९० वर्षांच म्हातारं उभा राहिलं आणि भल्याभल्यांचं वारं फिरलं..

कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुका. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्याच्या संगमाने सुजलाम सुफलाम झालेला सुपीक प्रदेश. भाजीपाला पासून ते गुलाब जरबेरा सारख्या फुलांपर्यंत प्रत्येक गोष्ट एक्सपोर्ट क्वालिटीची पिकते.

पण इथल सगळ राजकारण शेतीच्या भोवती फिरते ते ही ऊस शेतीच्या. 

गेली काही वर्षे शिरोळ भागात राजू शेट्टीचं वारं आहे. २००४ साली कॉंग्रेसच्या रजनीताई मगदूमांना पाडून राजू शेट्टी आमदार झाले होते. एकच गट्टी राजू शेट्टी असा प्रचार झाला होता. शेतकरी आंदोलनातून मोठा झालेला आपल्यातलाच वाटणारा एक तरुण ऊसाला दर मिळवून देतोय, मोठमोठ्या कारखानदारांशी नडतोय ही लोकांसाठी मोठी गोष्ट होती.

त्यांच्या प्रचारात झोळी फिरत होती. शेतकऱ्यांनी त्यांना निवडणूक लढवायला नोट सुद्धा टाकलं आणि व्होट सुद्धा दिले.

राजू शेट्टी सारखा फाटका माणूस आमदार म्हणून निवडून आला. विधानसभा गाजवली. शेतकऱ्याच्या घामाला दर मिळवून दिला. त्यानंतर त्याचं टार्गेट होत. लोकसभा. लोकांनी पण त्याला साथ दिली, त्यांची टॅगलाईन होती

“अंह..आमदार नाही खासदारच !”

राजू शेट्टी खासदार झाले. शिरोळची आमदारकीची सीट मोकळी झाली. स्वाभिमानी संघटनेचा गड म्हणून शिरोळ तालुका ओळखला जात होता. त्यांचं नाव दिल्लीपर्यंत गाजत होतं.

पण प्रश्न होता राजू शेट्टींच्या जागेवर आमदार कोण? राजू शेट्टींनी आपला वारस म्हणून उल्हास पाटील या कार्यकर्त्याला निवडलं होत.

कॉंग्रेस राष्ट्रवादी उमेदवार शोधत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यड्रावकर गट ताकदवान होता, कॉंग्रेसचा जुना रत्नाप्पा कुंभार यांचा गट, सा.रे पाटील गट असे अनेक गट होते. प्रत्येक गटाच्या हातात साखर कारखाना होता. राजू शेट्टी याचं आंदोलन याच सगळ्यांच्या विरोधात मोठ झालं होतं. दोन्ही पक्षाचे दिग्गज कोणाला तिकीट द्यायचं यावर चर्चा करत होते. मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाटणीचा होता.

तेव्हा अखेर शरद पवार म्हणाले,

“कॉंग्रेसने सा.रे.पाटील यांना तिकीट द्यावे. नाही तर राष्ट्रवादीकडून मी त्यांना उभा करतो.”

सातगोंडा रेवगोंडा पाटील उर्फ अप्पासाहेब. वय वर्ष अवघ ८९. यापूर्वी १९५७ ला संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी एस.एम.जोशीनी त्यांना तिकीट दिलेलं. जकात नाक्यावर कारकुनाची नोकरी करणारा हा तरुण कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतल्या रत्नाप्पा कुंभारनां हरवून जायंट किलर ठरला होता. पुढे कॉंग्रेसमध्ये आला. दत्ताजीराव कदमांच्या बरोबर शिरोळ तालुक्यात दत्त सहकारी कारखाना उभा केला.

९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी कॉंग्रेस सोडला नाही. त्यांच्या उमेदवाराला पाडून निवडून आले. परत पुढच्यावेळी मात्र कॉंग्रेसने त्यांना वय झालंय म्हणून तिकीट दिल नाही. अप्पासाहेबांनी देखील हळूहळू राजकारणातून काहीस लक्ष काढून घेतल होत.

पण चाणाक्ष पवारांना माहित होतं जर स्वाभिमानीच वारू रोखायच असेल तर याच अनुभवी सेनापतीला परत आणलं पाहिजे.

त्यांच्या आग्रहामुळे कॉंग्रेसने सा.रे.पाटलांना तिकीट दिल.

शिरोळ तालुक्यात उमेद हरलेल्या कॉंग्रेसला परत उभा करण्यासाठी हा नव्वदीतला तरुण निवृत्ती मागे सारून परत आला.

डोक्यावर देवानंद सारखी टोपी, अंगात शुभ्र पांढरे कपडे, पायात तसेच पांढरे स्पोर्ट्स शूज, डोळ्यावरच्या चष्म्यामागे असलेली भिरभिरती नजर. समाजवादी विचारसरणीतून आलेला पण ऊसाच राजकारण कोळून प्यायलेला चिरतरुण गडी. असले अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले. रणांगणात उतरला ते पूर्ण तयारीनिशी. शिरोळ तालुक्यातील एक आणि एक गाव, एक आणि एक घर पिंजून काढायचं ठरल.

प्रचाराचा नारळ फोडला श्रीक्षेत्र नरसोबा वाडीपासून.

मध्यंतरी साताऱ्यात शरद पवारांच्या सभेत अवकाळी पाऊस झाला होता तसा प्रचंड पाऊस आला. लोक म्हणाले म्हातारं माग फिरंल. पण तस व्हायचं नव्हत. भर पावसात सारे पाटील बोलायला उभे राहिले.

अख्खा शिरोळ तालुका बघत होता. कोणी तरी भाषणात म्हणत होतं,

“बैल म्हातारा झाला म्हणून खाटकाकडे न्यायचा नसतो. शिरोळ तालुका खाटकाच्या हातात द्यायचा नाही.”

वार फिरलं. राजू शेट्टीनी आपला उमेदवार निवडून यावा म्हणून आकाशपाताळ एक केलं. पण लोकांची साथ दिसत नव्हती. वयाच्या नव्वदीमध्ये पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरणाऱ्या सारे पाटील अप्पांसाठी सहानुभूतीची लाट आली होती.

अगदी स्वाभिमानीचे कार्यकर्ते देखील म्हणत होते म्हातारा जड जातोय.

तालुक्यातल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सगळे गटतट बाजूला ठेवून सा.रे.पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले होते. लोकांना पण वाटत होतं की ऊसाच दर मिळवून दिला स्वाभिमानीने, पण शेवटी ऊस जाणार आणि भाव देणार ते साखर कारखानदारच. लोकांनी मनावर घेतलं,

” आता आज्जाच निवडून येणार “

ऊस दराच आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टींच्या गावातच त्यांचा ऊस ज्या कारखान्याच्या क्षेत्रात येतो त्याचा मालक निवडून आला होता. अप्पासाहेबांनी शिरोळ मध्ये सहकाराच जाळ बनवलं होतं पण त्यांची इमेज साखर सम्राटाची नव्हती. समाजवादी लोकांच्यात उठबस असणारा हा ध्येयवादी म्हातारा आपलं कल्याण करेल यावरच शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला. प्रचंड मताधिक्याने सारे पाटील निवडून आले.

आणि शिरोळने फक्त नव्वद वर्षाचा तरुण आमदार महाराष्ट्र विधानसभेत पाठवला. 

तेव्हा कोणी तरी एक मोठा नेता म्हणाला होता,

“शिरोळचे लोक महाहुशार. चळवळ जिवंत राहावी म्हणून शेट्टीनां लोकसभेत पाठवलं आणि कारखाना जिवंत राहावा म्हणून अप्पासाहेबांना निवडून दिल.”

  • भिडू भूषण टारे

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. मंदार राजमाने says

    म्हातारा हा शब्द थोडा उपरोधिक वाटतोय. आदरणीय कै. डॉ. सा. रे. पाटील साहेब हे आमच्या पंचक्रोशीतील अनेकांचे आराध्य आहेत. तरी आपण कृपया उपरोधिक वाटणारे शब्द बदलावेत ही विनंती.

Leave A Reply

Your email address will not be published.