२०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सचिन त्या रात्री झोपु शकला नव्हता.

२४ फेब्रुवारी २०१०. बरोबर दहा वर्षापूर्वीची गोष्ट.

ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान वन डे सामना होत होता. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सचिन आणि सेहवाग ओपनिंगला उतरले. का काय माहित पण सेहवाग नेहमीच्या फॉर्ममध्ये नव्हता. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला स्टेनने आपल्याच बॉलिंग वर त्याचा कच सोडला. तो जास्त वेळ टिकलाही नाही. चौथ्या ओव्हरला पारनेलने त्याला आउट काढले.

त्याच्या जागी दिनेश कार्तिक आला. सेहवाग लवकर आउट झाल्यामुळे कार्तिक प्रचंड प्रेशरखाली आलेला जाणवत होत.

दुसऱ्या बाजूला सचिन मात्र प्रचंड एकाग्र झाला होता. विरूच्या आउट होण्याचा त्याच्यावर काही खूप परिणाम झालेला नव्हता. काही वेळात कार्तिक देखील सेट झाला. दोघांनी मिळून सिंगल,डबल, खराब बॉल आला की फोर सिक्स अस करत स्कोरबोर्ड हलता ठेवला. ३३ व्या ओव्हरपर्यंत विकेट जाऊ दिली नाही.

दिनेश कार्तिक ८९ धावा काढून आउट झाला. टीमच्या २१९ धावा झाल्या होत्या. सचिनची सेंच्युरी झाली होती. पीच अजून बॅटिंगसाठी जबरदस्त दिसत होते.

महाप्रचंड स्कोर होणार हे स्पष्ट होतं.

अशावेळी कॅप्टन कुल धोनीने एक विचित्र निर्णय घेतला, विराट कोहली, रैना आणि स्वतःच्या जागी खालच्या नंबरवर खेळणाऱ्या युसुफ पठाणला वर पाठवले. पण हा निर्णय गेम चेंजर ठरला. युसुफ ने आल्या आल्या धुलाई सुरु केली. त्याने मोमेंटम बदलल्यामुळे सेट झालेल्या सचिनने देखील आडवा पट्टा सुरु केला. युसुफ पठाण जास्त वेळ टिकला नाही. अवघ्या ३५ धावा काढून तो पव्हेलीयनमध्ये परतला होता.

पण सचिनला खरा सूर गवसला होता. त्याने ठरवले आज थांबणे नाही. 

पहिल्या १०० काढायला ९० चेंडू घेतलेल्या सचिनने पुढच्या २८ बॉलमध्ये ५० धावा काढल्या. निम्मा भारत आधीच टीव्हीसमोर होता, उरलेल पब्लिक सुद्धा हळूहळू टीव्हीकडे आलं. आज काही तरी वेगळ होणाराय याची चाहूल लागली होती. स्कोरची चर्चा व्हायरल होत होती.

नुकताच इंटरनेट आपल्या मोबाईलमध्ये घुसला होता. अजून ऑफिस मध्ये असलेले गरीब बिचारे आयटी वाले दिनवाणे पणे स्कोरकडे बघत होते. काही जन पोटात दुखत आहे सांगून घरी पळाले देखील. धोनी आला होता. धोनीने तर युसुफ पठाणच्या पुढे एक पाऊल जात धुलाई चालू ठेवली.

पहिल्या ओव्हरपासून खेळत असलेला ३६ वर्षाचा सचिन मात्र जरा सुद्धा दमला आहे असे वाटत नव्हते.

सगळ्यांच लक्ष्य होतं पाकिस्तानच्यासईद अन्वरच्या १९४ धावा. गेली अनेक वर्ष हा वनडेमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला नव्हता. विशेष म्हणजे अन्वरने भारताविरुद्ध हा रेकोर्ड केला होता आणि तो सचिनने मोडावा अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा होती.

४५ व्या ओव्हरला सचिनने पार्नेलच्या बॉलवर त्याने २ धावा काढल्या आणि रेकॉर्ड क्रॉस झाला. अख्ख्या भारतात फटाक्यांची आतिषबाजी झाली. पण पिक्चर अभी बाकी था.

५ ओव्हर उरले होते. आता सचिनच्या २०० धावा सहज होतील. असच सगळ्यांना वाटू लागल. पण दरम्यानच्या काळात धोनीला ताव चढला. ४९ व्या ओव्हर मध्ये त्याने दोन सिक्स आणि एक फोर मारला. धोनीच्या घरचे सुद्धा त्याला शिव्या घालत असतील. नास्तिक लोक सुद्धा देव पाण्यात घालून बसले होते. सचिन स्ट्राईकवर आल्यावर अनेकांचा बिपी लो झाला होता.

अखेर शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला सचिनने एक रन धावून २०० च बॅॅॅरीयर तोडून टाकल. काही वर्षापूर्वी कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ते सचिनने करून दाखवलं होतं. कोणताही रनर न घेता ३६ वर्षाचा सचिन पूर्ण ५० ओव्हर खेळून नाबाद राहिला होता हे देखील एक प्रकारचे आश्चर्य ठरल होतं.

पुढची मॅच सुद्धा कोणी पहिली नाही. आपण मॅच जिंकली पण त्या आधीच सगळ्या भारतात दुसरी दिवाळी साजरी झाली होती.

खरं तर त्या दिवशी सचिनच्या राक्षसी खेळीमुळे डेल स्टेन वगैरे आफ्रिकन बॉलरची  झोप  उडायला हवी होती पण झाल उलटच !

त्या रात्री ग्वाल्हेरच्या हॉटेलने त्याला आणि धोनी ला स्पेशल स्युट दिलेली होती. या रूम्स इतरांच्यापासून दूर होत्या. सचिनची स्युट एवढी मोठी होती की त्यात एक प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील होता. बाथरूमसुद्धा एखाद्या हॉल एवढा मोठा होता. गॅलरीमधून बाहेर पाहिलं तर निरव शांतता आणि फक्त झाडांचा आवाज.

त्या दिवशी जगातला सर्वात खूष असलेला तेंडूलकर या एवढ्या मोठ्या स्युटमध्ये एकटाच बसला होता. दिवसभर लाखोजन आरोळी ठोकत असलेला “सचिन सचिनचा” गजर अजूनही त्याच्या कानात घुमत होता. ही प्रचंड शांतता त्याच्या अंगावर येत होती. थोडी भीती देखील वाटत होती.

त्याने बाथरूमचे दिवे चालू ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला पण दिवसभर दमछाक होऊनही त्याला झोप येईना.

अखेर मोबाईलवर भरून वाहात असलेल्या एसएमएसना रिप्लाय देत बसू अस त्यान ठरवल. एका पाठोपाठ एक हजारो मेसेजना त्याने थँक यु चे रिप्लाय पाठवले. अस करता करता सकाळ झाली पण बिचारा सचिन झोपलाच नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.