कधीकाळी भारताचा रुपया अरब देशाचं अधिकृत चलन होतं.

आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नसेल पण अगदी सत्तरच्या दशकापर्यंत अनेक आखाती देशांमध्ये त्यांचं अधिकृत चलन म्हणून ‘रुपया’ हे भारतीय चलन वापरण्यात येत असे.

सौदी अरेबिया हे एकमेव राष्ट्र वगळता आखातातील जवळपास सर्वच देशांनी आपलं अधिकृत चलन म्हणून रुपयाला मान्यता दिली होती. ‘गल्फ रुपया’ या नावाने हे चलन ओळखण्यात येत असे. त्यावेळी आखाती देशांमध्ये आताएवढी आर्थिक सुबत्ता नव्हती, त्यामुळे बहुतेक देशांकडे स्वतःच असं अधिकृत चलनच नव्हतं.

१९५९ साली भारतीय रिजर्व बँकेने एक परिपत्रक काढून याविषयी माहिती दिली होती.

भारताबाहेर आखाती देशात भारतीय चलनाच्या वितरणास २९ एप्रिल १९५९ रोजी लोकसभेने आणि ३० एप्रिल १९५९ रोजी राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी देखील यासंबंधीच्या विधेयकावर आपल्या संमतीची मोहर उमटविली असल्याची माहिती रिजर्व बँकेकडून देण्यात आली होती.

या चलनास खास बाब म्हणून गृहीत धरण्यात यावं, असं रिजर्व बँकेकडून सांगण्यात आलं होतं. शिवाय हे चलन भारतात आर्थिक व्यवहार करण्यासाठी अवैध होतं. फक्त आखाती देशातील वापरासाठीच मंजुरी देण्यात आली होती. यावेळी रिजर्व बँकेने आखाती देशांसाठीच जारी करण्यात येणाऱ्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या होत्या आणि आधीच्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी साधारणतः दीड महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.

आखाती देशांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या चलनी नोटा भारतात छापल्या जात असत.

note 2
खास Z सिरीज पासून सुरू होणाऱ्या नोटा अरब देशांमध्ये वापरात येत असत. या नोटा भारतात मात्र चालत नसत.

या नोटांचं डिझाईन भारतीय नोटांप्रमाणेच असे फक्त त्यांचा रंग भारतीय नोटांपेक्षा वेगळा असे. १ रुपया आणि १० रुपयांची नोट लाल रंगाची असे, तर ५ रुपयांची नोट नारिंगी आणि १०० रुपयांची नोट हिरव्या रंगाची असे. नोटांवर ‘z’  या सिरीजपासून सुरु होणारा क्रमांक छापण्यात येत असे. भारताप्रमाणेच १ रुपयाची नोट भारत सरकारकडून तर इतर सर्व नोटा रिजर्व बँकेकडून जारी करण्यात येत असत.

विशेष म्हणजे हज यात्रेच्या काळातील रुपयांचं स्मग्लिंग टाळता यावं यासाठी या यात्रेसाठी देखील १० आणि १०० रुपयांच्या २ वेगळ्या नोटा छापण्यात आल्या होत्या. या नोटांना ‘हज नोटा’ असं म्हंटलं जाई. या नोटांचा सीरिअल नंबर देखील ‘HA’ या आद्याक्षरापासून सुरु होत असे.

साठच्या दशकानंतर घडलेल्या अनेक घडामोडी जसे की १९६६ साली इंदिरा गांधींनी केलेलं रुपयाचं अवमूल्यन आणि आखाती देशाच्या हाती लागलेलं तेलाचं घबाड यामुळे हळूहळू या देशांनी भारतीय चलनाचा त्याग करून आपलं स्वतःच अधिकृत चलन स्वीकारायला सुरुवात केली.

सर्वप्रथम १९६१ साली कुवेतने  रुपयाचा त्याग करून ‘कुवेती दिनार’ हे आपलं स्वतंत्र अधिकृत चलन वापरायला सुरुवात केली. त्यानंतर ४ वर्षांनी १९६५ साली बहारीनने ‘बहारिनी दिनार’ तर १९६६ साली कतारने ‘सौदी रियाल’ या चलनांचा देशाचं अधिकृत चलन म्हणून स्विकार केला.

ओमानमध्ये मात्र १९७० पर्यंत ‘गल्फ रुपया’ वापरात होता. १९७० साली ओमानने देखील ‘ओमानी रियाल’ या आपल्या अधिकृत चलनाचा स्विकार केला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.