इंझमामचं ते एक वाक्य सचिन कधीच विसरणार नाही.

गोष्ट आहे २००४ सालची. जवळपास १५ वर्षांनी भारतीय क्रिकेट टीम बहुचर्चित अशा पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. म्हणजे सचिनने पदार्पण केल्यापासून थेट आताच. मध्यंतरी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तीन वनडेची छोटीशी सिरीज पाकिस्तानमध्ये झाली होती पण तो काही दौरा या सदरात मोडत नव्हता.

कारगिल युद्धामुळे थंडावलेली शांततेची बोलणी परत सुरु करण्यासाठी वाजपेयीजीनी पुढाकार घेतला आणि गांगुलीच्या नेतृत्वाखालील आपली टीम पाच वनडे आणि 3 कसोटीच्या एक महिन्याच्या दौऱ्यावर पाकिस्तानला उतरली.

किती जरी नाही म्हटल तरी कारगिलची जखम ताजी होती आणि दोन्ही देशाच्या प्रेक्षकांसाठी हे सामने एखाद्या धर्मयुद्धाप्रमाणे लढले जाणे अपेक्षित होते.

भारताची टीम तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये होती. सचिन, सेहवाग,द्रविड, गांगुली,लक्ष्मण सारखे तगडे बॅटसमन आपल्याकडे होते. तर पाकिस्तानच्या शोएब अख्तरची रावळपिंडी एक्स्प्रेस टॉप गियर मध्ये होती. पाकिस्तानी बॉलरसोबतच आणखी एक अडथळ्याचा डोंगर भारताला पार करावा लागणार होता,

“इंझमाम उल हक”

१९९२ च्या वर्ल्ड कप पासूनचा पाकिस्तानचा स्टार बॅट्समन इंझमाम उल हक हा आपल्या बॉलर्सचा कर्दनकाळ होता. अगडबंब इंझमाम एकदा पीचवर सेट झाला तर कोणाच्या बापाला सुद्धा आउट होत नाही हे भारतातल्या शेंबड्या पोरांना सुद्धा माहित होतं. म्हणून त्याच्यावर भारतीय फन विशेष दात खाऊन असायचे. एकदा तर इंझमामला प्रेक्षकांनी आलू आलू म्हणून चिडवले आणि रागाच्या भरात त्याने मैदानातच पिटाई केली.

यामुळेच भारतीय प्रेक्षक आणि इंझमाम उल हक हे नाते कडवटच राहिलेले होते.

आणि आता तर इंझी पाकिस्तानचा कप्तान होता. आलू बरोबरच आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरिमनी मधल्या त्याच्या अगाध इंग्रजीवर जोक बनणे सुरु झाले होते.  शीघ्रकोपी इंझमाम या सगळ्याला कसे हँडल करतो ते महत्वाचे होते.

मुलतानमध्ये कसोटी सामना खेळवला जाणार होता. भारतीय टीम तिथल्या ग्राउंडवर सराव करत होती. काही वाईट घटना घडू नये म्हणून सुरक्षाव्यवस्था देखील कडक करण्यात आली होती. टीमच नेट प्रॅक्टीससेशन संपल तेवढ्यात पाकिस्तानी जर्सी घातलेला एक तीन-चार वर्षाचा लाजाळू मुलगा तिथे आला.

कोणालाच कळेना हा कोण आहे. एवढ्या छोट्या फॅनला आत कसे सोडले हा विचार भारतीय कप्तान सौरव गांगुलीच्या मनात आला. 

त्या मुलाने काही न बोलता हातातली ऑटोग्राफची वही थेट सचिनपुढे धरली, इतक्यात मागून धीम्या गतीने चालत चालत इंझमाम तिथे येऊन पोहचला. तो मुलगा इंझमामचा होता. इंझी आपल्या स्टाईलने हळूवार स्वरात सचिनला म्हणाला,

“क्या है की जी ये लडका मेरा है मगर फॅन आपका है !! “

हे ऐकून सचिन अगदी भारावून गेला. इंझमाम आणि त्याच्या मुलाने काही काळ भारतीय टीमबरोबर घालवला. राहुल द्रविडने या छोट्या इंझीला बॅटींगच्या टिप्स देखील दिल्या.

तस पाहायला गेल तर सचिन आणि इंझमाम दोघेही एकाच काळातले खेळाडू, दोघांच्यात रन्स बनवण्यात स्पर्धा निश्चित होती. तरीही इंझमामने प्रामाणिकपणे ते वाक्य बोलून मोठ्या मनाच दर्शन घडवल होतं. सचिनचा इंझीबद्दलचा आदर देखील वाढला. 

धर्मयुद्ध म्हणवल्या गेलेल्या त्या सामन्यामध्ये दोन्ही टीममेम्बर्समध्ये मैदानाबाहेर मैत्रीचे संबंध कायम राहतील हे सांगणारं इंझमामच ते छोटसं पाउल दोन्ही देशाच्या प्रेक्षकांसाठी देखील एक धडा होता. आजही सचिन पाकिस्तानसोबत क्रिकेट सामन्याबद्दल बोलताना या घटनेचा उल्लेख हटकून करतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.