भावाने दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सचिनने ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनां पुरतं रडवलं

गोष्ट आहे २००३-०४ ची. गांगुलीच्या नेतृत्वाखाली बनलेल्या नव्या टीम इंडियाच्या सर्वोच्च उत्कर्षाचा काळ. सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, कुंबळे बरोबरच सेहवाग,हरभजन, झहीर , नेहरा ही ताज्या दमाची मंडळी देखील आपली छाप उमटवत होती. भारत जगात नंबर वन बनण्यासाठी धडपड करत होता.

आपल्या समोर एकच अडथळा होता, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया.

पॉंटिंग, स्टीव्ह वॉची ऑस्ट्रेलिया तेव्हा खरंच एक नंबरला होती. हेडन, गिलख्रिस्ट, जस्टिन लँगर, शेन वॉर्न, ब्रेट ली, मॅकग्रा, गिलेसपी वगैरेची आठवण काढली तरी अनेकांना घाम फुटतो. याच ऑस्ट्रेलियाने भारताला त्याच वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये गारद केले होते. याचा वचपा देखील काढायचा होता.

डिसेंबर जानेवारी महिन्यात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला आली.

स्टीव्ह वॉने निवृत्तीची जाहीर केली असल्यामुळे त्याची ही शेवटची सिरीज होती. वॉर्न आणि मॅकग्रा काही कारणांमुळे टीमच्या बाहेर गेले होते मात्र तरी त्यांची जागा भरून काढण्यासाठी जेसन गिलेस्पी, नॅथन ब्रॅकन स्पिनर स्टुअर्ट मॅकक्गिल हे होते. या बरोबरच त्यांचा मुख्य हत्यार होता आग ओकणारा ब्रेट ली.

भारताच्या सगळ्या आशा सचिन द्रविड गांगुली लक्ष्मण सेहवाग या पंचसूत्रीवर अवलनबुन होत्या. यांच्या जीवावर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत हरवायचं स्वप्न मनात घेऊन आपली टीम आली होती.

पहिली टेस्ट ब्रिस्बेनला होती. गॅब्बाच्या या खेळपट्टीवर दोन्ही टीम एकमेकांशी जोरदार भिडल्या. लंगर आणि हेडन जबरदस्त फॉर्म मध्ये होते. तरी गांगुलीने ठोकलेले झंझावती शतक आणि झहीर खानची बॉलिंग यामुळे भारत हि पहिली टेस्ट ड्रॉ करू शकला.

सुरवात तशी बरी झाली होती. दुसऱ्या ऍडिलेड टेस्टमध्ये मात्र भारतीय टीमने जोरदार पुनरागमन केलं. द्रविडने बॅटिंग पिचचा फायदा उठवत डबल सेंच्युरी झळकवली, लक्ष्मणने देखील शतक काढलं होतं. भारत हि मॅच जिंकला.  

ही मॅच जिंकूनही कप्तान गांगुलीला एकच चिंता सतावत होती, ती म्हणजे भारतीय बॅटिंगचा खांब असलेल्या सचिनचा खराब फॉर्म.

पहिल्या कसोटीत तो डक वर आउट झाला होता. तर दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये १ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३७ धावा काढून आउट झाला. तिसऱ्या कसोटीत पुन्हा सचिन डकवर आउट झाला, कसबस दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ४४ धावा बनवल्या होत्या. या कसोटीत भारताने पराभव स्वीकारला.

सचिन साठी ही धोक्याची घंटा होती. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत इतक्या सलग वेळा फेल होण्याचा पहिल्यांदाच प्रसंग आला होता. शेवटच्या टेस्ट साठी सचिनने फॉर्ममध्ये येणे टीम इंडियासाठी अत्यंत गरजेचे होते.  

भारताचा कोच जॉन राईट याला देखील काय सल्ला द्यावा हे सुचेना झालं होतं. सचिनच्या आउट होण्याच्या व्हिडीओचा अभ्यास केल्यावर लक्षात येत होत की त्याच्या साठी ऑस्ट्रेलियन बॉलरनी खास प्लॅन बनवला आहे.

या मालिकेत सचिनला मुद्दामहून ऑफ साईडला बॉल टाकण्याची योजना ऑसीजनी आखली होती. जे सुरुवातीच्या सामन्यांमध्येही त्यांच्यासाठी प्रभावी ठरली. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह हा त्याचा लाडका शॉट होता, याच शॉटच्या नादात सचिन कांगारूंच्या जाळ्यात अडकला. 

भारतीय टीम शेवटच्या कसोटीसाठी सिडनीला पोचली तेव्हा सचिनला त्याच्या भावाचा अजित तेंडुलकरचा फोन आला. दोघांची उद्याच्या मॅचसाठी रणनीती काय असावी यावर चर्चा सुरु होती. बोलता बोलता अजितने त्याला चॅलेंज दिले की

सिडनी कसोटीमध्ये कव्हर ड्राईव्ह न मारता खेळून दाखव.

सचिनची कारकीर्द घडण्यामध्ये अजित तेंडुलकर यांचा सिंहाचा वाटा आहे. सचिनसाठी त्याचा भाऊ गुरूच्या स्थानी होता. त्याने दिलेल चॅलेंज सचिनने स्विकारलं. दुसऱ्या दिवशी तो खेळायला उतरला तेव्हा त्याची रणनीती स्पष्ट होती,

तो ऑफ साईडवरून चेंडू खेळू खेळणार नाही.    

भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. आकाश चोप्रा आणि सेहवागने शतकी सुरवात केली, मात्र दोघेही लागोपाठ आउट झाले, द्रविड देखील ३८ धावांवर माघारी परतला. आता सचिन आणि लक्ष्मणवर भारताच्या सगळ्या आशा टिकून होत्या.

सचिन त्या दिवशी जबरदस्त एकाग्रतेने मैदानात उतरला होता. ब्रेट ली, गिलेस्पी,ब्रॅकन यांनी त्याला नेहमीप्रमाणे मुद्दामहून ऑफ साईडला बोल टाकण्यास सुरवात केली. पण त्याने त्याला मारण्याचा मोह टाळला. लक्ष्मण आणि तेंडुलकर पिचवर नांगर टाकून उभे होते.

हळूहळू सचिनची फिफ्टी झाली, त्याचा जम बसला तरी त्याने ऑफ साईडला कव्हर मारला नव्हता. कांगारूंना वाटलं आतातरी तो हा शॉट मारेल. त्या दृष्टीने ऑफ साईडचा मारा त्यांनी चालूच ठेवला होता, बघता बघता त्याच शतक झालं, एवढंच नाही द्विशतक देखील झालं. समोर लक्ष्मण आरामात ऑफ साईडला कव्हर मारत होता मात्र सचिन क्रॅश डाएटवर असल्या प्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवून त्या शॉट चा मोह टाळत राहिला.

त्या इनिंगमध्ये सचिन ऑस्ट्रेलियाला आउटच झाला नाही. त्याच्या संयमाचा बांध मोडणे कोणालाही शक्य झालं नाही. ब्रेट ली आणि इतर ऑस्ट्रेलियन बॉलरना सचिनच्या एकाग्रतेने रडवल. हे सचिनचं पहिलं द्विशतक ठरलं. ती मॅच अनिर्णियीत राखण्यात भारतातला यश आलं,

मात्र सचिनची ती इनिंग जगाच्या इतिहासात एक आगळी वेगळी म्हणून नोंद करण्यात आली. आजवर एवढा वेळ एकाग्रता राखणे कोणत्याच बॅट्समनला जमलं नव्हतं. वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा देखील सचिनची हि इनिंग त्याची सर्वात आवडती आणि सर्वोत्तम मानतो.

सचिन मात्र त्या दिवशीच्या बॅटिंगचे श्रेय त्याच्या भावाला आणि समर ऑफ ६९ या गाण्याला देतो. कारण संपूर्ण मॅचचे पाचही दिवस सचिन हेच गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहिला होता. समर ऑफ ६९ मुले त्याची एकाग्रता टिकली व हा विक्रम साकार झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.