कोळ्यांनी पारसी बाबाच्या नेतृत्वाखाली लढा दिला म्हणून मुघलांना मुंबई जिंकता आली नाही

गेली चारशे वर्ष झाली मुंबईला कोळी आणि पारसी समाजामुळे ओळखले जाते. कोळी हे मुंबईचे खरे रहिवासी तर पारशी हे बाहेरून आले. मुंबईच्या बाहेरून नाही तर भारताच्या बाहेरून पर्शिया म्हणजे इराण वरून.

शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. जहाजात भरून ही पारशी कुटुंबे गुजरातच्या किनाऱ्यावर आली. त्यांना तिथल्या राजाने आश्रय देखील दिला.

या पारसी समाजाचा पहिला माणूस मुंबईला आला तो म्हणजे दोराबजी नानाभॉय. हा दोराबजी सुद्धा गुजरातचाच होता. हुशार होता, चाणाक्ष होता. परकीयांची भाषा लगेच शिकला. त्याकाळी मुंबईवर राज्य पोर्तुगिजांचा होतं. दोराबजी पोर्तुगीजांकडे नोकरीला लागला.

त्यांनी त्याला आपला मॅनेजर म्हणून मुंबईला आणलं. पोर्तुगीजांच्या व्यापारात मदत करणे हे त्याचं मुख्य काम होतं. स्थानिक लोकांशी व्यवहार करणे, शेतकरी, कारागीर यांच्या कडून माल विकत घेणे तो जहाजात चढवून युरोपला पाठवणे यात दोराबजी नानाभॉय एक्सपर्ट झाले होते.

मोटाभाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोराबजी यांच्या मुळे आणखी काही पारशी कुटुंबे मुंबईला आली.

साधारण १६४० सालचा हा काळ असेल. मुंबई तेव्हा आजच्या सारखी महानगरी नव्हती. हे सात बेटांचं गाव पोर्तुगीजांच छोटंसं बंदर म्हणूनच ओळखलं जायचं. पोर्तुगीजांनी दिल्लीच्या मुघल बादशाहांशी तस चांगले संबन्ध ठेवले होते. त्यामुळे त्यांचा व्यापार निर्विघ्नपणे पार पडायचा. मुघलांचा स्वतःच आरमार नव्हतंच पण अरबी समुद्रावर वचक राहावी म्हणून जंजिऱ्याच्या सिद्दीला आवश्यक ते बळ मुघल देत आले होते.

पुढे १६६२ साली पोर्तुगालच्या राजाने आपली पोरगी इंग्लंडच्या राजाला दिली. या लग्नात हुंडा म्हणून मुंबईचं बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना देऊन टाकलं. दोराबजींनी पोर्तुगीजांकडून  नोकरी धरली.

सुरवातीला इंग्रजांना देखील या गावाचं महत्व एवढं माहित नव्हतं. पण जेव्हा शिवरायांनी सुरतवर दोनदा धाडी घालून मुघलांना धडा शिकवला तेव्हा इंग्रजांच्या जाणवलं की मुघलांच्या आश्रयाखाली राहून आपलेच नुकसान आहे. मराठ्यांच्या भीतीने त्यांनी आपले व्यापारी केंद्र सुरत वरून मुंबईला हलवले.

१६७१-७२ इस्ट इंडिया कंपनीने जेराल्ड ऑन्जियर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं. या गव्हर्नरने मुंबईत किल्ले बांधून संरक्षणाची सगळी व्यवस्था केली. फक्त मराठेच नाही तर आसपासचे सिद्दी पोर्तुगीज अशा अनेकांपासून आपला व्यापार सुरक्षित राहावा हा या किल्ल्या मागचा हेतू होता.

ईस्ट इंडिया कंपनीने सुरत वरून आपल्या वखारी मुंबईला हलवल्या हे औरंगजेब बादशाहला पसंत पडले नाही.

अशातच चाईल्ड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने मुघलांच्या व्यापारी गलबतांवर ह्ल्ले केले. त्याने गंजी सवाई नावाचं भलं मोठं मुघल जहाजच ओढून इंग्रजांच्या हद्दीत आणले. त्यांच्या बद्दलच्या तक्रारी सुरतच्या मुघल अधिकाऱ्यांनी औरंगजेबाच्या कानावर घातल्या.

मराठ्यांचं पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाने आपला सरदार व जंजिऱ्याचा सिद्दी याकूब खानाला इंग्रजांना धडा शिकवण्याचे आदेश दिले. बाहेरून आलेल्या इंग्रजांनी आपला व्यापार खाऊन टाकला याचा सिद्दीला राग होताच. त्याने इंग्रजांचे समूळ उच्चाटन करायचे ठरवले.

१६८९ साली सिद्दी याकूब खान मोठी तयारी करून मुंबईवर चालून आला.त्याने शिवडीचा आणि माझगावचा किल्ला जिंकला.

त्या किल्ल्यावर तोफा चढवल्या . संपूर्ण पावसाळ्यात तो तिथेच ठाण मांडून बसला. अन्नान दशा झालेल्या इंग्रजांनी औरंगजेबाचे हात पाय पकडले. ज्याच्या साठी युद्ध सुरु झालं होतं तो जॉन चाईल्ड देखील मेळा होता. अखेर जबर खंडणी वसूल करून औरंगजेबाने याकूत खानाला परत बोलावले.

इंग्रजांना संपवण्याची संधी हुकल्यामुळे याकूब खान सिद्दीचा प्रचंड चडफडाट झाला पण हुकुमाची अंमलबजावणी करणे भाग होते. जाता जाता त्याने माझगावचा किल्ला उद्धवस्त करून टाकला.

या युद्धात इंग्रजांचे प्रचंड नुकसान झाले होते. ईस्ट इंडिया कंपनीला युद्धखोरी केल्याबद्दल इंग्लंडच्या राजाकडून कानपिचक्या देण्यात आल्या. मुघलांशी वैर पत्करू नका असे आदेश आले. कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान देखील झालं होतं. नव्याने सैन्य किंवा किल्ला उभारण्याची देखील ताकद उरली नव्हती.

अशातच मुंबईत प्लेगचे आगमन झाले. अनेक युरोपियन अधिकारी याचा शिकार झाले. कित्येकांनी मुंबई सोडली.

पुढचे काही वर्ष मुंबईची सगळी संरक्षण व्यवस्था ढासळली होती. आपल्या डोळ्यासमोर तिची हि अवस्था पाहून सिद्दीचा मोह अनावर झाला. त्याने १६९२ साली पुन्हा मुंबईवर हल्ला केला. जे काही उरलं सुरलं इंग्रज सैन्य आहे त्याला संपवून मुंबई जिंकायची आणि औरंगजेब बादशाहच्या चरणी अर्पण करायची असं त्याने मनाशी ठरवलं होतं.

पण त्याला वाटलं तितकं हे सोपं नव्हतं. इंग्रजांच्याही आधी त्याच्या आडवी आली कोळी सेना.

मुंबईचे खरे राजे कोण असतील तर कोळी. मच्छिमारी हा  व्यवसाय असला तरी हा समाज पराक्रमी म्हणून ओळखला गेला. अरबी सागरावर राज्य करणाऱ्या या दर्यावर्दी कोळ्यांना सोबतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभा केला होता. तलवार गाजवण्याची हिंमत त्यांच्यात पिढीजात चालत आली होती.

या कोळ्यांना सिद्दीच्या विरुद्ध एकत्र केले ते पारशी बाबाने. वर उल्लेख आलेल्या दोराबजी नानीभॉय यांच्या लेकाने.

रुस्तमजी दोराबजी हा वडिलांच्या नंतर इंग्रज सरकारमध्ये नोकरीला लागला होता. जेव्हा सिद्दीचं संकट मुंबईवर घोंगावू लागलं तेव्हा इंग्रज मोडून पडले होते. त्यांना मुघलांचा सामना करायची मानसिकता देखील उरली नव्हती. रुस्तमजींना या गावाचे महत्व माहित होते. जर मुंबई मुघलांच्या हाती पडली तर होणारा विनाश अटळ होता. म्हणूनच त्याने स्थानिक मच्छिमार कोळ्यांना एकत्र करून सेने बनवली.

अतिआत्मविश्वासात मुंबईवर चालून आलेल्या सिद्दीला या लढाऊ कोळ्यांनी जबर मार दिला. दोन तीन वर्षांपूर्वी इंग्रजांना हरवणारे सिद्दी रुस्तमजी आणि त्याच्या कोळी सेनेपुढे जीव मुठीत धरून पळून गेले. हा अपमानास्पद पराभव सिद्दीच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्याने फिरून मुंबईकडे पाहिले देखील नाही.

सहाजिकच याचा फायदा इंग्रजांनी घेतला. त्यांनी रुस्तमजींचे उपकार कधीही विसरले नाही. त्यांनी दाखवलेले शौर्य आणि धडाडी पाहून त्यांना पटेल ही पदवी दिली.

आजही इंग्लिश इतिहासात मुंबई टिकवण्याचे श्रेय रुस्तमजी दोराबजी पटेल यांना आणि त्यांच्या कोळी बांधवांना दिलेले आहे. दुर्दैव म्हणजे भारताच्या इतिहासकारांनी या घटनेकडे म्हणावे तेवढे महत्व दिले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.