारखं इतकंच होत. रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी तिने फ्रान्सचा किनारा गाठला. इंग्लिश खाडीवर स्वातंत्र्यदिनीच म्हणजे १५ ऑगस्ट १९९४ ला तिरंगा फडकला आणि जगभरातील प्रसारमाध्यमांनी रुपालीला डोक्यावर घेतले. किनाऱ्यावर बी.बी.सी. आणि पीटीआयचे वार्ताहर स्वागतासाठी उभे होते. बोटीवरही अभिनंदनाचे फोन खणखणू लागले. दोन दिवसांनी रुपाली भारतात परतण्यासाठी ‘हिथ्रो’ विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात चढली आणि वैमानिकाने तिचे जाहीर स्वागत केले. चिमुरड्या रुपालीच्या स्वागतासाठी, अभिनंदनासाठी विमानातच झुंबड उडाली.

त्या दिवशीच्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांनी ही रुपालीच्या यशाचा गौरव केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मिळविलेले रुपालीचे यश मोठे आहे. तिने फ्रान्सचा किनारा गाठला. त्याआधी पंधरा दिवसात भारतातल्या दोन मुलांनी इंग्लिश खाडी पार केली होती. त्यापैकी एक चेन्नईचा आर. कुत्रलिकेश्वरन आणि दुसरा मुंबईचा रिहेन मेहता. दोघाकडेही लंडन वास्तव्यासाठी आणि साहसी मोहिमेसाठी भरपूर पैसा व सरकारी मदत होती. चेन्नईच्या कुत्रलिकेश्वरन तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी साडेआठ लाख रुपये दिले. शिवाय त्यांच्या ‘कोच’ला अडीच लाख वेगळे.

लंडनमधील भारताच्या हायकमिशनरला जयललिता यांनी फोन करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितल्या. खास गाडीचीही व्यवस्था होती. पण इकडं महाराष्ट्राची रुपाली डोव्हर गावातून मरिना बीचवर तासाभराचं अंतर पायी चालत जायची.

कर्ज काढून रेपाळ्यांनी हे घडवलं. महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले. पण मुंबईत पाय ठेवताच देणेकरी रेपाळ्यांच्या दारात उभे राहिले.

लंडनमध्येच रुपालीला माध्यमांनी विचारलं, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तू किनारा गाठलास कसा? रुपाली जे म्हणाली ते शब्द इंग्लिश खाडीतील महाकाय लाटांची मस्तीही खाली उतरवणारं होतं. ती म्हणाली, मी इंग्लिश खाडी पोहायला जाणार म्हणून माझ्या ब्राईट शाळेतील सर्व मुला-मुलींनी दोन-पाच रुपये काढून दहा हजार रुपये दिले.

शाळेनेही ५ हजार दिले. पण मुलांनी दिलेल्या त्या दहा हजार रुपयांनीच मला इंग्लिश खाडीचा किनारा दाखवला. किनारा गाठला नसता तर त्या मुलांना मी काय तोंड दाखवले असतं? मला प्रतिकूल परिस्थितीशी बिघडलेल्या हवामानाशी झुंज देत किनारा गाठेपर्यंत पोहावेच लागले.

माथाडी कामगाराच्या मुलीने फ्रान्सचा किनारा गाठला. महाराष्ट्र सरकार मात्र विश्वविक्रमी रुपालीच्या पर्यंत पोहोचले नाही. आठ दिवसांनी वृत्तपत्रात एक फोटो छापून आला होता. रिहेन मेहता त्याच्या वडिलांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या दालनात रिहेनच्या विजयाचा केक कापत होता. रेपळेंच्या दारात मात्र देणेकरी उभे होते.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.