आयपीएलचा धुरळा अजून बसला नाय आणि महाराष्ट्राचा वाघ आता कोहलीचं रेकॉर्ड मोडू शकतोय

क्रिकेट आवडणाऱ्या गर्दीत एकदा जोरात आवाज देऊन बघा, धोनी कुणाकुणाला आवडतो? ९९.९९ टक्के लोकांचे हात फिक्स वर येणार. आणि हा प्रश्न तुम्ही चेन्नईमध्ये विचारला, तर गर्दीत नसलेलं पोरगंही हजार टक्के हात वर करणार. कारण तिकडं एक नियम आहे, पिक्चरमध्ये रजनी अण्णा आणि क्रिकेटमध्ये धोनी अण्णा म्हणजे काळीज.

रजनी अण्णाच्या पिक्चरमध्ये एक सीन फिक्स असतो, व्हिलन लोकं अण्णाला मारायला बघतात. अण्णा जरासा मार खातो आणि मग सगळ्या व्हिलन लोकांचा वन शॉट बाजार उठवतो. आता पिक्चरमध्ये कसं गोष्टी वाढीव करुन दाखवता येतात आणि तसंही रजनी अण्णाला काय अशक्य नसतंय. पण क्रिकेटमध्ये मात्र विषय खोल असतो. आता बघा ना, २०२० च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा बाजार उठलेला, सगळे धोनीअण्णावर टीका करू लागले.

२०२१ च्या सिझनमध्ये चेन्नईचं काय होणार याच्याकडं लय लोकांचं लक्ष होतं. पण चेन्नईला हिरो मिळाला, रजनीची एंट्री व्हावी तशीच याने पण एंट्री घेतली. आता रजनीचं नावही गायकवाड आणि या हिरोचंही. आता तुम्हाला लक्षात आलं असेलच, की हा हिरो कोण तर ऋतुराज गायकवाड.

गडी आपल्या महाराष्ट्राचाय, त्यामुळं भारी खेळला की, सगळ्यांना लय मनापासून आनंद होत असतोय. सध्या ऋतुराज चर्चेत आलाय तो विजय हजारे ट्रॉफीमधल्या कामगिरीमुळं.

आधी जरा ऋतुराजचे जुने दिवस बघुयात…

पुण्यातल्या पिंपरी-चिंचवडमध्ये ऋतुराजचं बालपण गेलं. थेरगावच्या दिलीप वेंगसरकर अकादमीमध्ये ऋतुराज प्रॅक्टिससाठी जायचा. त्याच्यातला क्रिकेटर इतका वांड होता, अंडर-१४ असतानाच गडी अंडर-१९ च्या टीममध्ये खेळायचा. त्याला भारताच्या अंडर-१९ टीममध्ये संधी मिळाली नाही, पण सोनं झाकायचं ठरवलं तरी झाकलं जातंय होय?

पुढं त्यानं क्लब क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला, महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवलं आणि गंभीर विषय म्हणजे, लहान वयातच थेट इंडिया ए टीममध्ये जागा मिळवली. ऋतुराजच्या रनांचे आकडे सातत्यानं कानावर पडत राहिले. आणि मग एक दिवस बातमी आली कि चेन्नई सुपर किंग्सनं त्याला २० लाख देत टीममध्ये घेतलं.

पहिलं वर्ष तर त्याला डगआऊटमध्ये बसावं लागलं, पुढच्या वर्षी चान्स मिळाला, तर गडी काय चालला नाही. त्याच्या स्पार्कबद्दलही चर्चा झाली, मग ऋतुराजचा दांडपट्टा असा काही फिरला की धोनी अण्णानंही तोंडात बोटं घातली. २०२० च्या आयपीएलच्या शेवटाला सनाट सुटलेली त्याची गाडी, २०२१ च्या आयपीएलमध्ये स्पीड पेट्रोल पिल्यासारखं पळायला लागली.

त्यानं समोरच्या टीम्सचा एवढा बाजार उठवला, की त्याची तुलना थेट तरण्या विराट कोहलीशी केली जाऊ लागली. भावानं थाटात ऑरेंज कॅप मारली, तेही वयाच्या २४ व्या वर्षी. चेन्नईत तर ऋतुराज इतका पॉप्युलर आहे की पुढच्या मॅचआधी तिकडं त्याचे भलेमोठे होर्डिंग्स नक्की लागणार. आणि टॅलेंटचं म्हणाल, तर चेन्नईच्या मॅनेजमेंटनं यावर्षी सहा कोटी काय उगाच नाय मोजलेत. त्यांना माहितीये की, या वाघात दम आहे.

आता बोलूयात सध्या सुरू असलेल्या ऋतुराजच्या बॅटिंगबद्दल-

भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सध्या विजय हजारे ट्रॉफी सुरू आहे. विराट असेल, बुमराह असेल, भारताचे बरेच सुपरस्टार याच स्पर्धेतून पुढं आले आहेत. ऋतुराज आपला मराठमोळा गडी, साहजिकच तो खेळतो महाराष्ट्राकडून. या सिझनमध्ये तो आहे महाराष्ट्राचा कॅप्टन, आता कॅप्टननं कॅप्टन सारखं खेळायला हवंच की.

ऋतुराजची बॅट असली बेक्कार बोललीये, की वाचून खुश व्हाल. पहिली मॅच होती, मध्य प्रदेश विरुद्ध, त्यांच्या पोरांनी मारले ३२८ रन्स. ऋतुराज ओपनिंगला आला आणि १३६ रन्सचा दणका उडवून दिला. ती मॅच आपण मारली. पुढची मॅच होती, छत्तीसगड विरुद्ध. आधीच्या मॅचचा किस्सा कमी होता की काय म्हणत, त्यानं या मॅचमध्ये १५४ रन्स मारले. वर छत्तीसगडचा एकही बॉलर त्याला आऊट करू शकला नाही. भावानं टीमला एकट्याच्या जीवावर जिंकून दिलं.

सगळीकडे दोन मॅचमध्ये दोन सेंच्युरी झाल्याची चर्चा सुरू झाली. वाघाच्या जिभेला रक्त लागलं, की तो काय सुट्टी देत नसतोय. तिसऱ्या मॅचमध्ये समोर होती, केरळची टीम. इथंही ऋतुराजनं हाणामारी केली आणि बोर्डावर लावलं सलग तिसरं शतक, तेही १२४ रन्ससह.

धोनीअण्णा एकदा म्हणाला होता, यंगस्टर्समध्ये स्पार्क दिसत नाही. चेन्नईच्या या रॉकेट राजानं आधी आयपीएल आणि आता डोमेस्टिक क्रिकेट गाजवून त्यानं मोठ्ठा फटाकाच फोडलाय. ज्याचा आवाज एकदम नाद आहे.

आयपीएलमधली त्याची कामगिरी बघून लय जण म्हणाले होते, हा एक दिवस कोहलीची जागा घेणार. जर त्यानी घेतलीच, तर महाराष्ट्राचं नाव उंचावलं जाणार भिडू. विजय हजारे स्पर्धेत, एकाच सिझनमध्ये चार शतकं मारायचं रेकॉर्ड सध्या तीन लोकांच्या नावावर आहे. पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली. आता आणखी दोन शतकं बसली, तर ऋतुराज भाऊ विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडणार हे फिक्स.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, विजय हजारे ट्रॉफीनंतर साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळं या मराठमोळ्या वाघानं असाच दंगा सुरू ठेवला, तर येत्या काही दिवसांत त्याची टीम इंडियातली जागा कायम होणार आणि गडी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच विजयाचा भंडारा उधळणार.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.