सचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, “या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची”
सचिन तेंडूलकर हा निर्विवादपणे जगातला सर्वोत्तम फलंदाज. आधुनिक युगातला डॉन ब्रॅडमन ! १९८९ ते २०१३ या आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीत त्याने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. या काळात त्याने जेवढया बॉलरची पिसे काढली, तेवढी इतर कुठल्याच बॅटसमनने काढली नसतील. असा हा क्रिकेटचा देव नक्की घाबरायचा तरी कोणाला?
जगातला सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या पुस्तकात दावा केला होता की सचिन त्याच्या बॉलिंगला घाबरतो. मात्र ते काही खरं नव्हतं. मैदानावर सचिनने अनेकदा शोएब रडकुंडीला येईल, इतकी त्याची धुलाई केल्याचे आपण सर्वच साक्षीदार आहोतच. २००३ सालच्या विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धची मॅच हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. अजूनही अनेक उदाहरणे देता येतीलच.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीची सुरुवातच सचिनने पाकिस्तानच्या तिखट वेगवान गोलंदाजीचा सामना करताना केली होती. वाजत गाजत भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महान फिरकीपटू शेन वार्नला तर सचिनने दिवसा तारे दाखवले होते.
स्विंगचा बादशाह वसीम अक्रम, साडे सहा फुट उंच कर्टली अॅम्ब्रोस, आपल्या अचूकतेसाठी ओळखला ग्लेन मॅकग्रा, घातक ब्रेट ली, जगातला सगळ्यात जास्त विकेट घेणारा मुरलीधरन, अॅलन डोनाल्ड पासून ते डेल स्टेन असो की सर रिचर्ड हॅडली पासून शेन बॉड असो जगभरात असा कुठलाच बॉलर नव्हता ज्याला सचिनने आपल्या बॅटची धार दाखवली नाही. या प्रत्येकाला सचिनने त्यांच्या घरच्या मैदानात जाऊन सचिनने धुतले होते.
१९९८ सालच्याच्या शारजा सिरीजमध्ये झिम्बाब्वेच्या हेन्री ओलोंगाने त्याला बाउन्सर टाकून आउट काढले. क्रिकेट पंडितांना वाटले की सचिनच्या बॅटिंगवर तोड सापडली. सचिनला आउट केल्यावर ओलोंगाने जे काही थयथयाटी सेलिब्रेशन केले होते, ते मात्र सचिनला आवडले नव्हते.
मात्र याचा बदला सचिनने पुढच्याच सामन्यात घेतला होता. ओलोंगाला आपल्या बॅटनेच उत्तर देत सचिनने त्याच्या ६ ओव्हर मध्ये ६० धावा चोपल्या होत्या. अशी कित्येक उदाहरणे देता येतील की जिथे सचिनने निडरपणे बॉलरचा सामना केला. मात्र एक बॉलर असाही होता ज्याला खुद्द क्रिकेटचा देवसुद्धा घाबरायचा. सचिन तेंडूलकरनेच तशी कबुली दिलीये.
नेमका कोण होता तो बॉलर ?
तो बॉलर म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए. त्याचा आज जन्मदिवस. सचिन ज्याला घाबरायचा असा बॉलर म्हणून हॅन्सी क्रोनिएचं नाव ऐकून आश्चर्य वाटतंय ना?
हॅन्सी क्रोनिएकडे ना धडकी भरवणारा ‘वेग’ होता, ना त्याच्याजवळ ‘रिव्हर्स स्विंग’ सारखे अस्त्र होते. क्रिकेटच्या भाषेत ज्याला ‘बॅट्समन कम बॉलर’ असा ऑल राउंडर म्हणून ओळखले जायचे. अशा या पार्टटाइम बॉलरची बॉलिंग खेळायला सचिन तयार नसायचा. ऐकून विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. खुद्द सचिननेच अनेक मुलाखतीमध्ये तशी कबुली दिलीये.
सचिनने आपल्या कारकिर्दीत ११ टेस्टमध्ये हॅन्सी क्रोनिएच्या बॉलिंगचा सामना केला होता. त्यामध्ये ५ वेळा क्रोनिएने सचिनला आउट केलं होतं. त्यामुळे क्रोनिएचा सामना करताना एक असुरक्षिततेची भावना सचिनच्या मनात असायची. बऱ्याचदा तर तो नॉन-स्ट्रायकर एंड वरील आपल्या जोडीदाराला सांगायचा की,
“क्रोनिएच्या बॉलिंगवेळी जास्तीत-जास्त स्ट्राईक तू घे, मी डोनाल्ड आणि शॉन पोलॉकला खेळतो.”
खरं तर अॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉक हे दोघेही किती खतरनाक होते, हे क्रिकेटरसिकांना वेगळं सांगायची गरजच नाही. पण असं असतानाही या दोघांना फोडून काढणारा सचिन क्रोनिएला सामोरे जायला नेमका का घाबरायचा याचं कारण खुद्द त्याला देखील माहित नाही.
हॅन्सी क्रोनिए फक्त सचिनच नव्हे तर भारताविरुद्ध बॅटींग असो की बॉलिंग दोन्हीही डिपार्टमेंटमध्ये कायमच चांगली कामगिरी करायचा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुद्धा त्याने काही चमकदार खेळी केल्या होत्या. वन डे मध्ये १६ वेळा त्याला सामनावीराचा सन्मान मिळाला होता. त्याच्या बॅटींग आणि बॉलिंग अधिक चर्चा झाली ती त्याच्या कॅप्टनशिपची. आपल्या चलाख आणि धूर्त कॅप्टनशिपने त्याने दक्षिण आफ्रिका संघाची उभारणी केली. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक मॅचेस जिंकण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे.
क्रिकेटविश्वाला काळिमा फासणारं मॅच फिक्सिंग प्रकरण
७ एप्रिल २००० रोजी हॅन्सी क्रोनिए मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याची बातमी आली. संपूर्ण क्रिकेट विश्वासाठीच हा एक धक्काच होता. भारतीय बुकी संजय चावला सोबतचा त्याचा टेलिफोन संवाद दिल्ली पोलिसांना सापडला होता. त्यानंतरच संपूर्ण क्रिकेट जगताला काळिमा फासणारे मॅच फिक्सिंग स्कँडल सामोरे आले. दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या अनेक नामवंत खेळाडूंची नावे या प्रकरणात समोर आली.
क्रोनिएवर क्रिकेट खेळण्यासाठी आजीवन बंदी घालण्यात आली. ज्या दक्षिण आफ्रिका संघाची उभारणी करून, क्रिकेट विश्वात एक मजबूत संघ म्हणून आफ्रिकेला त्याने सन्मान मिळवून दिला होता, त्याच टीमशी गद्दारी करून त्याने क्रिकेटशी आणि त्याच्या चाहत्यांशी प्रतारणा केली होती.
१ जून २००२ रोजी जोहान्सबर्गहून जॉर्ज येथे जाताना झालेल्या विमान अपघातात क्रोनिए आणि विमानाचे दोन्ही पायलट मृत्युमुखी पडले. मॅच फिक्सिंग स्कँडलचा मुख्य आरोपी असलेल्या क्रोनिएच्या जाण्याने क्रिकेटविश्वातील अनेक सिक्रेट त्याच्यासोबतच गाडले गेले. अनेक जणांचा दावा आहे की हॅन्सी क्रोनिएचा अपघात हा घातपाताचाच प्रकार होता, ज्याला विमान अपघाताचे रूप देण्यात आले. काहीही असो पण क्रोनिएच्या अकाली जाण्यानं क्रिकेटचं निश्चितच नुकसान झालं. क्रिकेटच्या विश्वासार्हतेला तडा गेला तो कायमचाच.
हे ही वाच भिडू
- मनोज प्रभाकरने संजय मांजरेकरला धोका दिला होता !!!
- सचिनच्या या चुका पाहून वाटतं तो देव नाही, तुमच्या आमच्या सारखा चुकणारा माणुसच.
- क्रिकेटचा देव खरंच निर्दोष होता का..?
- जेव्हा आफ्रिकन संघाने ४३४ रन्स चेस करून इतिहास घडवला.