बॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.
गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. स्थळ आहे लंडन.
रूथ एलिस नावाची एक बारबाला होती. ती मूळची नॉर्थ वेल्स मधील र्हील गावात राहणारी. वयाच्या चौदाव्या वर्षी डान्सर व्हायचं म्हणून शाळा सोडली. संध्याकाळी बारमध्ये वेट्रेसचं काम करू लागली. दिवसा मॉडेलिंग करू लागली. यातूनच तीच मन एका सोल्जरवर जडल. तो विवाहित होता. त्याच्यापासून रुथला अवघ्या सतराव्या वर्षी एक मुलगा झाला.
त्या पोराच्या बाबाने मात्र जबाबदारीची वेळ आल्यावर हिला टाकले. आयुष्याने रुथला पहिल्यांदा झटका दिला होता. पण तीच सौंदर्य हाच तिच्यासाठी शाप होता. एकामागून एक चुका तिच्याकडून होत राहिल्या.
तिच्या बारच्या मॅनेजरने तिला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं. यातून बऱ्याचदा ती प्रेग्नंट राहिली रुथला पण सोप्या पद्धतीने मिळणारा पैसा नको नव्हता. याच काळात तीच तिच्याहून दुप्पट वयाच्या माणसाशी लग्न झालं. पण तो होता दारुडा आणि शंकेखोर. तो कायम तिला मारायचा. रुथ बऱ्याचदा त्याच्या घरातून पळून जायची पण जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्यामुळे अखेर त्याच्याकडे परत यायची.
याच दरम्यान तिला एका फिल्म मध्ये एक छोटासा रोल मिळाला, त्यावेळी ती प्रेग्नंट होती. जेव्हा तिच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिच्या नवऱ्याने हे आपलं बाळ असल्याच मान्य करण्यास नकार दिला. रुथ परत रस्त्यावर आली. आता बारमध्ये डान्स आणि रात्रीचे कस्टमर यावरचं तीच घर चालू लागलं.
अशातच तिला भेटला डेव्हिड ब्लॅकली. जो तिच्यासारखाच कार रेसिंगचा आणि वाईन पिण्याचा शौकीन होता. रुथ त्याच्या प्रेमात पडली पण त्याला एक दुसरीच मुलगी आवडायची आणि त्या मुलीला दुसराच एकजण आवडत होता, जो एक माजी बॉम्बर पायलट होता. त्याच नाव डेसमंड क्यूसन होत.
अशा या गुंतागुंतीच्या लव्ह ट्रँगल मध्ये त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रचंड जलकुटेपणा निर्माण झाला होता. त्यातून रूथ एलिस आणि डेव्हिड यांच्यात नेहमी खटके उडायचे आणि मग डेव्हिड तिला मारहाण करायचा. अनेकदा तिची स्थिती चालता पण येत नाही अशी व्हायची. ती परत प्रेग्नंट राहिली होती पण तिचा गर्भपात झाला. तिच्या म्हणण्यानुसार, डेव्हिडने तिच्या पोटात बुक्की मारली होती त्यातून तिचा गर्भपात झाला होता.
एप्रिल मध्ये ईस्टर सप्ताह चालला होता, तेव्हाची ही घटना.
डेव्हिड रूथला कंटाळला होता. तो तिच्यापासून लपून मित्रांसोबत राहायचा आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागला शिवाय तिच्या फोन कॉल्सला पण उत्तर देत नव्हता. रविवारची संध्याकाळ, रूथने लोड केलेली रिव्हॉल्व्हर घेतली आणि नावाच्या पब जवळ गेली जो हम्पस्टीड हिल स्टेशनजवळ होता. डेव्हिड तिथे असण्याची तिने खात्री केली आणि जसा तो पब मधून बाहेर आला तशा तिने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडेपर्यंत तिने गोळ्या घातल्या. त्यातली एक गोळी चुकीच्या दिशेने जात बाजूने जाणाऱ्या स्त्रीच्या अंगठ्याला लागली.
नंतर रूथने शांतपणे पोलिसांना बोलवण्यास सांगितले, तिथेच पबमध्ये ड्रिंक घेत असलेल्या ऑफ-ड्युटी पोलिसांसमोर तिने आत्मसमर्पण केले.
डेव्हिडला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रूथ एलिसने आपल्या वकिलाला सांगितले होते की, कुसेनने आपल्याला लोड केलेली रिव्हॉल्व्हर दिली होती. ती कशी चालवायची ते पबमध्येच दाखवलं होत. कुसेन हा तिचा नवा बॉयफ्रेंड होता. पण त्यासंबंधी कुठलाच पुरावा नव्हता.
पुढे जूनमध्ये तिच्यावर खटला चालला होता तेव्हा तिने त्याबद्दल काहीच सांगितले नाही. सुटकेसाठी विनवणी करण्याला देखील नकार दिलेला. दोन दिवसांच्या सुनावणी नंतर ज्युरीने तिला दोषी ठरवण्यासाठी पंचवीस मिनिटे लावले आणि शेवटी तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
रुथने अगदी निर्विकारपणे हा निर्णय स्वीकारला. वकिलांनी तिला दयेचा अर्ज करायला सांगितलं. पण तिला कळाले होते की, यातून आपली सुटका होऊ शकत नाही. फाशी होईपर्यंत जेल मधल्या काळात ती अगदी शांत होती. कधी बायबल वाचायची, कोडे सोडायची तर कधी पत्रे लिहायची. पण आपल्या बरोबर जे झालं त्याबद्दल तीचे कम्प्लेंट नव्हते.
डेव्हिडची हत्या केल्याबद्दल आपल्याला मृत्युदंड होणे योग्यच आहे असा तिचा विश्वास होता. तिने लोकांना सांगितले,
“An eye for an eye and a tooth for a tooth. I am quite happy to die.”
१३ जुलै १९५५ रोजी तिच्या अखेरच्या सकाळी ती ६:३०ला उठली. तिला दारूचा पेग देण्यात आला. अगदी शांतपणे बसून तिने तो शेवटचा घोट घेतला. चर्चचे फादर आले आणि त्यांनी तिला शेवटचा आशीर्वाद दिला. बरोबर नऊ वाजता तिला फासावर चढवण्यात आलं.
पण तोवर इंग्लंडमध्ये लोकांची तिच्याबद्दल सहानुभूती वाढली होती. तिला फाशी होऊ नये म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. लोक म्हणत होते रुथची काही चूक नव्हती, तिच्या जागी कोणीही असते तर हेच केले असते. पण तिला द्या मिळू शकली नाही.
यावरून इंग्लंडमधल्या कायद्यांवरचं प्रश्नचिन्ह उभे राहिले. फाशी सारखी मध्ययुगीन शिक्षा आधुनिक काळातही चालू ठेवावे का यावर चर्चा सुरु झाल्या. अनेक विचारवंतांनी याचा विरोध केला होता. याचीच परिणीती पुढे जाऊन फाशीची शिक्षा रद्द होण्यात झाली.
रुथ एलीस ही फाशीवर जाणारी शेवटची इंग्लिश महिला ठरली. तिच्या फाशीमुळे अख्ख्या इंग्लंडमधून फाशीची शिक्षाचं रद्द झाली.
हे ही वाच भिडू.
- आयुष्यभर तो नाव बदलुन पाकिस्तानात राहिला, कथा भारताच्या ब्लॅक टायगरची.
- म्हणून ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशी देण्यात आली नव्हती.
- हसत हसत फासावर गेलेला सिंध प्रांताचा भगतसिंग : हेमू कलानी.