या सांगलीकराने पुण्याला प्रत्येकवेळी सावरलं.

सदाशिव गोविंद बर्वे जन्मगाव तासगाव, सांगली जिल्हा. वडील संस्थान मध्ये दिवाण म्हणून काम करत होते. मात्र त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झालं. पुण्याच्याच सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांत विशेष पारितोषिके मिळवत पदवी प्राप्त केली. पुढे एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठाची पदवी मिळवली व आयसीएस परीक्षेतील यश प्राप्त केले.

त्या वेळी त्यांना परदेशात उत्तम संधी असूनही, मातृभूमीची सेवा करण्यासाठी स.गो. बर्वे भारतात परतले. आयसीएस म्हणजे त्याकाळचे आयएएस ऑफिसर, 

बर्वे यांची  पहिली पोस्टिंग अहमदाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम झाली. तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र हे एका विशाल मुंबई प्रांताचे भाग होते. बर्वेनी अहमदाबादमध्ये अनेक विकासकामे सुरु केली. तिथले तेव्हाचे रस्ते हे अतिशय खराब होते.

इंग्रज सरकारची राजवट होती. काम करण्याला अनेक मर्यादा येत होत्या. स.गो.बर्वेनी यातून एक कल्पक मार्ग शोधून काढला. अहमदाबादच्या काही महाविद्यालयांना संपर्क केला. तिथल्या प्राध्यापकांना बोलले व तरुण विद्यार्थ्यांना घेऊन आसपासच्या ग्रामीण भागातले रस्ते श्रमदानाने सुधारले.

ही त्यांच्या’ कामाची चुणूक होती. याच काळात अहमदाबाद येथे हिंदू-मुस्लीम धार्मिक  उसळल्या होत्या.

त्या त्यांनी कठोर व धाडसाने निर्णय घेऊन मोडून काढल्या आणि दं गल आटोक्यात आणली.ब्रिटीश सरकारमध्ये देखील एक  वेगळ्या धाटणीचा अधिकारी म्हणून त्यांची छाप पडली. अहमदाबाद पाठोपाठ सुरत, धारवाड येथे दाखवलेल्या कर्तुत्वामुळे  त्यांच कौतुक होऊ लागल.

वैयक्तिक जीवनातदेखील त्यांनी आपली बंडखोरी सोडली नाही. जून १९३८ मध्ये शरयू गुप्ते यांच्याशी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. ही त्याकाळची एक क्रांतिकारी घटना होती.

१५ ऑगस्ट १९४७ साली जेव्हा भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल तेव्हा ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. आता आपल राज्य आलं होतं. ते जास्तीजास्त कसे कल्याणकारी करता येईल याकडे बर्वेंचा कटाक्ष होता. यामुळेच ब्रिटीशांनंतर आलेल्या लोकशाही सरकारने देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला.

स्वातंत्र्यानंतर सगळ काही चांगलं होईल गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्य साकार होईल असच वाटत असताना एक दुर्दैवी घटना घडली.

राष्ट्रपिता महात्मा गांधींचीच हत्या करण्यात आली. ही हत्या ज्याने केली तो नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत होता. त्यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक देखील झाली.

यामुळे या कटामागे संघाचाच हात आहे अशी शंका व्यक्त होऊ लागली. यातूनच महाराष्ट्रभर दं गली उसळल्या. तिला जातीय रंग आला. ब्राम्हण समाजाची घरे जाळण्यात येऊ लागली.

 गांधीहत्या झाली, त्या वेळी स.गो.बर्वे परदेशात होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले व तातडीने परतीची फ्लाईट पकडली.

पुण्यात ब्राम्हण समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. संघाचे अनेक कार्यकर्ते पुण्याच्या पेठांमध्ये रहात होते. इथे जर दं गलीचा भडका उडाला असता तर तो लवकर आवरता आला नसता. लाखोजणानां यात फटका बसला असता.

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून स.गो.बर्वे यांनी काही कठोर निर्णय घेतले. त्यांनी पुणे शहरात संचारबंदी लागू केली. लष्कराला पाचारण केलं. तेव्हाचे लोक सांगतात की

” बर्वे साहेबांनी पुण्यात तोफ आणून ठेवली होती आणि शूट अट साईटचा आदेश दिला होता. बर्वे होते म्हणून पुणे दं गलीच्या आगीपासून वाचले.”

काही का असेना बर्वेनी तणावाची परिस्थिती संयमाने व धाडसाने हाताळली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने नव्याने स्थापन झालेल्या पुणे महानगरपालिकेचा पहिला आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक केली. ते साल होतं १९४९.

स.गो.बर्वेनी आयुक्तपदाचा कांर्यभार स्वीकारण्याआधी परदेशातील शहरापासून ते मुंबईपर्यंत म.न.पा.च्या कार्यपद्धती सखोल अभ्यास केला. त्यानुसार पूर्वतयारी व नियोजन केले. त्यांच्या कामाचा पाया शास्त्रशुद्ध होता. तसेच योग्य कामासाठी सुयोग्य अधिकारी हे सूत्रही पक्के ठरलेले असायचे.

पूर्वीच्या पुणे नगरपालिकेत पंचवीस वर्षांत जी कामे पूर्ण झाली नाहीत, ती कामे त्यांनी तीन वर्षांत पूर्ण केली.

रस्ते, पूल, पाणी, सांडपाणी, विज, गृहप्रकल्प, दवाखाने, बाजार, उद्याने असा विविधांगी विचार करून त्यांनी पुढील पंचवीस वर्षांसाठीचा ‘नगर आराखडा’ कालबद्ध नियोजन व खर्चासह तयार केला.

हडपसर, चिंचवड, सातारा रस्ता येथे औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. संभाजी उद्यान, पेशवे पार्क यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच आहे. पुण्याच्या भोवतीने रिंग रेल्वे फिरवण्याचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांच्या मनात होता मात्र काही कारणाने तो साकारला नाही.

आज सुप्रसिद्ध असणारे जंगली महाराज रोड आणि लक्ष्मी रोड हे दोन्ही रस्ते त्यांच्याच दूरदृष्टीची देण आहे. 

लक्ष्मी रोड पूर्वी पासून होता मात्र त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न मोठा झाला होता. या रुंदीकरणामध्ये एक गणपतीचे देऊळ आड येत होते. लोकांच्या श्रद्धेचा हा विषय होता. स.गो. बर्वे यांनी धाडसाने निर्णय घेऊन, रातोरात मंदिर हलवले; रस्ता रुंद केला. पुढे त्या गणपती मूर्तीचीही यथोचित पुनर्स्थापना केली.

आज पुण्याची नगररचनात्मक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली.यात स.गो बर्वे यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. म्हणूनच त्यांना आधुनिक पुण्याचे शिल्पकार अस म्हटल जातं.

पुढे त्यांना पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी केंद्रात बोलावून घेण्यात आलं.

त्यांचा नगरउभारणी क्षेत्रातील अभ्यास वादातीत होता. याचमुळे बर्वे यांच्यावर दिल्लीजवळील फरीदाबादच्या  उभारणीची जबाबदारी (१९५३) टाकली. पाकिस्तानातून आलेले हिंदू रिफ्युजी यांच्या वसाहती आणि औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचे काम बर्वेनी एका वर्षात यशस्वीपणे पार पाडले.

पुढे सी.डी.देशमुखांनी त्यांना केंद्रीय अर्थमंत्रालयात सहसचिवपदाची जबाबदारी दिली.

इम्पेरियल बँकेचे स्टेट बँकेत रुपांतर करणे, खाजगी विमा कंपन्याचे विसर्जन करून एल.आय.सी.ची स्थापना करणे यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी, उर्दू इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी भाषा मंडळावर चिटणीस म्हणून कार्य केले. मोठ्या द्वैभाषिक राज्याची विभागणी होत असताना विभाजन समितीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बर्वे यांनी उत्तम, निर्णायक कामगिरी बजावली. महाराष्ट्राच्या पहिल्या सिंचन आयोगाचे अध्यक्षपद त्यांनीच भूषवल.

पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोयना प्रकल्प निधीअभावी मागे पडत होता. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे दोन कोटी पन्नास लाख डॉलरचे कर्ज मंजूरीसाठी स.गो.बर्वेनी केलेलं काम उल्लेखनीय आहे.

याच यशवंतराव चव्हाणांचा स.गो.बर्वे यांच्यावरील विश्वास दृढ होण्यामागे आणखी एक घटना करणीभूत ठरली.

१२ जुलै १९६१. ही पुण्यासाठीची काळ रात्र ठरली. रातोरात पानशेतच धरण फुटले. निम्म पुणे शहर यात वाहून गेल. नव्यानेच निर्मिती झालेल्या महाराष्ट्राला हा धक्का न सोसवणारा होता. अनेकजण रस्त्यावर आले होते. या सगळ्यांना सहारा देण्याची गरज होती.

यावेळी यशवंतराव चव्हाणांना पहिली आठवण आली पुण्याच्या शिल्पकाराची. स.गो.बर्वेंची.

स्वतः मुख्यमंत्री पुण्यात आले.  स.गो.बर्वेंची उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. ‘सरकारी अधिकाऱ्यांच्या विश्रामगृहा’चे ‘वॉर रूम’मध्ये रूपांतर केले.

या काळात त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन रात्रंदिवस अथक परिश्रम केले. शहराची पुन:उभारणी केली. तो पर्यंत उभारण्यात आलेल्या पुनर्वसन छावणीमध्ये नागरिकांची सोय केली.  पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, दळणवळण, संपर्क साधने, वीजपुरवठा इत्यादी सर्वच गोष्टी वेगाने सुरु केल्या.

पानशेतच्या धरणफुटीनंतर पुण्याच्या भेटीला आलेल्या पंतप्रधान नेहरूंनी मदतकार्याबद्दल समाधान व्यक्त केल. आणि यशवंतराव चव्हाणांच्या सोबत स.गो.बर्वे याचं देखील कौतुक केलं. 

त्यांची नेमणूक महाराष्ट्र उद्योग खात्याचे सचिव म्हणून झाली. महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ, पिंपरी-चिंचवड परिसरात उभारलेला टाटा उद्योग समूह, कृष्णा-गोदावरी पाणीतंटा आदी कामांच्या संदर्भात बर्वे यांनी निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे पुणे परिसरात नवीन मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली गेली

.स.गो.बर्वे यांची अर्थविषयक प्रश्नांची समज, प्रशासनावरील पकड, नागरीनियोजनातील अभ्यास याचा उपयोग विस्तृतपणाने करता यावा यासाठी त्यांनी राजकारणात येणे गरजेचे आहे हे यशवंतराव चव्हाणांना वाटले. त्यांनी बर्वेना आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यातील शिवाजीनगर येथून निवडणूक लढवण्यासाठी तयार देखील केल.

 स.गो.बर्वे पुण्यात प्रचंड लोकप्रिय होते. ते तिथून निवडून देखील आले. यशवंतराव चव्हाणांनी त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्रीपदी केली.

पुढे वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना उद्योग खात्याची जबाबदारी दिली गेली. ठाणे, बेलापूर, खोपोली, पनवेल, चिपळूण, औरंगाबाद येथील औद्योगिक विकासाची मुळे ही बर्वे यांच्या कारकिर्दीतली आहेत.

त्यानंतर त्यांना केंद्रात नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून बोलावून घेण्यात आले. तिथे केलेल्या त्यांनी कार्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी प्रभावित झाल्या. स.गो.बर्वेंना उद्योग मंत्री करावे अशी त्यांच्या मनात इच्छा होती.

त्यासाठीच १९६७ ची ईशान्य मुंबईची लोकसभा पोटनिवडणूकचे त्यांना तिकीट दिले.

पण यामुळे नाराज झालेले नेहरूंचे एकेकाळचे सहकारी माजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन हे बंडखोरी करून उभे राहिले. कॉंग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. कृष्णमेनन यांची या मतदारसंघात बरीच पकड होती.

पण नुकताच स्थापना झालेल्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मुद्द्यावरून स.गो.बर्वेना पाठींबा जाहीर झाला आणि निवडणूक फिरली.

स.गो.बर्वेनी मातब्बर कृष्णमेनन यांचा पराभव केला. ही निवडणूक राज्यात व देशात गाजली. निवडणूक जिंकल्यानंतर पुढील वाटचालीच्या दृष्टीने बर्वे दिल्लीला गेले. तिथे त्यांना इंदिरा गांधी अर्थ किंवा उद्योग खाते देणार हे स्पष्ट होते. पण दुर्दैवाने दिल्ली येथेच स.गो बर्वे यांचे दु:खद निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी.

संदर्भ- आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.