सआदत हसन मर जाए और मंटो ज़िंदा रहे…

भवतालचे सत्य कोणताही अभिनिवेश न बाळगता सांगणे ही जर लेखक/लेखिका होण्याची कसोटी ठरवली तर तर किती जण सापडतील ? अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच आणि निदान मला तरी त्यातलं सर्वात पहिलं सुचणारं नाव म्हणजे सआदत हसन मंटो.

जर कोणतंही पुस्तक वाचताना आपल्या डोक्यात कोणी घाव घालतं आहे असं वाटत असेल तर ते पुस्तक वाचायचं की नाही ?  पुस्तकं कशी घणाघाती घाव घालणाऱ्या हातोड्यासारखी असावीत जी आपल्या डोक्यातील साचलेपण फोडून काढतील.” असं काफ्का म्हणायचा.

मंटो वाचताना हे घाव नुसते बसत नाहीत तर पानोपानी वाढतच जातात.

लिहिणारी व्यक्ती समाजातील हिंसा, खोटेपणा तसेच दांभिकपणा आपल्या समोर नागडं उघडं मांडायचं सोडून संदर्भहीन शाब्दिक आवरणांची पुटं चढवत राहणार असेल तर अशा लोकांना आपण अजून किती काळ लेखक/लेखिका म्हणत रहायचे.

आता साहित्य क्षेत्रात कादंबरी लिहिणे हे तुमच्या साहित्यिक असण्याचे नसण्याचे सर्टिफिकेट समजले जाते. कोणीही काहीही सुमार लिहितो आणि आपल्याच चार लोकांकडून त्याचा बँड वाजवून घेतला की श्रेष्ठ दर्जाचा साहित्यिक कम विचारवंत बनून जातो/जाते. बाकीचे तथाकथित अभिजन ही पुंगी वाजवत राहतात कारण त्यांना देखील आपली घोडी पुढे दामटायची असतात. अशा या साहित्य समीक्षा व्यवहार वगैरेच्या मनोरंजन करणाऱ्या औट घटकेच्या दांभिक बाजारपेठेत मंटो कायमच बदनाम असतो.

मंटो काही कादंबरीकार नव्हता. तो कथाकार होता, कहाण्या सांगायचा. पण मंटोच्या बाबतीत बोलायचे झाले तर स्वतः मंटो म्हणायचा,

‘त्याने कथा नाही लिहिल्या कथांनी त्याला लिहिलं.’

मंटो आणि फाळणी याविषयी बरेचदा बोललं गेलं आहे.

काही वेळा अशा भयंकर गोष्टी घडतात की त्या तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग व्यापून राहतात.

फाळणी नंतर मंटो अस्वस्थ होत गेला, त्याचे बहुतांश मित्र पाकिस्तानला निघून गेले. इथे असणारे लोक फार काही मदत करत नव्हते, विरोध वाढत होता. कदाचित मंटो भारतात राहिला देखील असता पण अशा काही गोष्टी घडल्या की तो आपल्या बायकोला व मुलींना घेऊन लाहोरला निघून गेला.

नेमकं काय घडलं हे माहित करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मंटोच वाचावा लागतो. ‘सहाय’ मध्ये तो ते सांगतो कथेची सुरुवातच तो अशी करतो,

‘असं म्हणू नका कि एक लाख हिंदू मेले किंवा एक लाख मुसलमान.. दोन लाख माणसं मेली असं म्हणा.

खरतर हि देखील ट्रॅजेडी म्हणता येणार नाही. मारणारे किंवा मरणारे कोणत्याही खात्यात मोजले गेले नाहीत हि जास्त मोठी ट्रॅजेडी आहे. एक लाख हिंदू मारून मुसलमानांना वाटलं कि हिंदू धर्म मेला, पण तो जिवंत आहे आणि राहणार  आणि एक लाख मुसलमान मारून हिंदूंनी टाळ्या वाजवल्या असतील कि इस्लाम संपला म्हणून, पण सत्य तर तुमच्या समोर आहे इस्लाम वर एक ओरखडा देखील नाही उमटला. ती सर्व लोकं मूर्ख असतात ज्यांना वाटतं कि बंदुकीने धर्माचा खून केला जाऊ शकतो. मजहब, दीन, ईमान, धर्म, विश्वास, श्रद्धा या गोष्टी शरीरात नसतात, आत्म्यात असतात. तलवारी आणि गोळ्यांनी तुम्ही आत्मे कसे मारणार?’

हि वाक्य आहेत मुमताजची, कथेमध्ये मंटो मुमताज होतो आणि हे बोलतो. त्याचा मित्र जुगल ज्याला लाहोर मधून एक पत्र येतं ज्यात लिहिलेलं असतं फाळणी नंतरच्या दंगलीमध्ये त्याचा काका मारला गेला. त्यानंतर या धक्क्यामध्ये असताना बोलता बोलता विषय निघतो आणि

जुगल म्हणतो ‘जर आपल्या मोहल्ल्यामध्ये दंगली सुरु झाल्या तर मी काय करेन ?

मुमताज देखील सहज विचारुन जातो ‘काय करशील’ ?

यावर जुगल म्हणतो ‘ मी विचार करतोय, शक्यता हीच जास्त आहे कि मी तुला मारून टाकेन’

यानंतर मुमताज आपल्या बायकोला आणि पोरींना घेऊन लाहोरला निघून जातो. यानंतर मंटो आपल्या बायकोला आणि पोरींना घेऊन लाहोरला निघून जातो.

कथेमध्ये जुगल नंतर त्याची माफी मागतो. ज्यावेळी तो त्याचे बाकीचे मित्र मुमताजला अखेरचा निरोप देण्यासाठी जहाजावर येतात त्यावेळी तो वरील वाक्ये तर बोलतोच पण मुमताज त्याचा एक अनुभव सांगतो. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. बर हि गोष्ट इथेच संपत नाही, यामध्ये मंटो कोणाला एकाला व्हिलन बनवत नाही किंवा कोणाला हिरो तो या सर्वाकडे एक कथा सांगणारा म्हणून बघतो. कथाकार म्हणून मंटोला का श्रेष्ठ म्हणायचं याच ते उदाहरण आहे. एकाच वेळी तो आपलं आयुष्य जगत असतो आणि त्याचवेळी तो अनुभव पात्राच्या नावे करून अजून एका वरच्या पातळीवर जाऊन आपल्याशी बोलत असतो. त्याचं हे आत्मे फाडत जाणारं खंजीर सालं सापडता सापडत नाही.

साहिर तिकडून इकडे आला आणि मंटो इकडून तिकडे गेला आणि भारत पाकिस्तानची फाळणी का काय ती पूर्ण झाली. काळजावर घाव दोन्हीकडे बसले, कधीही भरून न येणाऱ्या जखमा दोन्हीकडे झाल्या.

पाकिस्तानात गेल्यावर त्याच्यावर अजून वाईट परिस्थिती ओढवली. कोणालाही न जुमानणाऱ्या लिखाणामुळे त्याला पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री मध्ये काम तर मिळतच नव्हते,त्याच वेळी त्याच्या ‘ठंडा गोश्त’ वर केस सुरु झाली. का तर ती अश्लील आहे म्हणून …

ब्रिटीश राज असताना मंटोवर अश्लीलतेचे आरोप झाले, केसेस झाल्या. पण ब्रिटिश निघून गेल्यावर नवीन निर्माण झालेल्या पाकिस्तानमधले कायदे हे तथाकथित धार्मिक नैतिककडे जास्त झुकले गेले. ज्याचा त्रास मंटो, फैज यांसारख्या सर्व पुरोगामी तसेच प्रगतिशील लेखकांना झाला.

तर ठंडा गोश्त अश्लील का ठरली ? त्याची भाषा.

त्यामध्ये ईशरसिंह एका प्रेतासोबत बलात्कार करतो.

काय जास्त भयानक आहे, जिवंत बाईवर बलात्कार का तिच्या प्रेतासोबत बलात्कार ? हा प्रश्न पडला असेल का लोकांना ? का हा मला पडलेला प्रश्न आहे?

मुळात जर हि गोष्ट जर पूर्ण वाचली असेल तर ती ज्या संदर्भासकट मंटो आपल्या समोर ठेवतो त्यानंतरही जर कोणी तिला केवळ असभ्य भाषा आणि संभोग या गोष्टीशी जोडू पाहत तिला अश्लील म्हणणार असेल तर हा सर्व समाज किती मुळातून नागडा उघडा आहे या मंटोच्या वाक्याला दुजोरा मिळत राहतो.

ही सर्व दांभिकता आणि विसंगती त्याला माहित होती. म्हणून तो म्हणायचा, “माझ्यात जे वाईटपण आहे ते या जगाकडून आलं आहे. माझ्या लिखाणात काही कमी नाही. ज्या गोष्टींना माझा कमीपणा म्हणून सांगितले जाते त्या खरतर या व्यवस्थेत असणारे कमीपण आहे. मी नुसतीच खळबळ उडवून देण्यासाठी लिहीत नाही. मी अशा सभ्यतेचे, समाजाचे संस्कृतीचे कपडे काय उतरवणार जी मुळातच नागडी आहे.”

असे तो म्हणू शकला कारण त्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे प्रश्न विचारले ते बहुतांश समाजाला उघडे पाडत होते. तो आणि त्याचे समकालीन साथी हे प्रश्न विचारायला घाबरले नाहीत. त्यामुळेच एक काळ असा होता जेंव्हा साहित्यिक मंडळी जसे फैज, मंटो, मजाज, इस्मत, साहिर ही व अशी अनेक नावे आपापले देश खऱ्या अर्थाने रोशन करत होते.

पण चेकॉव्ह नंतर बहुदा मंटोच असावा ज्याने केवळ आपल्या कथांच्या बळावर आपलं स्थान निर्माण केलं.

वर आपण बोललो त्यासोडून अजून बरीच नावं घेता येतील ज्या त्याच्या खूप महत्वाच्या कथा आहेत उदा. धुआँ, बू, काली सलवार, खोल दो अजून अनेक.

फाळणी नंतर अनेक अमानवी तरंग हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये उमटत राहिले. त्यामधील हिंसेला जबाबदार न हिंदुस्थानी होते न पाकिस्तानी त्याला जबाबदार होता फक्त क्रूर माणूस.

या क्रूरपणामुळे बळी गेलेल्या लोकांत सर्वात जास्त प्रमाण होतं ते म्हणजे बायकांचं.

कारण पुरुषांसाठी बाई ही फक्त सत्ता गाजवण्याचे केंद्र असतं अजूनही तेच आहे. मग ती हिंदू असो मुसलमान असो वा शीख.

खोल दो ही सिराजउद्दीन आणि त्याची मुलगी सकिना यांची कहाणी जरी असली तरी ती त्या काळात झालेल्या एकूण स्त्रियांच्या शोषणाला मांडते.

वस्तीवर झालेल्या हल्ल्यातून आई मेल्यावर बाप आणि पोरगी पळता आहेत, पोरगीचा दुपट्टा पडतो, पोरगी नको नको म्हणत असताना बाप तो उचलायला थांबतो. त्या सगळ्या गर्दी गोंधळात आता त्याच्या हातात दुपट्टा तर आहे पण पोरगी हरवते.

म्हणायला केवळ काही ओळी आहेत पण बायकांच्या बाबतीले पुरुषी दांभिक नैतिकतेचे सर्व दुपट्टे मंटो बघता बघता खेचून घेतो आणि त्यांना नागडा करतो.

मग सुरू होतो तिला शोधण्यासाठीचा प्रवास, अनेक वळणं घेत कथा शेवटाकडे येते. पोरगी एका अंधाऱ्या खोलीत पडली आहे, सगळ्यांना वाटतंय ती मेलीय, खोलीत बाप पोहोचतो. चेक करायला आलेला डॉक्टर बापाला म्हणतो खिडकी खोल दो, आणि कोणाला काही कळायच्या आत पोरगी आपल्या सलवारीची नाडी खोलून सलवार खाली सरकवते.

जीव वाचवायला पळताना पोरीच्या छातीवरून खाली पडलेला दुपट्टा उचलणाऱ्या याच सिराजुद्दीनला सकिना आपली सलवार खाली सरकवते आणि नागडी होते तेंव्हा मात्र तिच्या नागडेपणा विषयी काहीही देणंघेणं उरलं नसतं तो खुश होतो की आपली पोरगी जिवंत आहे.

खोल दो या दोन शब्दात मंटो तमाम बायकांची ट्रॅजेडी आपल्या समोर ठेवतो. ही ट्रॅजेडी आजही पुन्हा पुन्हा आपल्या समोर येत राहते आणि त्याला कारणीभूत आपलीच पुरुषी ‘खोल दो’ मानसिकता.

मंटोच्या कथा पाकिस्तान पेक्षा हिंदुस्थानात जास्त चर्चिल्या गेल्या. या चर्चेमध्ये कथाच नाही तर त्या अनुषंगाने आलेल्या उपकथा देखील असायच्या, जसे की मंटो आणि इस्मत.

दोघांच्या दोस्तीचे किस्से अजब होते तितकेच आकर्षक होते. दोघांवर एकत्र केस चालू असायच्या, अश्लील लिखाणाचा आरोप एकत्र लावला होता, कोर्टात पेशी सुद्धा एकत्रच असायची. आपल्या लिखाणाच्या बळावर मरणाऱ्याला संजीवनी देऊ शकणारी लेखणी बाळगणारे हे दोघे लढायचे एकत्रच.

त्या काळी अनेकदा चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे इस्मत आणि मंटो लग्न का करत नाहीत?

इस्मतला विचारले असता ती बरेचदा लाजायची, भांडायची, चिडायची पण एके दिवशी मंटोने याचे एक सहज साधे उत्तर दिले कि पुन्हा कोणाची हिम्मत झाली नाही हा प्रश्न विचारायची.

तो म्हणतो. “जर इस्मत आणि मंटोच लग्न झालं असतं तर त्या दुर्घटनेचा कथा साहित्य क्षेत्रावर ऍटम बॉम्ब इतकाच भयंकर परिणाम झाला असता. “अफसाने अ-फसाने बन जाते”. (मंटोच्या या वाक्याचे भाषांतर करण्याचा आगाऊपणा आणि ताकद माझ्यात नाही.) कथा तयार होण्याऐवजी कोडी तयार झाली असती.  आणि हे देखील शक्य होत कि निकाहनाम्यावरच्या सह्या हे त्या दोघांचे कदाचित शेवटचे शब्द असते. या दोघानी निकाहनाम्यावरती कथा लिहिल्या असत्या आणि काजीच्या माथ्यावर सह्या करून मोकळे झाले असते”

ठंडा गोश्त केसच्या काळात लाहोरमध्ये राहून बंबईची आठवण काढणाऱ्या, दारूच्या आहारी गेलेल्या या वेड्या माणसाला सुचतं ते म्हणजे ‘टोबा टेक सिंह’.

भारत पाकिस्तान वेगळे झाल्यावर हिंदू आणि मुसलमान वेड्यांचीही वाटणी करायची असा शहाणा विचार करणाऱ्या सरकारांची आणि “ओपड़ दी गड़ गड़ दी अनैक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल उफ़ दी लालटैन”  अशी बडबड करणाऱ्या बिशन सिंग नावाच्या वेड्याची ही कथा.

खरतर टोबा टेक सिंह हि खरंच एक जागा आहे जी सध्या पाकिस्तानमध्ये आहे.

या जागे विषयी एक मजेदार कहाणी सांगितली जाते. इथे टेक सिंह नावाचा एक माणूस येणाऱ्या जाणाऱ्या यात्रीकरुंना आपल्या तळ्यातले पाणी पाजायचा. या प्रांतातील छोट्या तळ्यांना टोबा हे नाव प्रचलित होतं आजही पंजाब, राजस्थान भागात हे नाव वापरले जाते. टेक सिंहचा टोबा म्हणून त्या जागेला काळाच्या ओघात टोबा टेक सिंह हे नाव पडलं. इथे एक महत्वाचे रेल्वे स्टेशन होते. फाळणी नंतरची शहाण्या लोकांनी एकमेकांची केलेली कत्तल एक रेल्वे स्टेशन म्हणून ‘टोबा टेक सिंह’ने सुद्धा अनुभवली.

कदाचित म्हणूनच मंटो या दोन्हीकडच्या धर्माधिष्ठित देशप्रेमी सैनिकी शहाणपणाला तारेच्या कुंपणावर अडकवून आपला राग, चीड, भिती आणि प्रेम व्यक्त करत टोबा टेक सिंहच्या शोधात असणाऱ्या बिशन सिंग नावाच्या वेड्याला म्हणजेच स्वतःलाच न पाकिस्तान न हिंदुस्थान अशा नो मॅन्स लँड मध्ये मुक्ती देतो.

जाता जाता एक गोष्ट सांगतो, स्वातंत्र्य मिळाल्या नंतर पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरपंथी लोकांनी या स्टेशनच नाव बदलून दर-उल-इस्लाम करायचा घाट बऱ्याचदा घातला पण गावातल्या लोकांनी सद्भावना, एकता आणि शांती याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या ‘टोबा टेक सिंह’च नाव बदलू दिले नाही. आपल्याकडच्या रस्ते, स्टेशन आणि गावांची नावं बदलून इतिहास बदलतो असं समजणाऱ्या लोकांनी सुद्धा यातून थोडंफार शिकायला काहीच हरकत नाही, असो.

“ओपड़ दी गड़ गड़ दी अनैक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल आफ़ पाकिस्तान ऐंड हिंदोस्तान आफ़ दी दरफ़टे मुँह”

मंटोच्या काही कथांचा मी उल्लेख केला. काही ज्या मला वाटल्या कि थोड्या बहुत तरी सांगितल्या पाहिजेत त्या सांगितल्या. फक्त तेवढ्याने मंटो नावाचा माणूस कदाचित आपल्याला पूर्ण कळणार नाही. पण तरीही हे मला गरजेचं वाटलं. पण मंटो वाचावा लागेलच, नुसता बघून समजणारा तो नाही.

सिनेमा तर बघायालाच हवा  पण जोपर्यंत तुम्ही मंटो वाचत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला समजूच शकत नाही. कदाचित मंटो वाचल्यावर समजेल .. पण असेही मी म्हणू शकत नाही.

प्रत्यक्षात कधीही न भेटलेल्या पण पुस्तकातून नेहमी भेटणाऱ्या त्या माणसाला पडद्यावर बघण्याची इच्छा तर प्रचंड आहे. पण इथे हिमाचलमध्ये जेंव्हा पुराने मागच्या आणि पुढच्या गावाला जोडणारे रस्ते तोडले आहेत अशावेळी मी फक्त त्याला आठवू शकतो.

मंटो वेडा नव्हता. तो आजूबाजूच्या वेड्यांना शहाणं करायचा प्रयत्न करत होता. जे तो आजही करतोय. समाजाने आपला संवेदनशीलपणा गमावू नये हे तो अजूनही ओरडून सांगतोय. ऐकू शकत असाल तर कृपया एका.

मंटो त्याच्या काळाच्या पुढचा लेखक म्हणून गणला जातो. लेखकाला काळाच्या गणितात बांधणारे लोक फार चतुर असतात त्यांना न झेपणाऱ्या लोकांना अश्या काळाच्या फुटपट्टीने मोजणे हे त्यांच्या फायद्याचं असत.

सत्य मांडणारा कोणीही काळाच्या पुढे नसतो किंवा मागे, तो असतो केवळ वर्तमानात. ते सहन करण्याची ताकद आपल्यात नसते त्यामुळे आपण त्याला पुढे ढकलतो वास्तविक आपणच काळाच्या मागे असतो.

मंटोच्या नजरेत कोणीही मूल्यहीन, सभ्य-असभ्य, शहाणा-मूर्ख वगैरे नसावा. प्रत्येकाला काही एक अर्थ आहे जो ज्याला त्याला सापडेलच कदाचित म्हणून प्रत्येकाला तो त्याच आशेने भेटत असावा. हे त्याच्या कथांतून पात्रातून कायम दिसत आलं.

मुद्दा इतकाच त्याच्या कथेतून तो समोरच्याला थेटपणे भिडायचा आणि त्यामुळे समाजासाठी तो गुनहगार मंटो होता बदनाम मंटो होता.

हरकत नाही, कारण अगदी साहिरच्या शब्दात बोलायचं झालं तर, ‘बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं हूं मैं.’ मंटोला हे कायम लागू होतं, असेल आणि राहील.

मंटो म्हणायचा,”ऐसा होना मुमकिन है कि सआदत हसन मर जाए और मंटो ज़िंदा रहे”

आपल्या सध्याच्या घाणीच्या, दुर्गंधीच्या वातावरणात असे हजारो क्रांतिकारी गुनहगार मंटो निर्माण होवोत, जिवंत राहोत इतकीच अपेक्षा.

  • साहिल कल्लोळी
4 Comments
  1. सचिन सुरव्या says

    सूंदर लेख साहिल.

Leave A Reply

Your email address will not be published.