सचिन आणि विनोद कांबळीने त्यांना बड्डेच्या दिवशी एप्रिल फुल बनवलेलं.

१९९४ साली भारतिय क्रिकेट टीम न्युजीलंडच्या दौऱ्यावर गेली होती. एक टेस्ट आणि ४ वनडे खेळले जाणार होते. अझरूद्दीन भारताचा कॅप्टन होता. भारताचा महान ऑल राउंडर कपिल देवची रिटायरमेंट जवळ आली होती. तर सचिन, कांबळी, अजय जडेजा, श्रीनाथ या नव्या दमाच्या खेळाडूंचा जमाना होता. यातले बरेच जण पहिल्यांदा न्युझीलंडला आले होते.

या सगळ्या नव्या जुन्या खेळाडूंचा टीमवर वचक राहावी म्हणून जेष्ठ खेळाडू अजित वाडेकर यांना मॅनेजर म्हणून टीम सोबत पाठवण्यात आलेलं. भारताला परदेशी भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकून दिलेले सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून वाडेकर यांच्या बद्दल सर्वाना आदर होता. क्रिकेट मध्ये त्यांच्या शब्दाला मान होता.

मुंबईचे असल्यामुळे सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी हे वाडेकर यांचे विशेष लाडके होते. या अठरा एकोणीस वर्षांच्या मुलांबरोबर वाडेकर यांची चांगलीच गट्टी जमली होती. वयाने दुपटीने मोठे असले तरी अजित वाडेकर यांना जित्या म्हणायची परवानगी तेंडुलकर आणि कांबळी यांना मिळालेली होती. 

या पूर्ण न्युजीलंड सिरीज मध्ये वाडेकर कुठे जातील तिथे त्यांच्या मागे मागे त्यांची शेपूट बनून हे दोघे फिरत असत. दररोज सकाळी ब्रेकफास्ट पासून ते संध्याकाळच्या डिनरपर्यंत सचिन आणि विनोद आपले खाण्याचे पैसे वाचावेत यासाठी वाडकर यांच्या रूमवर जात.

जरी मैदानाबाहेर चेष्टामस्करी चालत असली तरी मैदानात वाडेकर यांची ओळख कडक हेडमास्तर अशीच होती. नेट सेशन मध्ये प्रक्टिस सुरु असताना वाडेकर कोणावरही द्या करत नसत. तरुण खेळाडू असो अथवा अनुभवी खेळाडू सर्वाना मॅच अगोदर नेटमध्ये घाम गाळावा लागे. 

न्यूझीलंड सोबतच्या वनडे सिरीजवेळी अशाच एका हेक्टिक नेट सेशन नंतर सगळे दमून हॉटेलवर आले आणि लवकर झोपी गेले.

रात्री जवळपास बारा वाजता वाडेकर यांना रूमचा दरवाजा कोणीतरी खटखटतय असा आवाज आला. त्यांना आश्चर्य वाटलं. काही तरी इमर्जन्सी असेल म्हणून त्यांनी दार उघडलं. दारात सचिन उभा होता. तो खूप घाबरलेला दिसत होता. वाडेकरनी काय झालं म्हणून विचारलं. सचिन म्हणाला,

“कपिल देव यांची तब्येत खूप बिघडली आहे. तुम्ही लगेच बघायला चला. “

वाडेकर यांना तेवढ्या रात्री देखील घाम फुटला. कपिल टीमचा सर्वात सिनियर खेळाडू होता. त्याची रूम त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या सर्वात खालच्या मजल्यावर होती. अजित वाडेकर आहे त्या कपड्यात  कपिलच्या रूमकडे धाव घेतले.

कपिलच्या रूमच दर उघडल्यावर पाहतो तर काय? कपिलला काहीच झालेलं नव्हत पण अख्खी टीम तिथे हजर होती.  त्या दिवशी १ एप्रिल होता आणि अजित वाडेकर यांचा वाढदिवस देखील होता आणि म्हणून पूर्ण टीमने वाडेकर यांचा बकरा बनवायसाठी कपिलच्या रूममध्ये बोलावलं होत.

केक वगैरे कापण्यात आले, शम्पेनच्या बॉटल फोडण्यात आल्या. कपिलच्या रूमवर फुल सेलिब्रेशन चाललेलं. अचानक कोणी शेजारच्या खोली तून सहा बेली डान्सर तिथे आल्या. त्यांनी वाडेकर यांच्या भोवती गोळा होऊन नाच सुरु केलां. त्यांच्या सोबत धुंद होऊन सगळे खेळाडू रात्रभर नाचत राहिले.

हा सगळा प्लॅन कॉमेंटेटर म्हणून दौऱ्यावर आलेल्या सुनील गावस्कर यांनी घडवून आणला होता. फक्त कोणाला शंका येऊ नये म्हणून छोट्या सचिनला पाठवलं होत. अजित वाडेकर यांना आयुष्यभर हा वाढदिवस लक्षात राहिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.