भिवंडीच्या मोहल्ल्यात छत्रपतींची मिरवणूक निघाली. अग्रभागी होता सेनेचा वाघ साबीर शेख.

शिवसेना म्हणजे प्रखर हिंदुत्वाच दुसरं नाव होतं. मुंबईत मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या शिवसेनेने संपूर्ण देशभरात बहुसंख्य असूनही कायम अन्यायग्रस्त असलेल्या हिंदूचे प्रश्न मांडले, आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे सोडवले.

भगवी शाल पांघरलेले, हातात रुद्राक्षाची माळ असणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हिंदूहृद्य सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले.

बाबरी मशिदीच्या पतनानंतर बाकीच्या पक्षाचे नेते पळ काढत होते तेव्हा बाळासाहेबांनी ती मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली अस ठणकावून सांगितल होतं. असे हे रोखठोक बाळासाहेब ठाकरे मुस्लीमविरोधी आहेत असे चित्र त्याकाळच्या माध्यमांनी रंगवलं.

पण त्यांना कुठे माहित बाळासाहेबांचा मानसपुत्र शिवसेनेचा वाघ साबीर शेख जन्माने मुस्लीम होता.

साबीर शेख मुळचे पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांचा हा भाग.  मुसलमान असले तरी साबीर शेख यांच्या घरात अध्यात्माची परंपरा होती. वडील प्रवचनकार होते. घरातल्या वातावरणामुळे साबीरभाईंना संतवाङ्मयाची गोडी लागली.

ज्ञानेश्वरी, रामदास तुकोबारायांचे अभंग तर त्यांच्या जिभेवर वास करायचे. शिवनेरी, हरिश्चंद्रगड, नारायणगड, ढाकोबा अशा अनेक गडकिल्ल्यांच्या अंगाखांद्यावर लहानाचे मोठे झालेल्या साबीर भाईना शिवछत्रपतींच्या इतिहासाचे, आपल्या संस्कृतीचे प्रचंड आकर्षण होते.

यातूनच गडकिल्ले भ्रमंतीचे त्यांना वेड लागले.

साबीरभाईच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पोट भरण्यासाठी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी मुंबर्ईत अंबरनाथ येथे ऑर्डनन्स फॅक्टरीत कामगार म्हणून नोकरी स्वीकारली.

अगदी याच काळात मुंबर्ईत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यांचे प्रखर विचार, ओजस्वी वाणी, रोखठोक शैली यामुळे मुंबईत अनेक तरुण भारावून गेले.

मुंबईत भगवं वादळ घोंगावत होतं.

बाळासाहेबांच्या विचारांनी झपाटलेल्या शिवसैनिकांच्या पहिल्या फळीत साबीर भाई शेख यांचा देखील समावेश होता.

२९ सप्टेंबर १९६८ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी कल्याणातील दुर्गाडी किल्ल्यावर कायदा मोडून दुर्गा देवीची पूजा बांधायचं ठरवलं.

बाळासाहेबांसाठी प्राण देखील पणाला लावण्यासाठी तयार असलेले साबीर भाई आपल्या कल्याणमधील तरुण सहकाऱ्यांसह या आंदोलनात हिरीरीने सामील झाले. मलंगमुक्तीच्या आंदोलनातदेखील साबीरभाईचे नेतृत्व कौशल्य बाळासाहेबांच्या प्रकर्षाने लक्षात आले.

ठाणे जिल्ह्य़ात शिवसेना गावागावांत पोहोचविण्यामध्ये आनंद दिघेंसोबत त्यांचाही हात आहे. अध्यात्म, राजकारण, संतवाणी यांचा खुबीने वापर करणाऱ्या शेख आडनावाच्या माणसाच्या भाषणांमुळे जिल्ह्य़ातील अनेक तरुण त्या वेळी शिवसेनेशी जोडले जाऊन ठाणे जिल्हा शिवसेनामय झाला.

कल्याणच्या उपशहरप्रमुखांपासून ते ठाणे जिल्हाप्रमुखांपर्यंत अनेक पदे भूषवली.

राजकीय चळवळी सुरूच होत्या मात्र याच सोबत गडकिल्ले पालथे घालणे सुरूच होते. आज अनेकजण ट्रेकिंगसाठी किल्ल्यांवर जातात पण महाराष्ट्राच्या गिर्यारोहक महासंघाचे पहिले अध्यक्ष साबीरभाई शेख होते हे अनेकांना ठाऊक नसते.

महाराष्ट्रात गिरीभ्रमंतीचा तरुणाईमध्ये पायंडा पाडण्यात साबीरभाई शेख यांचाही सिंहाचा वाट आहे. शिवचरित्र, अभंग, कीर्तन-प्रवचनाची घराची परंपरा त्यांनी देखील पुढे चालवली.

साबीर भाईंचे शिवछत्रपतींवरील प्रेम, अभ्यास बघून बाळासाहेबांनी त्यांना शिवभक्त ही उपाधी दिली होती.

१९८२मध्ये भिवंडीमध्ये हिंदूमुसलमान भयंकर दंगल घडून गेली होती. त्यावर्षी तिथल्या शिवसैनिकांनी जिद्दीने मोहल्ल्यातून शिवजयंतीची मिरवणूक काढण्याचा अट्टहास धरला होता. या मिरवणुकीच्या अग्रस्थानी साबीरभार्ई होते.

शिवसेना ही धार्मिक द्वेष करत नाही तर अन्यायाचे राजकारण करणार्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा धडा शिकवते हे या माध्यमातून समोर आले.

साबीर भाईवर अनेकदा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यानी हल्ले केले पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचे कडे कायम असल्यामुळे त्यांच्या केसालाही कधी धक्का लागला नाही.

साबीर भाईंच्या घरात ईद आणि दिवाळी सारखीच साजरी होत असे. ज्या भक्तीभावाने नमाजासाठी डोके टेकवले त्याच भावाने मारुतीच्या मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होऊन नारळ फोडले. रोजा आणि चतुर्थीचा उपवास त्यांच्यासाठी एक सारखेच होते.

त्यांच्या याच गुणामुळे बाळासाहेब ठाकरे त्यांचा माझा मानसपुत्र म्हणून उल्लेख करीत.

१९९० साली साबीर भाई आमदार झाले.पुढचे तीन टर्म त्यांनी आमदारकी राखली.

महाराष्ट्राच्या विधीमंडळावर जेव्हा युतीचा झेंडा फडकला तेव्हा बाळासाहेबांनी साबीर भाईंना कामगार मंत्रालयाची जबाबदारी दिली. स्वतः कामगार म्हणून काम केले असल्यामुळे त्यांना  त्यांच्या प्रश्नांची जाणीव होती. अनेकदा सिस्टीमच्या विरोधात जाऊन त्यांनी कामगारांच्या बाजूने निकाल दिले.

शिवसेनेची सत्ता असताना मंत्री राहिलेल्या, तीन वेळा आमदार राहिलेल्या साबीर भाई शेख यांनी स्वतःसाठी मात्र काही संपत्ती जमवली नाही. आमदारकीच्या काळातही कल्याण जवळच्या कोन या गावी चाळीत त्यांचं वास्तव्य होतं.

अखेरच्या काळात अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलं. स्वतःसाठी काही गंगाजळी न साठवल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली. नव्या पिढीच्या नेत्यांच, सरकारच, प्रशासनाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं.

साबीर भाईनी देखील कोणाकडे मदत मागितली नाही.

त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन कल्पतरू युवाविकास मंचच्या वतीने पुढाकार घेतला व साबीर भाईंना कल्याणातून औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रमात हलवले. त्यांनी आपले उत्तर आयुष्य तिथेच व्यतीत केले.

कपाळावर भगवा टिळा, गळ्याभोवती भगवा गमछा आणि मुखी ज्ञानेश्वरांच्या ओव्या असलेला शेख आडनावाचा हा शिवसेनेचा वाघ १५ ऑक्टोबर २०१४ रोजी अनंताच्या यात्रेला निघून गेला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.