सचिनच्या नावाच भारतात एक गाव आहे आणि तिथला नवाब निग्रो आहे.

“सचिन” म्हंटल की आपल्याला एकचं सचिन आठवतो, सचिन तेंडूलकर क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट !! जेव्हा तो मैदानात उतरायचा तेव्हा सचिन सचिन या आरोळीने अख्खा देश हादरून जायचा. या नावाच गारुड भारतीयांच्या मनावर तो रिटायर झाल्यावर अनेक वर्षांनी देखील  राज्य करतय. त्याच्यामुळेचं भारतात सतत वीस वर्षांपासून सचिन नावाच्या मुलांची संख्या वाढली आहे.

एकेकाळी जो तो उठून आपल्या पोराचं नाव सचिन ठेवायचा. पण सचिनचं नाव म्हणे त्याच्या वडिलांनी संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरून ठेवलं होत. तुम्ही म्हणालं ही स्टोरी आम्हाला माहित आहे. पण या ‘सचिन’ नावाच भारतात एक राज्य होतं हे तुम्हाला माहित आहे?

गुजरातमध्ये सुरत जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे सचिन. अख्ख्या सुरत जिल्ह्याप्रमाणे हे गाव देखील हिऱ्यांच्या व्यापारासाठी फेमस आहे. शेती वगैरे जास्त काही समृद्ध नाही पण तसं गाव श्रीमंत आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गावावर राज्य करायचे दूर आफ्रिकेहून आलेले निग्रो बलदंड ‘सिद्दी’. त्यांना म्हणायचे सचिनचे नवाब.

आता हे सिद्दी सचिनचे नवाब कसे बनले यामागे सुद्धा मराठी सत्तेचा हात आहे. 

आपण शाळेत शिकलोय की सिद्दी हे जंजीऱ्याचे राजे होते. जवळपासपाचशे वर्ष सिद्दीनी जंजिर्याच्या किल्ल्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. मराठा साम्राज्याशी त्यांच विशेष सख्य नव्हत. अरबी समुद्रात आंग्रेच्या आरमाराशी त्यांचा कायम छत्तीसचा आकडा असायचा. पण जंजिरा किल्ला अजिंक्य असल्यामुळे कधी त्यांच राज्य संकटात आल नाही.

पहिला बाजीराव पेशव्याने त्यांचा मोठा पराभव केला होता पण त्याने तह करून त्यांना सोडून दिल. किल्ला ताब्यात घेतला नाही. या तहानंतर बराच काळ सिद्दींच राज्य मराठ्यांच्या उपकाराखाली होतं.

या सिद्दीमध्ये देखील राज्याच्या गादीवर कोण बसणार यावरून भाऊबंदकी व्हायची. असाच वाद १७९१ साली झाला. या भांडणात झालेल्या पराभवामुळे अब्दुल करीम याकूत खान नावाचा जिंजीराचा युवराज स्वतःचा जीव वाचवून आश्रयासाठी पुण्याला आला. पेशव्यांनी त्याला अभय दिला. अब्दुलने त्यांच मांडलिकत्व स्वीकारलं. यामुळे खुश होऊन पेशव्यांनी त्याला सचिन राज्याच नवाबपद दिल.

त्यानंतर अनेक वर्ष मराठा सत्तेने सचिन राज्याला संरक्षण दिल. 

पुढे मराठी सत्ता लयास गेली. त्यानंतर आलेल्या ब्रिटीश सत्तेशी देखील सचिनचे नवाब जुळवून घेऊनचं राहिले. शांत निवांत असं हे राज्य कधी कोणाच नाव न काढता, भांडण न करता राहिलं. देश स्वतंत्र झाल्यावर संस्थान खालसा करण्याच्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या आदेशावर काहीही खळखळ न करता सही केली.

नवाबी निवांतपणा सचिनमध्ये मुरला होता.

फक्त एकदाच हे नवाब चर्चेत आले जेव्हा त्यांच नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं. नाव फातिमा बेगम. ही कोणी साधीसुधी हिरोईन नव्हती तर ती भारतातली पहिली महिला सिनेमा दिग्दर्शक, निर्माती होती. बुलबुल ए परीस्तान नावाचा सिनेमा तिने १९२६ साली बनवलेला. ज्या काळात बायकांना पिक्चर बघायला जाण्याची परवानगी नव्हती अशा वेळी एक अख्खा सिनेमा बनवणारी ती एक वांड बाई होती.

असं म्हणतात की फातिमा बेगमचा सचिनचे नवाब सिद्दी याकुम इब्राहीम खान यांच्या बरोबर निकाह झाला होता. पण दोघांनी या वृत्ताच खंडण केलं. बॉलीवूडच्या इंडस्ट्रीमध्ये चवीने चघळलेली ही पहिली लव्हस्टोरी असावी. फातिमा बेगम यांच्या दोन्ही मुली देखील हिरोईन झाल्या. त्यांची धाकटी लेक झुबेदा ही पहिला बोलपट आलमआराची हिरोईन होती. 

या दोन्ही मुली सचिनच्या नवाबांच्याचं लेकी पण त्याकाळात सिनेमामध्ये काम करणाऱ्याना चांगलं समजल जात नसे म्हणून नवाबसाहेबांनी त्यांना स्वीकारलं नाही. पण त्यातली झुबेदा पुढे जाऊन हैदराबादमधल्या एका संस्थांचे राजे धनराजगिर यांच्याशी लग्न करून तिथली राणी झाली.

असा आहे हा सचिनच्या नवाबाचा इतिहास. त्यांचा सचिन तेंडूलकरशी कधी संबंध आला नाही. आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंशी क्रिकेट खेळत होता त्याला ठाऊकसुद्धा नसेल की आपल्या नावाच भारतात एक गाव आहे आणि तिथे या आफ्रिकन वंशाचे हबशी राज्य करायचे. 

आता गुजरातमध्ये सचिन हे समृद्ध गाव आहे. मोदीजीनी तिथे आणलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे बऱ्याच कंपन्या या गावात आलेल्या आहेत. आणि सचिनचे नवाब? ते अजूनही त्या गावात राहतात, आणि निवांतचं आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.