स्पेसमध्ये भारताचा अंतराळवीर पाठवायला इस्रोने परफेक्ट माणूस निवडलाय

इस्रोची सध्या गगनयान मिशनची तयारी जोरात चालू आहे. गगनयान मोहिमेचं उद्दिष्ट  सुरवातीला  भारताला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना २०२२ पर्यंत पाच ते सात दिवसांसाठी तीन सदस्यीय क्रू अंतराळात पाठवायचे होते. आता मात्र करोनामुळं २०२३चं नवीन टार्गेट ठरवण्यात आलंय.

भारताचे राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स हे अंतराळात गेले आहेत मात्र दुसऱ्या देशाच्या मिशन मध्ये.

जगातील आघाडीच्या अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या इस्रोच्याही मनात ही सल होतीच. त्यामुळंच हे मिशन खूप महत्वाचं आहे.इस्रोचे आधीचे अध्यक्ष के. सिवान यांनी या दृष्टीने बरोबर तयारी सुरु केली होती. आता त्यांच्या जागी येणारे नवीन अध्यक्ष हे ह्या जबाबदारीसाठी एकदम परफेक्ट चॉईस असणार आहेत. 

इस्रोचे ११वे अध्यक्ष म्हणून एस. सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

का आहेत एस. सोमनाथ भारताच्या अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेसाठी परफेक्ट चॉईस?

सोमनाथ २०१८ पासून विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून काम पाहतायत. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे प्रमुख म्हणून, सोमनाथ हयांचा गगनयान मिशनमध्ये जाणारे प्रमुख रॉकेट GSLV Mk-III चे तंत्रज्ञान विकसित करण्याशी जवळून संबंध आला होता.GSLV Mk-III रॉकेटच्या विकासासाठी ते प्रकल्प संचालक आणि मिशन डायरेक्टर होते. अलीकडच्या काही दिवसांत या रॉकेटला मानवी उड्डाणासाठी वापरण्यायोग्य बनवण्यातही त्यांचा सहभाग आहे. त्यामुळं गगनयान मिशन पुढे नेण्यात  एस. सोमनाथ हेच योग्य असल्याचं सांगण्यात येतंय.

केंद्राने बुधवारी डॉ. एस. सोमनाथ यांची अंतराळ विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. 

त्यांची नियुक्ती या पदावर रुजू झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या एकत्रित कार्यकाळासाठी आहे.

 ज्यामध्ये सार्वजनिक हितासाठी सेवानिवृत्तीच्या वयाच्या पलीकडे मुदतवाढीचा समावेश आहे, असे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. एस सोमनाथ यांचा अकॅडेमीक रेकॉर्ड पण जबरदस्त आहे.

१९६३ मध्ये जन्मलेल्या सोमनाथ यांनी केरळ विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतली आहे. त्यांनतर मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगळुरू येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. IIScमध्ये ते गोल्ड मेडलिस्ट पण होते.

अ‍ॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (ASI), परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड-2014 आणि ISRO कडून GSLV Mk-III रॉकेट वरील कामासाठी टीम एक्सलन्स अवॉर्ड-2014 चे स्पेस गोल्ड मेडलही त्यांना  मिळालं आहे. 

अलिकडे इस्रोचे लक्ष विज्ञान आणि अभियांत्रिकीऐवजी सरकारला खूश करण्यासाठी प्रसिद्धी आणि राजकीय लाभ मिळवण्यावर जास्त असल्याची टीका केली जातेय. तसेच चांद्रयान -२ च्या अपयशाची कारणेही इस्रोने दिल्या नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं या सगळ्या वादातून इस्रोला बाहेर काढण्याची आणि इस्रोची करोना काळात मंदावलेली स्पीड पुन्हा प्राप्त करून देणे ही आव्हाने सोमनाथ यांच्यापुढे असणार आहेत.

त्यामुळं ह्या सगळ्या आव्हानातून एस. सोमनाथ कसा मार्ग काढतात आणि भारताचा तिरंगा अवकाशात डोलाने कसा फडकावतात ये येणाऱ्या वर्षांत कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.