सचिन पिळगावकर सांगतात, “मलाच पिक्चरमध्ये घ्यायचं म्हणून गुरुदत्त दोन वर्ष थांबले होते.”

मराठी चित्रपटसृष्टीत बोटांवर मोजण्याइतक्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांमध्ये नाव येत ते सचिन पिळगावकर यांचं. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतचं काम न करता त्यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. भारतभरातल्या महान आणि उत्कृष्ठ दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करत त्यांनी आपल्या अभिनयाचा जलवाही दाखवून दिला. शोले, नदिया के पार अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिले.

गुरुदत्त यांच्यासारखा प्रयोगशील दिग्दर्शक आणि अभिनेता केवळ सचिन पिळगावकरांच्या चित्रपटातील भूमिकेसाठी दोन वर्ष थांबला होता त्याबद्दलचा आजचा किस्सा. एका मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी हा किस्सा सांगितला होता आणी त्यांच्या आत्मचरित्रातही त्यांनी लिहिलेला आहे.

एकदा स्टुडिओमध्ये गुरुदत्त साहेबांनी सचिन पिळगावकर आणि त्यांच्या वडिलांना भेटायला बोलावलं. सचिनजींनी आल्याआल्या गुरुदत्त साहेबाना नमस्कार केला. गुरुदत्त यांनी सचिन पिळगावकरांच्या वडिलांना सांगितलं कि ऑलिव्हर या पात्रावर बेतलेला एक चित्रपट बनवण्याचा विचार करतोय. आणि या चित्रपटात ऑलिव्हर मला देखणा आणि राजबिंडा असणारा मुलगा हवाय. त्यासाठी मी सचिनचा विचार केला आहे.

सचिन पिळगावकर शांत बसून होते तितक्यात गुरुदत्त साहेबानी सचिनजींना विचारलं कि , तुम्हारी उम्र क्या हे सचिन ? सचिनजींनी उत्तर दिलं ९ साल. या सचिनजींच्या उत्तरावर त्यांचा चेहरा किंचित पडला. त्यांचे चेहऱ्यावरचे बदलले हावभाव बघून लहानग्या सचिनजींनी विचारलं क्या हुआ ?

गुरुदत्त म्हणाले कसं आहे ना सचिन माझ्या चित्रपटातला ऑलिव्हर हा अकरा वर्षांचा आहे आणि तू दोन वर्षांनी लहान आहेस. यावर सचिनजींचं मन खट्टू झालं आणि त्यांनी कोमेजल्या स्वरात गुरुदत्त साहेबाना विचारलं म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या कोणालातरी हि भूमिका देणार ?

त्यावर गुरुदत्त साहेबांनी थोडासा विचार केला आणि ते म्हणाले,

नाही. I’LL WAIT FOR YOU…

सचिनजींच्या वडिलांना वाटलं कि लहान मुलाचं मन मोडू नये म्हणून गुरुदत्त असं म्हणाले असतील. मग त्यांनी नमस्कार करून गुरुदत्त साहेबांचा निरोप घेतला.

त्यानंतर गुरुदत्त साहेबानी बहारे फिर भी आयेगी नावाचा चित्रपट सुरु केला. या चित्रपटाच्या काळातच गुरुदत्त साहेबांचं निधन झालं. या घटनेच्या बरोबर दोन वर्षानंतर सचिनजी जेव्हा ११ वर्षांचे झाले तेव्हा गुरुदत्त साहेबांचे धाकटे बंधू आत्मारामजी यांनी सचिनजींना गुरुदत्त फिल्म्समध्ये भेटण्यासाठी निरोप पाठवला.

सचिनजी तिथे गेल्यानंतर आत्मारामजी यांनी त्यांच्यासमोर स्क्रिप्ट ठेवली. ती स्क्रिप्ट उघडून सचिनजींकडे वळवली आणि वाचायला सांगितली. त्या स्क्रिप्टच्या पानावर गुरुदत्त साहेबांच्या हाताने लिहिलं गेलं होतं कि,

OLIVER TO BE MADE WITH SACHIN WHEN 11.

गुरुदत्त साहेबांच्या हस्ताक्षरात त्या ओळी होत्या.

सचिन पिळगावकरांनी हि घटना आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. सचिनजींनी हिंदी चित्रपटात बराच काळ गाजवला. चांगल्या चांगल्या दिग्दर्शक लोकांना आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. मराठीतही त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाने धमाल उडवली.

ज्यावेळी मराठी चित्रपट धार धरत नव्हते त्यावेळी सचिनजींनी दिग्दर्शित आणि अभिनित असलेला चित्रपट अशी हि बनवाबनवी बनवला. या चित्रपटाने इतिहास रचला, अनेक विक्रम मोडले. 

केवळ अभिनयच न करता मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करून आलेला दिग्दर्शनाचा अनुभव त्यांनी मराठीमध्ये आणून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन उपलब्ध करून दिलं. बॉलिवूडमध्ये त्या काळी जुन्या आणि दिग्गज लोकांचा चांगलाच सहवास त्यांना लाभला.

बॉलिवूडमध्ये त्यांनी हिंदी चित्रपटातून चांगलंच नाव कमावलं, त्यांनी अभिनय केलेले चित्रपट शोले, नदिया के पार, बालिका वधू, गीत गाता चल, अवतार, अखियों के झरोकोसे चांगलेच हिट झाले आणि भारतभरात सचिनजी घराघरात पोहचले. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी विशेष गाजली.

गुरुदत्त साहेबांसोबतचा त्यांचा हा किस्सा एक हृदय आठवण असल्याचं ते सांगतात. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.