फास्टर बॉलर व्हायला निघालेल्या तेंडुलकरला त्याने सांगितलं, “तुमसे ना हो पायेगा”

जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळाचे नाव निघेल तेव्हा तेव्हा पहिलं नाव जे घेतल जाईल ते म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेट जगताचा देव. आपल्या मनमोहक फलंदाजीने कित्यके विक्रम आपल्या नावावर अबाधित ठेवणारा मास्टर ब्लास्टर.
पण तुम्हाला एक माहितीये का..? सचिनला लहानपणी खरतर वेगवान गोलंदाज बनायचं होत.
थांबा थांबा भिडू काय खोटं बोलत नाहीये. म्हणजे जस अनिल कुंबळे ला सुद्धा वेगवान गोलंदाज बनायचं होत. युवराज सिंगला टेनिस आणि स्केटिंग मध्ये करियर करायचं होत. तसचं सचिनला सुद्धा वेगवान गोलंदाज बनायचं होत.
सचिनचा फलंदाजीचा रेकॉर्ड हा सर्वश्रृत आहेच पण आपण त्याच्या बॉलिंगकडे पण जरा लक्ष वळवलं तर आपल्या लक्षात येईल की, सचिनने त्याच्या ४६३ वनडे सामन्यात १५४ विकेट घेतल्या आहेत त्यामध्ये त्याने दोन वेळा एकाच इनिंगमध्ये ५ विकेट्स घेण्याचा मान सुद्धा पटकवला आहे. सचिनला आपण नेहमी मंदगतीने गोलंदाजी करताना पाहिलं आहे. कधी कधी त्याला लेगब्रेक्स, ऑफब्रेक्स सुद्धा टाकताना आपण पाहिलं आहे.
क्रिकेट विश्वात प्रवेश करताना सचिनला वेगवान गोलंदाजीनी मोहिनी घातली होती.
शाळेच्या संघाकडून खेळताना सचिन आघाडीचा वेगवान गोलंदाज असायचा. वेगवान गोलंदाजी करताना सचिनने चांगल्या विकेट्स सुद्धा पटकावल्या होत्या. आपण गोलंदाजीत खुप पुढे जावं असं सचिनचं स्वप्न होत. आणि त्याच स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याने पाऊल टाकलं चक्क चैन्नईच्या MRF पेस फाउंडेशनमध्ये. तेव्हां त्या फाउंडेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली हा शिकवायला होता. आणि डेनिस लिली कडून आपल्याला प्रशिक्षण मिळावे या हेतूने सचिन तिथ गेला.
MRF पेस फाउंडेशन हे जगभरातील वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देण्याचे कोचिंग क्लिनिक आहे.
१९८७ साली भारतात चैन्नई येथे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली याच्या मदतीने MRF लिमिटेडने याची स्थापना केली होती. ह्याच फाऊंडेशनने विवेक रझदान, जवगळ श्रीनाथ, इरफान पठाण, मुनाफ पटेल, व्यंकटेश प्रसाद, आर. पी. सिंह, झहीर खान आणि एस. श्रीशांत यांसारखे भारतीय गोलंदाज दिले.
त्याचसोबत चामिंडा वास, हेनरी ओलोन्गा, हेथ स्ट्रीक, ग्लेन मॅकग्रा, मिचेल जॉन्सन आणि ब्रेट ली यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा दिले आहेत.
सचिन तेंडुलकरने सुद्धा या फाऊंडेशन मध्ये वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले पण पुढे जाऊन त्याची निवड काही झाली नाही. आणि सचिनचे वेगवान गोलंदाज बनायचे स्वप्न इथेच तुटले.
सचिन तेंडुलकर जर वेगवान गोलंदाज झाला असता तर भारताला अजुन एक कपिल देव मिळाला असता पण त्याच्या सुदैवाने त्याची निवड झाली नाही आणि सचिन तेंडुलकर हा पहिला सचिन तेंडुलकर म्हणून जागच्या समोर आला.
- कपिल जाधव.
हे ही वाच भिडू.
- १७ वर्षांनंतर स्टीव्ह बकनरने चुकीच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरची माफी मागितली होती…
- सचिनच्या फेरारी टॅक्स प्रकरणात प्रमोद महाजनांना शिव्या बसल्या होत्या….
- सचिन रिटायर झाल्यावर वानखेडेवरचा ग्राउंड स्टाफ देखील रडला होता…