सचिनची आयडिया कामाला आली आणि द्रविडच्या बॅटिंगने किवी बॉलर्स पिसे काढली…

१९९९ साली न्यूझीलँडने भारत दौरा केला होता या दौऱ्यातला एक मजेशीर घटना. ज्यामुळे सचिन आणि द्रविडने एक मोठी भागीदारी करून न्यूझीलँडचा पराभव केला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांनी मिळून तब्बल ३३१ धावांची भागीदारी केली होती पण हि पार्टनरशिप टिकून ठेवण्यामागे एक किस्सा आहे.

हैदराबादमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलँड असा एकदिवसीय सामना सुरु होता. सौरव गांगुली केवळ चार धावा काढून बाद झाल्याने भारतीय संघ दबावात होता. न्यूझीलँडच्या गोलंदाजांनी आक्रमक रीतीने खेळ करत भारतावर दडपण आणलं होतं. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड मैदानात आले आणि त्यांनी सुरवातीला संयमी खेळ करत एकेरी दुहेरी धावांवर भर देत स्कोरबोर्ड हलता ठेवला.

न्यूझीलँडचा गोलंदाज क्रिस केर्न्स हा मात्र वेगवान गोलंदाजी करत होता. त्याचे स्पेल खेळणं दोघांनाही अवघड जात होतं आणि त्यातही त्याचा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. सचिन आणि द्रविड त्याची गोलंदाजी खेळताना अडखळत होते. थेट कानापासून जाणारे त्याचे बाउन्सर आणि स्टम्पजवळ पडणारे त्याचे अचूक यॉर्कर , कधीही इनस्वींग, आऊटस्विंग होणारे त्याचे चेंडू यामुळे सचिन आणि द्रविड वैतागले होते. प्रत्येक ओव्हरमध्ये केर्न्स या दोघांना दोन तीन चेंडू तरी बिट करायचा म्हणजे करायचाच.

यावर युक्ती काढली पाहिजे म्हणून ते दोघे विचार करु लागले. सचिनला एक आयडिया सुचली आणि तो गोलंदाजी करणाऱ्या केर्न्सच्या हातांवर लक्ष ठेवू लागला. चेंडू जर रिव्हर्स स्विंग होत असेल तर बॉलच्या शाईनवर फलंदाजाचं लक्ष असतं, ज्या बाजूला शाईन असेल त्याच बाजूला चेंडू जातो हे सचिनला समजलं. मग त्याने द्रविडला जवळ बोलावून सांगितलं कि,

मी बॅट ज्या हातात पकडील त्या बाजूला बॉल जाणार आहे , जर मी डाव्या हातात बॅट पकडली तर बॉल आऊटस्विंग असणार आहे आणि जर मी बॅट उजव्या हातात पकडली तर बॉल इनस्वींग असणार आहे. या हिशोबाने खेळ म्हणजे विकेट जाणार नाही आणि आपले रनही होत राहतील.

द्रविडने ओके म्हणून खेळायला सुरवात केली. सचिन ज्यावेळी स्ट्राईकला जाई त्यावेळी द्रविड त्याला बॅटने इशारा करत असे. त्यानंतर मात्र केर्न्सच्या प्रत्येक ओव्हरमध्ये दोन तीन चौकार येऊ लागले. आत्तापर्यंतचा चांगला चाललेला क्रिस केर्न्सचा स्पेल या जोडीने झोडपून काढला.

यावर केर्न्सचा आत्मविश्वास गेला आणि तो विचार करू लागला कि या दोघांमध्ये काहीतरी चर्चा चालली आहे, आणि आपले प्लॅन्स या दोघांना कळत आहे. दोघेही बॅटींच्या हालचाली करून एकमेकांना खुणावत आहेत हे त्याला कळलं.

क्रिस केर्न्स मग सचिनवर बारीक लक्ष ठेवायला सुरवात केली, मग त्याने एक चेंडू क्रॉस सीम करून पकडला आणि धावत जाऊन चेंडू टाकला आणि तो लगेच मागे सचिनकडे वळून त्याची बॅट कोणत्या दिशेला आहे याकडे पाहू लागला. मग केर्न्सने सचिनला विचारलं कि,

बोल आता यावर तुझ्याकडे काय उत्तर आहे.

पण सचिनला हि गोष्ट होणार याचा आधीच अंदाज होता म्हणून त्याने द्रविडला आधीच सांगितलं होतं कि,

ज्यावेळी मला माहिती नसेल कि आता कोणता बॉल पडणार आहे तेव्हा मी बॅट मध्ये पकडणार आहे.

राहुल द्रविडनेही चांगल्या प्रकारे तो चेंडू खेळला. ज्यावेळी मॅच चालू असते तेव्हा बॅट्समन हा बॉलरकडे बघत असतो मात्र हि अशी पहिलीच मॅच होती ज्यात बॅट्समन सचिनकडे पाहत होता.

या सामन्यात सचिनने १८६ धावा आणि द्रविडने १५३ धावा केल्या होत्या. ३३१ धावांची मोठी भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.