टीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७ सिक्स मारत राडा केलाय
चेन्नई, आपल्या महाराष्ट्रापासून हजार किलोमीटरवर असलेलं शहर. या चेन्नईत दोन मराठी लोकांची लय मजबूत हवा आहे. त्यातला एक जण मोठ्या स्क्रीनवर येतो, सिगरेट हवेत फिरवतो, त्याच्यामागं धुळीचं वादळ उठतं, भाऊची एंट्री म्हणजे अगदी बाप. अर्थात तो माणूस म्हणजे शिवाजीराव गायकवाड, आपला रजनीकांत.
दुसऱ्या एका गायकवाडनंही चेन्नईकरांवर असंच गारुड केलंय. हातात बॅट, काहीशी बारीक शरीरयष्टी, डोक्यावर पिवळं हेल्मेट अशा अवतारात तो मोबाईलच्या स्क्रीनवर जरी दिसला तरी चेन्नईपासून थेट पुण्यापर्यंत आनंद पसरतो.
हा पोरगा आहे आपला मराठमोळा ऋतुराज गायकवाड.
ऋतुराजची आज चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याने विजय हजारे ट्रॉफीत उत्तरप्रदेश विरोधात ७ बॉल मध्ये ७ सिक्स मारले आहेत.
विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या मॅच मध्ये ऋतुराज ने इतिहास रचला. ७ बॉल मध्ये ७ सिक्स मारले आहे. महाराष्ट्राने पहिल्यांदा बॅटिंग करतांना ३३० रन्स काढले. कॅप्टन ऋतुराज ने १५९ बॉल मध्ये २२० रन्स काढले. यामुळे सध्या ऋतुराज बद्दल चर्चा सुरु आहे. तसेच त्याला टिम बाहेर बसवल्याने बीसीसीआय वर टीका करण्यात येत आहे.
असा आहे ऋतुराजच्या क्रिकेटचा प्रवास.
२०१६ मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या ऋतुराजनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना सगळ्या क्रिकेट जगताला आपली क्षमता दाखवून दिली. त्याचा स्पार्क इतका खतरनाक चमकला की २०२१ च्या सिझनमध्ये ऋतुराजनं ऑरेंज कॅप पटकावली.
ऋतुराजच्या करिअरमधली पहिली मॅच कशी होती? अपयशी ठरल्यावर त्याच्या कॅप्टननी त्याला काय सल्ला दिला होता? आणि ऋतुराज धोनीबद्दल काय म्हणतो? ते पाहुयात.
ऋतुराज पुण्याचा, त्यानं अगदी लहान वयातच क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. अंडर-१६ असतानाच ऋतुराज अंडर-१९ संघातून खेळत होता. सुरुवातील ऋतुराज मिडल ऑर्डरमध्ये खेळायचा. पण एक दिवस त्याच्या कोचनं त्याला ओपनर म्हणून खेळण्याचा सल्ला दिला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं.
त्यानंतर ऋतुराजच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पडू लागला. भारतासाठी अंडर-१९ वर्ल्डकप खेळण्याची संधी हुकली तरी, त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याची इंडिया ए संघातही निवड झाली.
साल होतं २०१६. महाराष्ट्र विरुद्ध झारखंड अशी रणजी मॅच दिल्लीत सुरू होती. ऋतुराजची पहिलीच फर्स्ट क्लास मॅच. नेमका एक बॉल त्याच्या हाताला येऊन आदळला आणि त्याच्या बोटाला दुखापत झाली. आऊट झालेला ऋतुराज ग्राऊंडमधून थेट हॉस्पिटलमध्ये गेला आणि हाताला प्लॅस्टर गुंडाळूनच आला.
त्या मॅचवेळी झारखंडच्या टीमचा मेंटॉर म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीही संघासोबत होता. हाताला प्लॅस्टर असणारा ऋतुराज जेवत होता, ते बघून धोनी त्याच्या जवळ आला. त्याची चौकशीही केली, ऋतुराजनंही हातातल्या प्लॅस्टरवर धोनीची सही घेत तो क्षण जपून ठेवला.
पुढे ऋतुराजच्या नावापुढं धावांचे आकडे पडत राहिले आणि चेन्नई सुपर किंग्सनं २० लाख बेस प्राईसवर ऋतुराजला आपल्या संघात घेतलं. पहिला सिझन त्याला बेंचवरच बसावं लागलं. एकदा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स अशी मॅच सुरु होती.
आंद्रे रसेल तेव्हा चांगलाच फॉर्ममध्ये होता. डगआऊटमध्ये बसलेल्या ऋतुराजनं इनिंग संपल्यावर कॅप्टन धोनीला एक सल्ला दिला, ‘माही भाई, रसेल स्कुप और पॅडल नही करता. शॉर्ट फाईन लेग लेग हटाके डीप स्क्वेअर रख सकते थे.’ धोनीनं त्याचं म्हणणं ऐकलं आणि म्हणाला, ‘शार्प क्रिकेट माईंड. थोडा छोटा डालने का प्लॅन था, टॉप एज के लिए शॉर्ट फाईन रुका था. ऐसेही इन्व्हॉल्व्ह रेहना.’
पुढच्या वर्षी ऋतुराजला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली.
मात्र त्याआधीच त्याला कोविड झाला, त्यामुळं पदार्पण काहीसं लांबलं. पहिल्या तिन्ही मॅचेसमध्ये त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणं कामगिरी झाली नाही. पुढं मात्र ऋतुराज असा काही चमकला की त्यानं सलग तीन फिफ्टीज मारल्या. प्लेऑफ्समध्ये जाण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नईच्या दुःखावर त्याच्या बॅटिंगनं फुंकर घातली होती.
याच दरम्यान चेन्नईची मॅच होती रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध. नॉटआऊट ६५ रन्स करत ऋतुराजनं संघाला मॅच जिंकवून दिली आणि त्यावेळी नॉन स्ट्राईकला होता, त्याचा कॅप्टन एमएस धोनी. ऋतुराजनं एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत धोनीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
त्यात त्यानं सांगितलं होतं, ‘२०१६ मध्ये पहिल्या फर्स्ट क्लास मॅचवेळी माझं बोट फ्रॅक्चर झालेलं असताना, माही भाईंनी स्वतःहुन माझी चौकशी केली. २०२० मध्ये सलग तीनवेळा कमी स्कोअर करुन आऊट झाल्यावरही त्यांनी स्वतःहुन आले आणि आयुष्याबद्दल बोलत मला आत्मविश्वास दिला. त्यांच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर करणं हे माझं भाग्य आहेच, पण त्यांच्यासोबत २२ यार्डांच्या पिचवर उभं राहून मॅच फिनिश करणं हे स्वप्नापेक्षाही मोठं आहे.’
२०२१ मध्ये तर त्याच्या खतरनाक बॅटिंगमुळे पार बुमराहसकट सगळे बॉलर्स चाट पडले. आयपीएलमधली ऑरेंज कॅप, भारतीय संघात मिळालेली संधी, महाराष्ट्राचं नेतृत्व आणि डोमेस्टिक क्रिकेटमधली खतरनाक कामगिरी या सगळ्याच्या जोरावर ऋतुराजचं नाव आज कित्येक चाहत्यांच्या तोंडी आहे. एक मात्र आहे, ऋतुराजला दुसरी संधी मिळाली, तेव्हा त्यानं अपयशानं खचून न जात संधीचं सोनं केलं आणि आपल्याला आयुष्याभर लक्षात राहील अशी गोष्ट शिकवली.
विजय हजारे ट्रॉफीत ७ बॉल मध्ये ७ सिक्स मारून ऋतुराजने इतिहास रचला आहे. त्याच्या या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
हे ही वाच भिडू
- बिस्किटात ‘पार्लेजी’ आणि क्रिकेटमध्ये ‘नेहराजी’ म्हणजे फुल्ल टू रिस्पेक्ट
- सांगून खोटं वाटेल, पण धोनीला एकेकाळी प्रत्येक सिक्सचे ५० रुपये मिळायचे…
- युवराज, धोनी आणि पंतच्याही आधी खरा ‘धडाकेबाज’ यशपाल शर्मा होता…