काँग्रेसी असून पाटलांनी प्रतिज्ञा केलेली, “नेहरूंच्या चाणक्याला राजकारणातून कायमच संपवायचं..”

सदाशिव कान्होजी पाटील म्हणजेच मुंबईचा सम्राट स.का.पाटील. आपणाला माहित असतात ते म्हणजे,

जोपर्यन्त चंद्र सुर्य आहेत तोपर्यन्त मुंबई महाराष्ट्राला मिळून देणार नाही या त्यांच्या गर्जनेसाठी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील सर्वात मोठ्ठा व्हिलन हाच त्यांचा इतिहास आपणाला माहित आहे.

पण आपण कधी हा विचार करत नाही की मुंबई महाराष्ट्राला मिळून देणार नाही अशी जाहीर घोषणा करणारा नेता किती मोठ्ठा असू शकतो.

सका पाटील हे मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचे. एका शेतकरी कुटूंबात जन्मलेले ते पत्रकार झाले. त्यांचे वडिल पोलीस खात्यात अधिकारी होते. सका पाटील वकिलीचं शिक्षण घेवून मुंबईत आले. काही काळ वकिलीचे प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. मालवणमध्ये  राष्ट्रीय शाळा सुरू करून ते शिक्षक म्हणून काम देखील केलं.

सका पाटील मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट होण्यास सुरवात झाली ती बाॅम्बे मिल मजदूर युनियनची स्थापना झाल्यानंतर. पुढे हीच यूनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये विलीन झाली.

सका पाटील हे मुंबई काॅग्रेसचे काम करू लागल्यानंतर ते मुंबईचे पहिल्या फळीतील नेते म्हणून गणले जावू लागले. काही काळातच मुंबई काँग्रेस म्हणजे सका पाटील आणि सका पाटील म्हणजे मुंबई काँग्रेस हे समीकरण तयार झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात व्हिलन म्हणून छाप पडल्यानंतरच्या काळात देखील सका पाटीलांचा मुंबईचा डाॅन म्हणूनच दरारा होता. मोरारजी देसाई यांच्याशी त्यांचं चांगलं जमायचं. कामगार संघटनेचे नेतृत्त्व केलेले स का पाटील मुळात उजव्या विचारसरणीचे नेते होते.

पुढे काँग्रेसची ध्येय धोरणे डावीकडे झुकू लागल्यावर त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये मोरारजी देसाई आणि स.का.पाटील आघाडीवर होते.

पन्नासच्या दशकात भारताला समाजवादी विचासरणीकडे झुकवण्यात एका माणसाचा सिंहाचा वाट होता. तो म्हणजे,

वेंगालील कृष्णन कृष्ण मेनन उर्फ व्ही.के.कृष्णमेनन

हे कृष्णमेनन मूळचे केरळचे. त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. इकॉनॉमिक्स शिकताना मार्क्सच्या विचारांची ओळख झाली. इंग्लंडमध्येच राजकीय चळवळीत सक्रिय झाले. आपली विद्वत्ता आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी तिथे मोठं नाव कमावलं.  कडे भारतात स्वातंत्र्यलढ्याचा जोर वाढला होता आणि याला मदत करण्याचं काम व्ही.के.मेनन इंग्लडमधून करत होते.

त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, परराष्ट्र धोरणाचा अभ्यास पाहून पंडित जवाहरलाल नेहरू भारावून गेले होते. दोघांच्या लंडनमध्ये अनेकदा भेटी व्हायच्या आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण झाले. पुढे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि नेहरू पहिले पंतप्रधान बनले तेव्हा नेहरूंनी कृष्ण मेनन यांना भारताचा इंग्लंडमधला राजदूत बनवलं.

काही वर्षांनी व्ही.के.कृष्ण मेनन भारतात परत आले आणि इथल्या राजकारणात सक्रिय झाले. नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुएझ कालव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची शिष्टाई संपूर्ण जगभरात गाजली होती. नेहरूंच्या पररराष्ट्र धोरणावर त्यांचा प्रभाव जाणवून येऊ लागला.

पुढे तर त्यांना भारताचा संरक्षण मंत्री बनवण्यात आलं. देशाचे दोन नंबरचे सर्वात ताकदवान व्यक्ती बनले. त्यांचा गवगवा सर्वत्र होत होता. आंतरराष्ट्रीय अलिप्ततावादी चळवळीत देखील त्यांनी घेतलेले निर्णय गाजत होते. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला मुक्त करण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता.

पण १९६२ च्या चीन सोबतच्या युद्धात भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि मेनन यांचा राजकीय प्रभाव कमी होण्यास सुरवात झाली. चीनचे युद्ध आपण कृष्ण मेनन यांच्या मुळे हरलो असा निष्कर्ष विरोधी पक्षांनी काढला होता. नेहरूंना त्यांचा राजीनामा घ्यायला लावण्यास दबाव टाकण्यात आला. नेहरूंनी आपल्या दोस्ताला मंत्रिमंडळातून काढून टाकलं.

पुढे नेहरूंच्या मृत्यू नंतर व्ही.के.कृष्ण मेनन यांचं काँग्रेसमधील वर्चस्व कमी होत गेलं.

पुढे पंडित जवाहरलाल नेहरूंची सुपुत्री इंदिरा गांधी जेव्हा  पंतप्रधान बनल्या तेव्हा व्ही.के.कृष्णमेनन यांचे पुनरागमन होणार असं बोललं जाऊ लागलं. १९६७ सालच्या लोकसभा निवडणूक आल्या होत्या. इंदिरा गांधींनी काँग्रेसची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यांचे आणि पक्षातल्या जुन्या नेत्यांचे वाद वाढले होते.

जेव्हा तिकीट वाटपाची वेळ आली तेव्हा इंदिरा गांधींनी कृष्ण मेनन यांना उत्तर मुंबईमधून उमेदवारी दिली.

कृष्णमेनन हे गेली दहा वर्षे मुंबईचे खासदार म्हणून निवडून यायचे. मुंबईमध्ये कामगार संघटनांच्यामध्ये त्यांची लोकप्रियता होती. चीन युद्धात त्यांचं नाव बदनाम झालं असलं तरी या वेळी देखील ते सहज निवडून येतील असच म्हटलं जात होतं.

फक्त एकच माणूस होता जो त्यांच्या खासदारकीच्या आड आला. तो म्हणजे मुंबई सम्राट स.का.पाटील

सका पाटलांनी या पूर्वी देखील काँग्रेस मध्ये असून कृष्ण मेनन यांना पाडण्याचा  प्रयत्न केला होता पण तेव्हा नेहरू जिवंत असल्यामुळे त्यांना मोठं यश मिळालं नव्हतं. मात्र यंदा त्यांनी कृष्ण मेनन यांची उमेदवारी आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवली.

इंदिरा गांधींच्या पर्यंत जाऊन त्यांनी मुंबईच यंदाचं वातावरण करूसन मेनन यांच्या विरोधात आहे असं समजावून सांगितलं. पंतप्रधानांना देखील कृष्ण मेनन यांचं ओझं नको झालं असावं. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे खास समजले जाणारे माजी सनदी अधिकारी स.गो.बर्वे यांना काँग्रेसचं तिकीट देऊ केलं.

दुखवलेल्या कृष्ण मेनन यांनी काँग्रेस सोडली आणि डाव्या पक्षांच्या मदतीने मुंबईत उमेदवारी दाखल केली.

स.गो.बर्वे यांच्याकडे पैशांचं मोठं पाठबळ नव्हतं. त्यांना राजकीय अनुभव देखील मोठा नव्हता पण स.का.पाटील यांनी आपली सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली. आक्रमक असणाऱ्या कामगार संघटना, डावे पक्ष यांनी मुंबईत करूसन मेनन यांच्या प्रचारासाठी रान पेटवलं.

या निवडणुकीमध्ये डाव्या कामगार संघटनांना उत्तर देण्यासाठी स.का.पाटलांनी त्यांच्याहून आक्रमक असणाऱ्या एका नव्या पक्षाची मदत घेतली. तो पक्ष होता

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना

शिवसेना स्थापन होऊन जास्ती दिवस झाले नव्हते. पक्ष अजून लहान होता पण मराठी माणसाच्या प्रश्नासाठी रोज रस्त्यावर उतरून लढत होता. मुंबईत तरुणांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाची मोहिनी वाढत चालली होती.

खरे तर बाळासाहेब ठाकरे हे स.का.पाटील यांचे सर्वात मोठे विरोधक होते. आपल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात त्यांनी स.का.पाटील यांची बऱ्याचदा खिल्ली उडवली होती. शिवसैनिक त्यांचा उल्लेख सद्या पाटील असं म्हणून करायचे.

तरीही बाळासाहेब ठाकरेंनी स.का.पाटलांना मदत करायचं ठरवलं याला दोन कारणे होती,

एक तर शिवसेना दाक्षिणात्य लोक मराठी मुलांचा रोजगार घालवत आहेत या मुद्द्यावर उभी होती आणि व्ही.के.मेनन हे देखील दाक्षिणात्य होते. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे स.गो.बर्वे हे मराठी होते. तर दुसरं कारण म्हणजे व्ही.के.मेनन हे डाव्या पक्षांच्या मदतीने निवडणूक लढवत होते अनिता बाळासाहेबांचा कम्युनिस्ट विचारसरणीला कट्टर विरोध होता.

१९६७ सालची निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बर्वे मंडळ स्थापन करून प्रचाराची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली. कम्युनिस्टांच्या दादागिरीला त्यांच्याच भाषेत उत्तर देत शिवसैनिक लढले.

याचाच परिणाम नेहरूंचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या व्ही.के.कृष्ण मेनन यांचा स.गो.बर्वे यांनी थेट लाखो मतांनी पराभव केला. देशभरात ही निवडणूक गाजली. कृष्ण मेनन यांना हरवणार स.का.पाटील देखील दक्षिण मुंबईत जॉर्ज फर्नांडिस यांच्या विरोधात पडले होते. स.गो.बर्वे यांना केंद्रात मोठं मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु झाली.

पण हि स्टोरी इथेच संपली नाही. दुर्दैवाने स.गो.बर्वे यांचा निकालाच्या काहीच दिवसानंतर मृत्यू झाला. मुंबई उत्तर मतदारसंघात पुन्हा पोट निवडणूक लागली. व्ही.के.कृष्ण मेनन यंदा आपल्याला विजय मिळणार म्हणून पुन्हा अपक्ष उभे राहिले.

स.का.पाटलांनी आयडिया केली आणि काँग्रेसतर्फे त्यांच्या विरुद्ध स.गो.बर्वे यांच्या भगिनी तारा गोविंद सप्रे यांना तिकीट दिल. तारा सप्रे यांना तर काहीच अनुभव नव्हता. काहीही झालं तरी यावेळी निवडून यायचं म्हणून कृष्ण मेनन परत तयारीने उतरले होते. स.का.पाटलांनी त्यांचा संपूर्ण निःपात करायचं ठेवलं होतं. पण पुन्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली.

शिवसैनिकांनी केलेल्या कष्टाचा परिणाम तारा सप्रे या स.गो.बर्वे यांच्या पेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून आल्या. त्यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराकडून झालेला पराभव व्ही.के.कृष्णमेनन यांच्या जिव्हारी लागला. ते पुन्हा मुंबईतून निवडणूक लढले नाहीत. त्यांनी पुढे बंगालमधून निवडणूक जिंकली मात्र त्यांचा राजकीय कमबॅक कधी झालाच नाही.

या सगळ्याला कारणीभूत ठरले स.का.पाटील आणि शिवसेना

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.