“एक रुपया द्या आणि एक मत द्या” म्हणत एका जकात क्लार्कने महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याला हरवलं..
१९५७ सालच्या निवडणूका सुरु होत्या. संयुक्त महाराष्ट्र हवा या मुद्द्यावर संपूर्ण राज्य पेटून उठलं होतं. केंद्रातील काँग्रेस सरकार आपल्यावर अन्याय करते हा महाराष्ट्राचा समज दृढ झाला होता. आचार्य अत्रे , एस एम जोशी असे समाजवादी विचारांचे नेते निवडणुकीत एकत्र आले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकिटावर काँग्रेसला पहिल्यांदाच आव्हान निर्माण करण्यात आलं होतं.
संपुर्ण राज्यात संघर्ष सुरु होता मात्र कोल्हापूर जिल्ह्यात मात्र एका जागेवरची निवडणूक विशेष करून रंगली होती.
मतदार संघ शिरोळ.
कृष्णा पंचगंगा या नद्यांनी सुपीक झालेला प्रदेश. ऊस शेतीपासून भाजीपाला पर्यंत शेतमाल एक्स्पोर्ट करणारा कष्टकरी तालुका. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे रत्नाप्पा कुंभार या जागेवर उभे होते. स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, देशाच्या संविधानावर सही केलेले नेते, सरदार पटेलांच्या बरोबर संस्थाने विलीन करणारे, पंचगंगा साखर कारखान्याची उभारणी करून शिरोळ हातकणंगले परिसरात विकासाची गंगा आणणारे सहकार महर्षी म्हणून त्यांना राज्यभरात ओळखलं जायचं.
या दिग्गज नेत्याच्या विरुद्ध उभा होता एक जकात नाक्यावरचा साधा क्लार्क.
नाव सातगोंडा रेवगोंडा पाटील उर्फ सा रे पाटील.
शिरोळ तालुक्याच्या जांभळी या खेडेगावात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. सातवी पर्यंत शिक्षण झाल्यावर शाळा सुटली. शेतीत काम करत होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गावोगावी राष्ट्र सेवा दलाच्या शाखा उभारल्या जात होत्या. साने गुरुजींच्या विचारांनी भारावून गेलेले अनेक तरुण राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांना हजेरी लावायचे.
शेतात काम करणारे सारे पाटील देखील अगदी लहान वयात राष्ट्र सेवा दलाकडे ओढले गेले. समाजवादी विचारांशी इथेच ओळख झाली. घरच्यांशी भांडून अगदी शेतातल काम टाकून देखील ते राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात हजर होत असत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर ते राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात आले.
मध्यंतरी इचलकरंजीच्या जकात नाक्यावर त्यांना क्लार्क म्हणून नोकरी लागली होती. राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेली सहकार चळवळ आपल्या लोकांपर्यंत देखील यावी म्हणून सा.रे.पाटील त्याकाळात देखील प्रयत्नशील होते. त्यांनी आपल्या जांभळी या गावी काही मित्रांना घेऊन सहकारी सोसायटी सुरु केली होती. यात यश आलं.
निसर्गचक्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीचं रुपडं सहकाराच्या विकासातून बदलता येऊ शकत हे सारे पाटलांनी ओळखलं.
पुढे त्यांनी अनेक खटपटी करून शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे रजिस्ट्रेशन केले. गावोगावी फिरून लोकांचे शेअर्स गोळा केले. ते सांगतात,
“शिरोळ संघ उभा राहिला तेव्हा मी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत होतो, पण डायरेक्टर असूनही गावोगावी सायकलवर फिरत होतो. शेतकऱ्यांच्या मालाचा नमुना मी गोळा करून आणत असे. माल गोळा करताना शेतकऱ्यांना शेतीसाठी काय हवं आहे, कुठलं खत हवंय, कुठलं बियाणं हवं आहे त्याची जंत्री देखील करत असे.”
ही त्यांची मेहनत त्यांना शिरोळ तालुक्याच्या गावोगावी ओळख मिळवून दिली.
१९५७ च्या निवडणुका आल्या तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती तर्फे तिकीट वाटप सुरु होतं. काँग्रेस मधले अनेक असंतुष्ट रत्नाप्पा कुंभार यांच्या विरोधात शिरोळचं तिकीट मागत होते. पण एसेम जोशी यांनी आपल्या कट्टर कार्यकर्त्यालाच तिकीट मिळवून दिलं.
सा.रे.पाटील रत्नाप्पांच्या विरोधात निवडणुकीला उतरले.
सायकल वरून फिरणाऱ्या सा.रे.पाटील यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड नाजूक होती. पक्षाकडे देखील पैसे नव्हते. अशावेळी त्यांचे मित्र गोळा झाले आणि त्यांनी स्वखर्चाने खेडोपाडी फिरून प्रचार सुरु केला.सर्व सामान्य शेतकरी, हमाल, कष्टकरी यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरेची माहिती नव्हती मात्र आपल्यातलाच एक तरुण मोठ्या नेत्याशी टक्कर देतोय हे त्यांना ओळखत होतं.
सा.रे.पाटलांच्या प्रचारासाठी माधवराव बागल, एस.एम.जोशी असे दिग्गज नेते शिरोळ तालुक्यात उतरले. हातात झोळी घेऊन एक मत द्या आणि एक रुपया द्या अशा घोषणा देत गावोगावी फिरले.
आणि खरंच लोकांनी पैसे देखील दिले आणि मते देखील दिली. त्या निवडणुकीत रत्नाप्पा कुंभार यांचा अनपेक्षित पराभव झाला. जकात नाक्यावर कारकुनी करणारा तरुण आमदार बनला.
त्या वर्षीच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण वगळता काँग्रेसचे सर्व मोठे नेते धाराशायी झाले होते. मात्र खरे जायंट किलर म्हणून सा.रे.पाटील यांनाच ओळखलं गेलं.
पुढे पन्नासवर्षे ते शिरोळच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. दत्त शिरोळ साखर कारखाना उभा केला. शेतीत अनेक प्रयोग केले, त्यांच्या रोपवाटिकांचे गुलाब तर परदेशातही फेमस आहेत. वयाच्या नव्वदाव्या वर्षीदेखील जिद्दीने निवडणुकीत उतरणाऱ्या आणि निवडणूक जिंकणाऱ्या सारे पाटलांना शिरोळ तालुकाच नाही तर स्नुपर राज्यातील समाजवादी विचारांचे कार्यकर्ते विसरू शकत नाहीत.
हे ही वाच भिडू.
- कोल्हापूरच्या आमदाराला पाहण्यासाठी ८ दिवस आमदार निवासासमोर लोकांनी रांग लावली होती.
- मी युरोपमध्ये गुलाब विकत घेतलं तेव्हा समजलं ते महाराष्ट्रातल्या या ठिकाणाहून आलय
- पंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणारे देशभक्त रत्नाप्पा कुंभार !