रुपया इतिहासातल्या निच्चांकी पातळीवर कोसळला आहे….

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे. काल तर रूपयाने सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. एका डॉलरसाठी तब्बल ७८ रुपये २८ पैसे मोजावे लागतायत. 

म्हणजे वरचेवर रुपया ढासळतोय. रुपयात येणार्‍या काही पैशांची घसरण आणि वाढ तुम्ही गांभीर्याने घेत नसाल पण एक गोष्ट लक्षात घ्या कि, याचा तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो.

पण रुपया ढासळणे म्हणजे काय तर,

डॉलर मजबूत होत चाललाय अन रुपया घसरला याचा अर्थ एवढाच की बाजारातील डॉलरची मागणी वाढलीय आणि रुपयाची मागणी कमी झाली आहे.

रुपयाची घसरण ही किती मोठी समस्या आहे हे उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुम्हाला कोणतीही वस्तू आयात करण्यासाठी १ लाख डॉलर्स द्यावे लागतील. या वर्षाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सुमारे ७५ रुपये इतकं होतं. म्हणजेच या आयातीसाठी ७५ लाख रुपये मोजावे लागलेले.

परकीय चलन बाजारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाची घसरण म्हणजे भारतीय चलनाची किंमत कमी होत आहे. म्हणजेच, तुम्हाला जर का अमेरिकेतून किंवा कोणत्याही देशातून काहीही गोष्टी आयात करायच्या असतील त्यासाठी आधी पेक्षा अधिक पैसे द्यावे लागतील. अमेरिकेतून काही मागवायचे असेल तर तुम्हाला रुपयांमध्ये नाही तर डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील.  याचाच अर्थ, कमी माल आयात करण्यात पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

डॉलरच्या वाढत्या किंमतीची भारतावर काय परिणाम होतील ?

रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी प्रवास महागणार आहे.

  • कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार.

भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा तेलाचा आयातदार देश आहे. आधीच रशिया युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यात. त्याही आधी तेलाच्या किमती गेल्या वर्षापासून सातत्याने वाढत गेल्याने भारताच्या विदेशी चलन साठ्यावर दबाव निर्माण झालेला आहे. 

  • त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी भडकणार – 

भारतातील सामान्य वर्गावरचं सर्वात मोठं  संकट म्हणजे  येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी भडकण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने देशांतर्गत महागाई दरही वाढण्यात हातभार लागेल –

शिवाय सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंबाबत भारत हा जवळपास सर्वस्वी आयातीवरच अवलंबून असल्याने त्याचाही भार विदेशी चलनसाठ्यावर पडलेला तर आहेच, पण आता डॉलर महागल्यामुळे त्याही महाग झाल्या आहेत.

मात्र आजच्या तारखेत..

रुपया ७८ रुपयांनी घसरला आहे. अशा परिस्थितीत एकाच वस्तूसाठी ७५ लाखांऐवजी ७८ लाख रुपये जास्त मोजावे लागतील. म्हणजेच ३ लाख रुपयांचे नुकसान. हा आकडा केवळ १ लाख डॉलर्सच्या आधारे काढण्यात आला आहे, तर आयातीचे आकडे लाखो, करोडो डॉलर्सचे असतात. 

या उदाहरणावरून कळलं असेल की रुपयाचे मूल्य घसरल्याने भारताचे किती मोठे नुकसान होत आहे.

मात्र रुपया ढासळण्याचं कारण काय ?

देशांतर्गत व्यापारातील निरस वातावरण, विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारा भांडवलाचा ओघ आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावर त्याचा परिणाम होतो.

मग विदेशी गुंतवणूकदार पैसे का काढून घेत आहेत ?

कारण सध्या अमेरिकेत देखील महागाईची समस्या चालू आहे. तेथील महागाईचा दर ४० वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून झपाट्याने वाढत आहे. मे महिन्यात तो ८.६ टक्क्यांवर होता.

भारतातील महागाई देखील खूप वाढली आहे आणि मे महिन्यात महागाईचा टक्का हा ७ टक्क्यांच्या आसपास होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने ज्याप्रमाणे गेल्या दीड महिन्यात दोनदा ९० बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, त्याचप्रमाणे यूएस फेडरल रिझर्व्ह बँकही दरवाढीचा विचार करत आहे. आणि ही दरवाढ २८ वर्षांमधली सर्वात मोठी वाढ असू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

त्यामुळे अशा परिस्थितीत परकीय गुंतवणूकदार आपले पैसे शेअर बाजारातून काढून अमेरिकेसारख्या देशात गुंतवू शकतात, जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळू शकेल. परदेशी गुंतवणूकदार भारताच्या भांडवली बाजारात पैसे गुंतवतात कारण कि भारतातला परतावा हा अमेरिकेतल्यापेक्षा जास्त असतो. 

तसंच, परदेशी गुंतवणूकदार जगभरातील बाजारपेठांमध्ये पैसे गुंतवतात आणि जिथे हे लोक पैसे गुंतवतात, तिथे बाजार चालतो.

भारतात अर्थव्यवस्था स्थिर व विकासशील आहे असं अर्थव्यवस्थेचे चित्र देखील निर्माण करण्यात मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आल्यामुळे भारतात इन्व्हेस्ट करण्याचा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत नाही.  

म्हणूनच भारतातीलही गुंतवणूक काढली जात आहे. म्हणजेच डॉलर्स बाहेर जात आहेत.  गुंतवणुकीचा ओघ भारतात येणं तर दूरच उलट बाहेर गुंतवणूक करणं वाढत जाईल. अशीच स्थिती राहिली तर, आपल्याला विदेशी कर्जे उचलण्याची नामुष्की येईल

मग प्रश्न येतो तो म्हणजे…रुपया आणि शेअर मार्केटचा काय संबंध?

शेअर मार्केटची हालचाल सर्व कंपन्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा मार्केटच्या सेंटीमेंट्सवर अवलंबून असते. या सेंटीमेंट्समध्ये साथीचा आजार असू शकतो जसं की, कोरोना आलेला तेंव्हा शेअर मार्केट पुरतं पडलं होतं.

देशात सरकार बदलतं किंव्हा अस्थिर होतं तेंव्हा शेअर मार्केट खाली वर होतांना दिसते. किंव्हा मग देशात कुठेही मोठा आर्थिक घोटाळा होतो तेंव्हा देखील शेअर मार्केट पडते. तसेच नोकऱ्या, व्याजदर, रुपयाचे मूल्य हे देखील सर्वात महत्त्वाचे आहे.

म्हणूनच फॉरेन करंसी मार्केटमध्ये रुपया कमजोर झाला तर त्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर दिसून येतो. त्याचप्रमाणे शेअर मार्केट चढत असेल तर रुपयाचे मूल्य देखील वाढते. म्हणजेच पाहायला गेलं तर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.

सोप्यात समजून घ्यायचं तर परकीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पैसे काढले तर त्यामुळे शेअर मार्केट कोसळेल, आणि त्याचा थेट परिणाम रुपयावर होईल.

आत्ताची परिस्थिती पाहता रुपया आता आणखी घसरणार का ?

सोमवारी –७८. २८ रुपया प्रति डॉलर. मंगळवारी- ७८ रुपये ३ पैसे झालेला…तर आज ७८. २८ रुपया प्रति डॉलर आहे. थोडक्यात रुपया अजूनही ७८ रुपयांच्या खालच्या पातळीवर आहे. 

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आतापर्यंत यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. २८ वर्षांतील सर्वात मोठी वाढ दिसून येईल, असा अंदाज आहे. अंदाज बरोबर असल्यास, रुपयाचे अवमूल्यन निःसंशयपणे होईल, कारण परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून अधिक पैसे काढून घेतील.

जर का ही घसरण सातत्याने चालूच राहिली तर भारतात मंदीचं सावट यायला फारसा वेळ लागणार नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.