आम्ही एसटी कर्मचारी अक्षरश: भाजीपाला विकून घरखर्च भागवतोय…

नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळने अर्थात एस.टी.ने आपल्याकडील काही स्थानके, आगार यांना तारण ठेवून २ हजार ३०० कोटींचे कर्ज काढणार असल्याचे सांगितले. याचे प्रमुख कारण म्हणजे एस.टी. कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून थकलेले पगार.

यापुर्वी जुलैमध्ये देखील महामंडळाने राज्य सरकारकडून ५५० कोटी रुपये घेऊन तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार केले होते.

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये एसटीची अत्यावश्यक वाहतूक सोडली तर सार्वजनिक प्रवासी वाहतूक पुर्णपणे बंद होती. त्यामुळे आधीच तोट्यात गेलेली एसटी या काळात कोरोनाच्या परिस्थितीत आणखी तोट्यात गेल्याची कबुली खुद्द परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

या सर्व परिस्थिती माझ्यासमोर कामगारांचे पगार हा मोठा प्रश्न आहे. त्यातच एसटीतून फार कमी उत्पन्न आहे आणि महिन्याचे पगार जवळपास ३०० कोटी रुपयांचे आहेत. असेही परब यांनी सांगितले.

त्यामुळे दिवाळी तोंडावर येवून देखील एस.टी.ला स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला देखील सध्या पैसे नाही.

सध्या एसटी महामंडळात १८ हजार ५०० एसटीचा ताफा असून १ लाख ३ हजार कर्मचारी आहेत.

संदर्भात आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांना संपर्क केला असता ते म्हणाले,

दिवाळी जवळ आली आहे. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासूनचे पगार अजून ही झालेले नाहीत. यासाठी आंदोलन सातत्याने चालू आहेत. परवाच शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र तरीही पगार नाही झाले तर पुन्हा ९ नोव्हेंबरला आंदोलन करणार आहोत.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर डेपोमध्ये वाहक असलेले विकास दुबूले यांनी बोल भिडूशी बोलताना त्यांची शोकांतिका मांडली. त्यांनी सांगितले,

पगार याच वेळी थकलेले आहेत असे नाही तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यांचे देखील थकले होते. लॉकडाऊन नंतर जुलैमध्ये ते दिले गेले. मात्र त्या चार महिन्यांच्या काळात आम्ही कर्मचाऱ्यांनी अक्षरशः भाजीपाला विकून घरखर्च भागवला आहे. मी स्वतः शेतीत रोजंदारीवर कामाला गेलो होतो.

१२ वर्षाच्या सेवेनंतर पगार अवघा १९ हजार आहे. तो बँकेचे हप्ते वगैरे कट होवून हातात येतो ७ हजार रुपये. यात सगळा घरखर्च भागवा लागत होता. लॉकडाऊनमध्ये तो ही हातात नव्हता. असे ही दुबूले यांनी सांगितले.

तर अहमदगनरच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या रणसिंग उत्तम यांनी सांगितले,

आमचे हाल सध्या आम्हालाच माहित. दिवाळी तोंडावर आहे. मात्र तो आमचा सण राहिलेला नाही. सरकार आम्हाला दरवर्षी दिवाळी भेट म्हणून थोड काही तरी देत होत. मात्र यावर्षी दिवाळी भेट राहुदे आधी पगार तरी द्यावा. एवढी सरकारकडे मागणी आहे.

कामावर जात आहे. त्यामुळे होणारा खर्च थांबत नाहीये. पण पगारच नसल्यामुळे हा खर्च करायचा कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. जर सरकारने पगार केला तर सगळी देणी भागवून राहिलेल्या पैशातुन दिवाळी साजरी करण्याची संधी मिळू शकते, असे ही उत्तम यांनी सांगितले.

सेवा चालू मात्र सुविधांचा आभाव….

कोरोना काळात एसटीची सार्वजनिक वाहतूक केवळ बंद होती. मात्र परराज्यातील मजूरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटीची सेवा चालूच होती. यामध्ये लालपरी अगदी पश्चिम बंगालपर्यंत मजूरांना त्यांच्या घरी सुखरुप सोडण्यासाठी धावली होती.

जवळपास १० लाख मजूरांना या काळात देशातील विविध भागातील त्यांच्या घरी नेवून सोडले होते. राजस्थानमधील कोटा मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याचे काम देखील लाल परीनेच केले होते.

मात्र या काळात कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बेसिक सोयी सुविधांचा अभाव असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकारने डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना कोविड योद्धा म्हणून सरसकट ५० लाख रुपये विम्याची घोषणा केली. एस.टी कर्मचाऱ्यांना मात्र सरसकट लाभ दिला नाही.

आमच्या जवळपास २ हजार कर्मचारी बांधवांना कोरोना झाला. यामध्ये एकुण ७८ जण दगावले. त्यामधील केवळ ४ जणांनाच लाभ मिळाला. इतर बांधवांच काय ? असा ही सवाल त्यांनी विचारला.

आता अलिकडेच मुंबईतील लोकलची सार्वजनिक वाहतुक बंद असल्याने बेस्टवर येणारा ताण कमी करण्यासाठी महामंडाळाच्या १ हजार बस आणि कर्मचारी मुंबईला पाठवले आहेत.

या कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केल्याचा दावा एसटी प्रशासन केला होता. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावर झोपावं लागत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. सोबतच परवा एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचा आणि त्यात आळ्या सापडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला होता.

पण महामंडळावर अशी वेळ का आली?

मुळात एस.टी. महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे. जी ना नफा ना तोटा या तत्वालर चालू झाली होती. त्यामध्ये काही प्रमाणात सरकारी पैसे असतात आणि बाकीचा निधी हा संपुर्णपणे एस.टीला उभा करावा लागतो.

यासाठी प्रवासी तिकीट, एसटी भाड्याने देणे, मालवाहतुक अशा मार्गांचा अवलंब होतो. मात्र प्रवासी वाहतुकीमध्ये वृद्ध, अपंग, विद्यार्थी यांसारख्या एकुण २२ प्रकारच्या प्रवाशांना एसटी प्रवासात सवलत मिळते. त्यामुळे फायद्याचे गणित बसवणं अवघड जाते.

त्यामुळे एसटी या कोरोनाच्या काळातच नाही तर मागील अनेक वर्षापासून तोट्यात आहे. अलिकडच्या काळात नजर टाकली तर एसटीला २०१५ – २०१६ साली १२१ कोटी रुपयांचा तोटा होता. २०१६-२०१७ साली ५२२ कोटी, २०१७-२०१८ मध्ये तर तो वाढून १५८४ कोटी रुपयांचा झाला होता. तर गतवर्षी ९६५ कोटींचा तोटा होता.

तोट्यात जाण्याची काही प्रमुख कारण…

एसटी तोट्यात जाण्याचे मुख्य कारण वाहतुक तज्ञ अशोक दातार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, खाजगी वाहतुक. एकट्या मुंबई शहरात राज्याच्या विविध कानाकोऱ्यातुन १ हजार बसेस येत असतात. चांगल्या बसेस, वाजवी दर आणि एस.टीच्या तुलनेत चांगली वेगमर्यादा यामुळे प्रवासी देखील तिकडे आकर्षित होतात.

अनेक वर्षांपूर्वी एसटी महामंडळाला नफा झाला तेव्हा त्यावर आयकर द्यावा लागेल व तो केंद्र सरकारला जाईल हे लक्षात आले. तसे न होता उत्पन्नाचा वाटा राज्य सरकारकडेच रहावा यासाठी राज्य सरकारने प्रवासी करात वाढ करून जवळपास वीस-बावीस टक्के प्रवासी कर एसटी महामंडळावर लादला.

महामंडळाला एक रुपया उत्पन्न मिळाले तर त्यातील वीस पैसे प्रवासी कराच्या रुपाने राज्य सरकार वसूल करायचे. बराच पाठपुरावा झाल्यावर अनेक वर्षांनी तो कमी करून साडेसतरा टक्के करण्यात आला. पण नफा म्हणजे विस्तारासाठी उपलब्ध होणारे भांडवल. त्यापासूनच वंचित ठेवण्याचे दुष्परिणाम होणार हे लक्षात घेतले गेले नाही. अगदी अलिकडे प्रवासी करापैकी दहा टक्के कर महामंडळ स्वत:साठी वापरू शकते असा निर्णय झालेला आहे.

तोट्याचे आणखी एक कारण सांगितले जाते ते म्हणजे इंधन. इंधनाचे दर वाढले तर एसटीचे भाडे वाढले पाहिजे. पण असे लोकांना न आवडणारे निर्णय राजकीय नेते घेण्याचे टाळतात. त्यामुळे दर अगदी क्वचित वाढवले जातात.

तोट्याची ही काही कारण जरी असली तरी कोरोना काळात तोटा भरुन काढून बचत करण्यासाठीचा पहिला उपाय केला तो महामंडळाने स्वेच्छा निवृत्ती ही योजना आणली. एकुण कर्मचाऱ्यांपैकी २७ हजार कर्मचारी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. यांना ही ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोबतच २०१९ च्या भरतीमधली सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत एक पत्रक जारी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

म्हणजे आधी कित्येक दिवस पगार नाहीत. दिवाळी भेट खूप लांबची गोष्ट. त्यात काहींच्या हातात सेवा स्थगितीची नोटीस आली. सोबतच ऐच्छिक निवृत्ती लागू केली. त्यामुळे एसचीच्या तोट्यात कर्मचाऱ्यांची दिवाळी कशी आणि कधी गोड होणार हा प्रश्नच आहे.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Rahul Dandge says

    तुमचा लेख वाचून खूप चांगल वाटल मी एक ST कर्मचारी आहे तुम्ही आमच्या व्यथा मांडल्या त्या बद्दल तुमचे धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.