जळगावची केळी खरेदी करण्यासाठी रशियात पहाटे ५ वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. देशाला स्वातंत्र्य मिळून फार काळ उलटला नव्हता. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची नुकतीच स्थापना झाली होती. राज्यातल्या शेतकऱ्यानां स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल चालू होती. शेतकऱ्याच्या मालाची खरेदीविक्री व्हावी, त्याला योग्य तो बाजार उपलब्ध व्हावा यासाठी  दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अर्थात महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ मर्यादित ची स्थापना करण्यात आली होती.

ही सहकारी संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल परदेशात जावा यासाठी देखील प्रयत्नशील असायची. त्यांच्याच प्रयत्नातून खानदेशातील केळी भारतातून बाहेर विकली जाऊ लागली होती. या केळ्यांचा किस्सा सांगितलं आहे तिथे एमडी म्हणून काम केलेल्या ना.श्री.कुलकर्णी यांनी.

१९६३-६४ साली मार्केटिंग सोसायटीची उलाढाल सहा कोटींना पोहचली होती. नफा सुद्धा चांगलाचं होत होता. यामुळेच त्यांनी एक मोठ शिवधनुष्य उचलायच ठरवलं. रशियाला दहा हजार टन केळी पाठवणे. केंद्र सरकारने तसा करार रशियन गव्हर्न्मेंट बरोबर केला होता. या निर्यातीमध्ये गुजरातच्या सरदार बागायत संस्थेचा ४०% आणि महाराष्ट्र राज्यसहकारी पणन महासंघाचा ६० % सहभाग असणार होता.

वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात केळी परदेशात पाठवायची तर काळजीपूर्वक नियोजन आखणे गरजेचे होते. रशियाला केळी पाठवायची म्हणजे जवळपास २५-३० दिवस टिकतील याचा शास्त्रीयदृष्ट्या विचार करावा लागणार होता.  म्हैसूरच्या राष्ट्रीय अन्न संशोधक संस्थेने ५४ दिवस केळी टिकवण्यासाठी एक औषधं सुचवले होते पण त्या औषधाची भारतात उपलब्धता नव्हती. इतर बऱ्याच अडचणी होत्या.

या अडचणी सोडवण्यासाठी एक शिष्टमंडळ तेव्हाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री मनुभाई शहा यांना भेटले. यात महाराष्ट्रातून कुलकर्णी तर गुजरात मधून वल्लभभाई पटेल नावाचे बागायत सोसायटीचे चेअरमन गेले होते. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की अजून केळी पाठवली नाहीत याचा मंत्रीमहोदयांना प्रचंड राग आला आहे. त्यांनी मनुभाई यांना सगळी वस्तूस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मनुभाई शहा यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं,

“काहीही झालं तरी केळी रशियामध्ये निर्यात झाल्याचं पाहिजेत. पाहिजे ती सगळी मदत मी तुम्हाला देतो. केळी पाठवण्याच्या व्यवहारात सोसायट्यांना नुकसान झाल्यास ते भरून देण्याची जबाबदारी माझी.”

नुसता बोलून ते गप्प बसले नाहीत. तिथल्या तिथे केळी टिकवण्यासाठीचे औषधं आयात करण्याची ऑर्डर त्यांनी देऊन टाकली. सगळी सरकारी चक्रे आता वेगाने फिरू लागली.

खानदेशमधील जळगाव आणि सुरत मधील बारडोली इथल्या सोसायट्यांना दुबईमध्ये केळी पाठवण्याचा अनुभव होता. आपला माल सातसमुद्रापार जाणार म्हणून उत्साही झालेल्या शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट पिकलेल्या केल्याचे लोंगर निवडले आणि एकावर एक रचून स्टेशनवर पाठवून दिले. केळ्यानी भरलेल्या ट्रेन्स मुंबईमध्ये दाखल झाल्या, पण तिथे वेगळीच परीक्षा त्यांची वाट पहात होती, मुंबईमध्ये बंदरावर शिपिंग कॉर्पोरेशनचे शीतगृहयुक्त जहाज या केळ्यांची वाट पहात उभे होते पण तिथे पर्यंत पोहचवण्यासाठी पोर्टट्रस्टचे इंजिन उपलब्ध होत नव्हते. गोदी पडलेली केळी मुंबईच्या उन्हामध्ये पिकू लागली.  अखेर राज्यसरकारकडून आलेल्या दट्ट्यानंतर हे केळी जहाजात पोहचले.

पहिल्यांदाच रशियाला केळी पाठवली जात होती. बंदरावर निरोपाचा जंगी कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी वेगवेगळ्या देशाचे वाणिज्य दूत आले होते. राज्यमंत्री खताळ यांच्या हस्ते जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पंधरा दिवसांनी हे जहाज रशियाच्या ओडेसा या बंदरावर पोहचणार होते. पाचोरयाचे संचालक केपीपाटील आणि कुलकर्णी असे दोघे हा माल उतरवून घेण्यासाठी रशियाला विमानाने निघाले. तिथली मरणाची थंडी, भाषेचा गंध नाही अशा ठिकाणी आपला टिकाव लागणार का ही काळजी होतीच त्याशिवाय केळी व्यवस्थित पोचतील का याचीदेखील चिंता होती. 

कुलकर्णी आणि पाटील यांचे विमान मॉस्कोमध्ये उतरले पण त्यांना विमानतळावरून बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यांचा व्हिसा ओडेसाचा होता, त्याशिवाय इतर कोणत्याही गावात जाण्याची त्यांना मुभा रशियन सरकारने दिली नव्हती. उपाशी पोटी रात्रभर वाट पाहून दुसऱ्या विमानाने ते ओडेसा या गावी पोहचले. एका भारतीय हॉटेलमध्येत्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी कुलकर्णी आणि पाटील हे दोघे बंदरावर आपले जहाज आले आहे का हे बघण्यासाठी गेले. शेकडो उभ्या असलेल्या जहाजामध्ये भारताचा झेंडा लावलेले जहाज ओळखणे त्यांना अवघड गेले नाही. उत्साहाच्या भरात त्यांनी जहाजाकडे धाव घेतली मात्र बंदुकधारी गार्डने त्यांना शिट्ट्या मारून थांबवले,” खबरदार, पुढे गेलात तर बंदुकीने खलास करेन.”

त्याकाळी रशियामध्ये कम्युनिस्ट हुकुमशाही सरकार होते. अख्खा देश एखाद्या बंदिस्त कोठडी प्रमाणे होता. प्रत्येक गोष्टी साठी लायसन्सची आवश्यकता असायची. भारतातून आलेल्या या शिष्टमंडळाकडे बंदरात येण्यासाठीचा परवाना होता पण जहाजावर जाण्यासाठीच लायसन्स नव्हत. त्यांनी खरोखर जहाजाच्या दिशेने एखाद पाउल टाकलं असत तर निसंशय त्या गार्डने त्यांना गोळ्या घातल्या असत्या. ती धमकी पोकळ नव्हती.

जहाजात चढण्यासाठीचा लायसन्स मिळवण्यासाठी सोळा किमी दूर असणाऱ्या एका वेगळ्या गावात जावे लागणार होते.  तिकडे जाण्यासाठी एक दिवस मोडणार होता, शिवाय पासपोर्ट सोबत घेऊन जावे लागणार होते जे हॉटेलची मालकीणबाईच्या ताब्यात होते. कितीही विनवणी केली तरी तिने ते पूर्ण भाडे भरून रूमसोडल्याशिवाय देणारं नाही असे सांगितले. नियम पाळण्यासाठी रशिया कुप्रसिद्ध होता. अनेक खटपटी करून कुलकर्णी आणि पाटील यांनी सगळी पूर्तता केली. त्यांना जहाजावर जाण्यासाठी आणखी एक दिवस वाया गेला.

जेव्हा ते जहाजावर पोहचले आणि शितगृहाचे झाकण उघडले तेव्हा दुर्गंधीचा मोठा भपका बाहेर आला. जहाजाच्या कप्तानाने सांगितलं की निघाल्यानंतर तीन चार दिवसातच शीतगृहाची यंत्रणा नादुरुस्त झाली होती. सहाजिकचं केळी कुजली होती. एवढे दिवस केलेले कष्ट वाया गेले होते.

पण या दोन्ही भारतीय अधिकाऱ्यांनी हार मानली नाही. परत सगळे कागदपत्रांचे सोपस्कार केले, वेगवेगळ्या रशियन अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, समजावून सांगितलं अखेर ते तयार झाले. तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता जहाजातून सगळा माल उतरवून घेण्यात आला. यातून खराब न झालेली एक नंबर क्वालिटीची व दोन नंबर क्वालिटीची केली बाजूला काढण्यात आली. उरलेला कचरा फेकण्यासाठी वेगळा काढण्यात आला.

सुदैवाने एवढ्या प्रवासातूनही चांगल्या राहिलेल्या केळ्याचे प्रमाण देखील भरपूर होते. एकएक केळे निवडून स्वच्छ कागदात गुंडाळून मॉस्कोवगैरे शहरात विक्रीसाठी पाठवून देण्यात आले. भारतातून आलेल्या केळ्यांच्या उत्सुकतेपायी सकाळी पाच वाजल्यापासून रशियन नागरिकांनी रांगा लावल्या. या अभूतपूर्व घटनेची बातमी रशियाच्या प्रत्येक वर्तमानपत्रात हेडलाईनला होती.

भारतीय शिष्टमंडळाने दोन नंबर दर्जाची केळी अनाथाश्रम, चर्च येथे वाटण्यासाठी देऊन टाकली. रशियन सरकारने जरी त्यांना त्रास दिला असला तरी तिथल्या सामान्य नागरिकांनी मात्र त्यांना शक्य तेवढी मदत केली. एकदा एक टॅक्सी ड्रायव्हर त्यांना भेटला जो राज कपूरचा मोठा फॅन होता. त्याने गांधी टोपी घातलेले हे भारतीय बघून त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत.

रशियामध्ये पाठवलेल्या केळ्यांच्या व्यवहारात महाराष्ट्र राज्य पणन संस्थेला तोटाच उचलावा लागला. मात्र केंद्र सरकारने मदत करून हा तोटा थोडाफार भरून काढला. मात्र या ट्रीपमुळे आपण केळीसारख्या नाशवंत पदार्थाची लांबवरच्या देशात निर्यात करू शकतो यावर शिक्कामोर्तब झालं होतं. यानंतर लगेच इटली, इंग्लंड इथेही केळी पाठवण्यास सुरवात झाली, शिवाय हॉंगकॉंगला लासलगावचे कांदे पाठवण्यास हा उपयोग कामी आला.

महाराष्ट्राच्या शेतकऱ्याना जगाची बाजारपेठ खुली झाली होती.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Shrijeet Phadke says

    लेखाच्या खाली संदर्भ सुधा देत चला

Leave A Reply

Your email address will not be published.