आणि सचिनने वकार युनुसला खुन्नस देत मैदानातच शिवी दिली, “तुज्यायचा घो” !

भारत-पाकिस्तान या २ पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमधला क्रिकेटचा सामना  सामना म्हंटलं की क्रिकेटच्या मैदानाला युद्धाभूमीचं स्वरूप आलेलं असतं. माध्यमांनी देखील तशीच वातावरणनिर्मिती केलेली असते. मैदानावर देखील बऱ्याचवेळा काट्याची टक्कर होते आणि अनेक वादग्रस्त प्रसंगही उद्भवतात. खेळाडूंमध्येही वाक्युद्ध बघायला मिळत. भारत-पाकिस्तान सामन्यातल्या अशाच एका वाकयुद्धाचा एक किस्सा माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूने एका कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.

किस्सा आहे १९८९ सालचा.

भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. दौऱ्याच्या पहिल्याच कसोटीत भारताकडून सचिन तेंडूलकर, सलील अंकोला आणि पाकिस्तानकडून शाहीद सईद आणि वकार युनुस यांनी कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. सिरीजमधल्या पहिल्या ३ कसोटी अनिर्णीत राहिल्या होत्या. त्यामुळे चौथी कसोटी जिंकून सिरीज खिशात घालण्यासाठी पाकिस्तानने चांगलाच जोर लावला होता. पाकिस्तानचा कॅप्टन इमरान खानने पीच क्युरेटरला दमच भरला होता,

“अगर घास काटा तो मै तेरी गर्दन काट दुंगा”

सियालकोटच्या मैदानावर चौथी कसोटी सुरु झाली. भारताने पहिल्या डावात ३२४ रन्स काढल्या. वसिम अक्रमने ५ विकेट्स काढल्या. प्रत्युत्तरात विवेक राजदानच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ आपल्या पहिल्या डावात फक्त २५० रन्स काढू शकला.

आता भारताच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि पीचवरील गवताने आपली किमया दाखवायला सुरुवात केली. हिरव्यागार गार खेळपट्टीवर आपल्या फलंदाजांचे काय हाल होतात, हे इथं वेगळं सांगायलाच नको. त्यावेळी देखील परिस्थिती काही फारशी वेगळी नव्हतीच. भारताच्या ३८ रन्सवर ४ विकेट्स पडल्या होत्या. इम्रान-अक्रम-वकार या तिकडीचे बॉल्स नेमके येत कसे होते अन जात कसे होते हेच कळायला मार्ग नव्हता.

नवज्योत सिंग सिद्धू पीचवर होता आणि रवी शास्त्री आउट झाल्यानंतर सचिन तेंडूलकर नावाचं १६-१७ वर्षांचं पोरगं मैदानात आलं होतं. सिद्धूने विचार केला आता काय राहिलंय खेळात..? भल्याभल्यांना खेळायला जमत नव्हतं, हे पोरगं काय खेळणार. हाच विचार पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात देखील सुरु होता.

वकार युनुसचा पहिला बॉल सचिन बीट झाल्यानंतर वकारने सचिनवर बाउन्सर फेकला. सचिनने हुक करण्याचा प्रयत्न केला पण बॉल बॅटवर लागून सचिनच्या नाकावर आदळला. सचिनच्या नाकातून रक्त यायला लागलं. सिद्धू घाबरला. त्याला वाटलं मेलं आता पोरगं. आता हा रिटायर होऊन बाहेर जाणार म्हणून त्यासाठी मैदानात स्ट्रेचर बोलावण्यात आलं. परंतु सिद्धू ज्यावेळी मैदानात पडलेल्या सचिनजवळ पोहोचला, त्यावेळी त्याचे शब्द होते,

“मै खेलेगा”

१५-१६ वर्षाच्या सचिनची ही जिद्द, धैर्य आणि देशासाठी खेळण्याची तळमळ बघून सिद्धुला धक्काच बसला. नाकाला जबरदस्त जखम झालीये, नाकातून येणारं रक्त कपड्यांवर सांडलय आणि हे पोरगं म्हणतय, “मै खेलेगा” 

सचिनने परत स्टान्स घेतला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर सचिनने वकारला खणखणीत चौकार ठोकला. त्यानंतर चिडलेला वकार सचिनजवळ गेला आणि त्याला खुन्नस देत त्याच्याकडे रागाने बघायला लागला. आता यावर सचिनने काय केलं असेल तर त्याने वकारला तितकीच खुन्नस दिली आणि एवढ्यावरच न थांबता तो वकारजवळ गेला आणि त्याला म्हणाला,

“तुज्यायचा घो”

सिद्धूने हा किस्सा मुंबईतल्या एका कार्यक्रमात सांगितला होता. त्यावेळी बोलताना तो म्हणाला की, मला मराठी समजत नाही. त्यामुळे तेव्हाही सचिन वकारला काय म्हणाला होता ते समजलं नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही, पण हे मात्र त्याचवेळी समजलं होतं की “बंदे में दम है”

या सामन्यात सचिनने ५७ रन्सची इनिंग खेळताना सिद्धूबरोबर १०१ रन्सची पार्टनरशिप केली आणि भारताचा पडझड होत चाललेला डाव सावरला. हा निर्णायक सामना देखील अनिर्णीत राहिला आणि त्यामुळे सिरीज देखील अनिर्णीत राहिली.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.