रशिया, युक्रेन वादात भारताला अधिक गहू निर्यात करण्याची संधी मिळू शकते
संधी ही आपली प्रतीक्षा करत असते. आपल्याला तिचं सोनं करता आलं पाहिजे. आता जागतिक बाजारपेठेत भारतासाठी एक संधी चालून आली आहे.
तर ही संधी आलीये, ती रशिया-युक्रेन युद्धामुळे. गुरुवारपासून या दोन देशात युद्धाला सुरुवात झाली आहे. याचा परिमाण शेअर बाजार, क्रूड ऑइलच्या किंमती या गोष्टींवर होताना दिसत आहेच. पण या दोन्ही देशांचा विचार केला तर हे सर्वाधिक गहू निर्यात करणारे देश आहेत.
जगातील २५ टक्के गहू निर्यात करण्यात रशिया-युक्रेनचा वाटा आहे.
२०१९ चा विचार करायचा झाला, तर जगभरात निर्यात करण्यात आलेल्या गव्हात रशिया-युक्रेन या दोन देशांचा वाटा हा २५ टक्के होता. यावरून खरा अंदाज येईल की, जगभरातील किती देशांना गव्हाची आयात करावी लागते.
रशिया हा गहू निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश आहे. निर्यात होणारा १८ टक्के गहू रशियातून जातो.
इजिप्त हा देश जगात सर्वाधिक गहू आयात करणारा देश आहे. इजिप्त दरवर्षी आपल्या देशातल्या १० कोटी नागरिकांची भूक भागवण्यासाठी साधारण ४ अरब डॉलरपेक्षा अधिक खर्च करतो. हा सर्व गहू इजिप्त रशिया आणि युक्रेनकडून घेतो. आकड्यात सांगायला गेलं, तर रशिया आणि युक्रेन इजिप्तची ७० टक्के मागणी पूर्ण करतात.
युक्रेन संकटाचा एक फायदा भारतीयांना होऊ शकतो. हे संकट भारतीयांना गहू निर्यात करण्याची संधी देऊ शकतं.
भारताच्या बफर स्टॉक मध्ये २.४२ कोटी टन अन्नधान्याचा साठा आहे. हा बफर स्टॉक आपल्या गरजेपेक्षा दुप्पट असल्याचे सांगण्यात येतं. याला केंद्रीय पूल सुद्धा म्हटलं जातं.
सध्या युक्रेन युद्धात होरपळतोय त्यामुळे या सर्व परिस्थितून सावरायला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. यामुळे चालून आलेल्या संधीचा फायदा भारतातील निर्यातदारांनी घ्यायला हवा असं बोललं जातंय.
युक्रेनमधून भारत या गोष्टीत आयात करतो
भारत युक्रेनमधून मोठ्या जनावरांपासून मिळणारी चरबी आणि खाद्य तेल आयात करत असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीचा भारतावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे तज्ञ् सांगत आहेत.
भारतातील गहू उत्पादन आणि निर्यात
सध्या भारत आपल्या शेजारच्या राष्ट्रांना गहू निर्यात करतो. यात सर्वाधिक वाटा हा बांगलादेशचा आहे. एकूण गव्हाच्या निर्यातीपैकी ५४ टक्के बांगलादेशचा वाटा आहे. त्याचबरोबर नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, येमेन, अफगाणिस्तान, कतार, इंडोनेशिया, ओमान आणि मलेशिया या देशांचा समावेश आहे.
जागतिक व्यापारातल्या पहिल्या दहा गहू निर्यातदारांमध्ये भारताचा समावेश नाही. तरी निर्यातीतल्या वाढीचा दर मागच्या काही वर्षात वाढला असल्याचं सांगण्यात येत आहे.
गहू निर्यातीतला त्याचा वाटा २०१६ मधील ०.१४ टक्क्यांवरून २०२० मध्ये ०.५४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जगातल्या एकूण उत्पादनात सुमारे १३.५३ टक्के वाटा असलेला भारत हा गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
देशात दरवर्षी सुमारे १०० दशलक्ष ७५.९ लाख टन गव्हाचं उत्पादन होतं आणि त्याचा मोठा भाग घरगुती वापरात वापरला जातो.
मात्र आता ही संधी साधण्यासाठी बफर स्टॉक मधलं धान्य जागतिक बाजारपेठेत आणून भारत निर्यात वाढवणार का? हे पाहावं लागणार आहे.
हे ही वाच भिडू: