मंत्री झालो नाही याचं दुःख नाही कारण कारखान्याच्या चेअरमनकडे मंत्र्यापेक्षा जास्त पॉवर असते

नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आणि वाटचाल समाजवादी विचारसरणीची अशा भिन्न विचारसरणीचा मिलाफ म्हणजे सा. रे. पाटील. वयाची नव्वदी पार करूनही काँग्रेसचा हा शेलार मामा पक्षाची खिंड लढवत राहिला. समाजवाद्यांचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी त्यांचा हातभार मिळत गेला. सा. रे. पाटील यांच्या जाण्यानं मात्र काँग्रेस पक्षाची हानी आणि समाजवादी चळवळीला धक्का बसला.

राजकारणी म्हणून नाही पण साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांची कारकीर्द कशी भारी होती, त्याचाच हा किस्सा.

शिरोळ तालुक्यातील जांभळी या आडवळणी गावात सा. रे. पाटील यांचा जन्म झाला. शेती करता करताच ते सामाजिक चळवळीत ओढले गेले. त्यांचं औपचारिक शिक्षण सातवीपर्यंत झालेलं. नाका-कारकून म्हणून वयाच्या १७ व्या वर्षी सुरवात केली आणि वयाच्या २४ व्या वर्षी स्थानिक पातळीवरच्या खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक अशी त्यांच्या आयुष्याची पायाभरणी होती.

थोडक्यात वयाच्या २४ व्या वर्षीच सहकार या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली.

त्यांनी सहकाराची खरी सुरवात केली ती सहकार तत्त्वावर खानावळ सुरू करून. साने गुरुजींच्या गोष्टीतला रामा खानावळवाला, घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरचं जेवण मिळावं, असं सुख देण्यासाठी धडपडतो. ती प्रेरणा घेऊन आप्पासाहेबांनी खानावळ सुरू केली होती.

त्यानंतर शेती आणि शेतीपूरक उद्योगांशी निगडित सहकार तत्त्वाचे अनेक प्रयोग तर त्यांनी केलेच, पण स्थानिक पातळीवर ‘इंद्रधनुष्य’ हे जिल्हा दैनिक त्यांनी सहकार तत्त्वावर दहा-बारा वर्ष चालवलं. त्याचे सल्लागार संपादक म्हणून वि.स. खांडेकर यांना घेतले होते, यात सर्व काही आलेच.

शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम करण्यात सा. रे. पाटील यांची कामगिरी विलक्षण ठरली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी दत्त शिरोळ कारखाना विशिष्टरीत्या चालविला. देशविदेशात भ्रमंती करून साखर कारखानदारीतील प्रगत तंत्रज्ञान दत्तवर आणण्यासाठी त्यांची जागरूक नजर सतत भिरभिरत राहिली.

श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ९४ वर्षांचे आप्पासाहेब सा. रे. पाटील यांना एका मुलाखतीत एक प्रश्न विचारला गेला होता. तो असा की,

तुम्ही वयाच्या ३६ व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालात आणि वयाच्या ८० नंतर दोनदा, दरम्यानच्या काळात आमदार आणि खासदार होण्यासाठी आणखी तीन निवडणुका लढवल्यात पण तुम्हाला आमदार, खासदार आणि मंत्रिपद यांचं आकर्षण नसावं असं दिसतं याचं कारण काय?

या प्रश्नाला त्यांनी उत्स्फूर्त दिलेलं उत्तर होतं,

साखर कारखान्याच्या चेअरमनला जे काही करता येते, ते आमदार-खासदार यांना करता येत नाही म्हणून !

त्याच मुलाखतीत ते पुढे म्हणाले, ‘

राजकारणाची मला आवड नाही, पण सामाजिक कार्य करायचं असेल तर राजकारणात असावंच लागतं. मला विधायक कामात रस होता आणि ध्येयवाद ही त्यामागची प्रेरणा होती.

अखेरची ३५ वर्ष ते शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे चेअरमन होते. तो त्यांचा सर्वोच्च आविष्कार होता.

त्याचं एक कारण स्थानिक पातळीवर राजकीय दृष्टीनं तेच सोईचं असणार हे उघड आहे. पण दुसरं कारण तितकंच प्रबळ असणार, ते म्हणजे त्यांना मूलतः राजकारणाची आवड नव्हती. विधायक कार्यासाठी ते करावं लागत होतं.

असे हे आप्पासाहेब सा. रे. पाटील साधना ट्रस्टचे तब्बल तीन दशके विश्वस्त होते, त्यातील अखेरची दहा वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. साधनाला आर्थिक स्थैर्य लाभावं, पायाभूत सुविधा वाढाव्यात यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. ध्येयवादी वाटचालीला बळ मिळावं एवढाच त्यामागचा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या हयातीत कधीही त्यांच्यावरील लेख साधनात प्रसिद्ध होणार नाही, अशीच त्यांनी काळजी घेतली. मात्र त्यांच्या अखेरच्या काळातील दहा मुलाखतींचं पुस्तक तेवढं साधना प्रकाशनाकडून आलं, तेही त्यांच्या मृत्यूनंतर.

वयाच्या २४ व्या वर्षी ‘सहकार’ या संकल्पनेने त्यांच्या मनाची पकड घेतली आणि त्यानंतरची ७० वर्षे त्यांचे ते झपाटलेपण कायम राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.