पुलंच्या आयुष्यात घडलेला किस्सा पिळगावकरांनी अत्यंत हुशारीने बनवाबनवीत वापरला…
अशी हि बनवाबनवी हा चित्रपट तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातले धनंजय माने, शंतुणु, पार्वतीबाई, सुधा असे एक एक इरसाल नमुने होते. हा चित्रपट त्याकाळी भयंकर गाजला होता. म्हणजे आजही मिम्सच्या माध्यमातून अजूनही तो ट्रेंडवर आहे. या सिनेमातले प्रत्येक सीन लोकांच्या अगदी तोंडपाठ आहे. म्हणजे कुठल्या वाक्यानंतर कुठलं वाक्य आहे हे सुद्धा चाहत्यांना माहिती आहे इतका लोकप्रिय हा सिनेमा होता.
या सिनेमाशी निगडित आजचा किस्सा. हा किस्सा खरोखर घडलेली घटना होती आणि जेव्हा हि घटना सिनेमात वापरली गेली तेव्हा तो सिन चांगलाच गाजला होता.
या घटनेत आहेत पुलं देशपांडे आणि बालगंधर्व रंगमंदिर. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरातला तो सीन पुलंच्या बाबतीत घडला होता. या किस्स्याबद्दल सचिन पिळगावकरांनी लिहिलेलं होतं. आधी नक्की किस्सा काय आहे ते जाणून घेऊया.
पुलं देशपांडेंचं सचिन पिळगावकरांवर विशेष प्रेम होतं. ज्यावेळी सचिनजी पुलंना भेटायचे तेव्हा अनेक विषयांवर ते गप्पा मॅकार्ट असत आणि अनेक किस्से सचिनजींना ऐकवत असत. पुलंनी त्यावेळी सचिन पिळगावकरांना सांगितलेला हा किस्सा- पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचं नव्यानेच बांधकाम झालेलं होतं. बालगंधर्व रंगमंदिर स्थापन करण्यात पुलंचा वाटा मोठा होता. त्यावेळी तिथल्या काही प्रमुख लोकांनी पुलं देशपांडेंना ते नवीन बालगंधर्व रंगमंदिर बघण्यासाठी बोलावलं होतं.
पुलं देशपांडे बालगंधर्व रंगमंदिर बघायला गेले. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुलं देशपांडे कोण आहेत हे माहिती नव्हतं. पुलं देशपांडे माहिती नाही इथपर्यंत ठीक होतं मात्र बालगंधर्व कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं.
पुलं आणि बालगंधर्व अशा दोन्ही नावांबद्दल त्यांना माहिती नव्हतं आणि ओळखीचा तर प्रश्नच नव्हता. मग त्या कर्मचाऱ्याने पुलं देशपांडेंना आणि काही पाहुण्यांना सोबत घेऊन बालगंधर्व रंगमंदिर आतून दाखवण्यास सुरवात केली. आतून बांधलेलं भव्य बालगंधर्व रंगमंदिर बघून सगळे खुश झाले.
उत्साहाने सगळे नाट्यगृह बघून आले आणि बालगंधर्वांच्या चित्राजवळ येऊन थांबले. त्या कर्मचाऱ्यांना बालगंधर्व माहित नव्हते. पुलंना ओरिजिनल पुरुषी पोषाखातला फोटो दाखवून तो म्हणाला ” हे बालगंधर्व.” आणि मग शेजारच्या बाईच्या वेषातल्या बालगंधर्वांकडे बघून तो म्हणाला, ” आणि या मिसेस बालगंधर्व.”
ज्यावेळी सचिन पिळगावकर पुलंना भेटले होते तेव्हा हा किस्सा पुलंनी त्यांना ऐकवला होता. ज्यावेळी अशी हि बनवाबनवी चित्रपटाची घोषणा केली तेव्हा हा किस्सा सचिन पिळगावकरांच्या डोक्यात होता. बनवाबनवीमध्ये त्यांनी हा किस्सा वापरला. ज्यावेळी खोलीच्या शोधात सगळे निराश होऊन बालगंधर्व रंगमंदिरात येत त्तेव्हा सुशांत रे च्या तोंडून सचिन पिळगावकरांनी त्यांच्या पद्धतीने वापरला.
सुशांत रे म्हणजे शंतनू म्हणतो कि दादा या मिसेस बालगंधर्व का ? तेव्हा अशोक सराफ म्हणजे धनंजय माने म्हणतो कि हळू बोल कुणी ऐकलं तर मारतील. मग पुढे सांगतात कि स्त्री भूमिका करणारा असा नट दुसरा झाला नाही.
सचिन पिळगावकरांनी अत्यंत हुशारीने हा किस्सा सिनेमात वापरला. अर्थातच या घटनेचं श्रेय पुलं देशपांडेंना जातं. किस्सा आणि सिनेमा दोन्हीही हिट झाले. त्याकाळात मराठी चित्रपटसृष्टीत अशी हि बनवाबनवी कमाईच्या बाबतीत माईलस्टोन ठरला होता. दीर्घकाळ बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने राज्य केलं होतं. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे अशा सगळ्या जबर्दस्त स्टारकास्टने नटलेला हा सिनेमा होता.
सचिन पिळगावकरांवर बऱ्याच महान लोकांनी प्रेम केलं.
पैकी पुलं देशपांडेंचा सचिन पिळगावकरांवर जीव होता.
पुलंचा सहवास त्यांना विशेष लाभला. हा किस्सा स्वतःच सचिन पिळगावकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेला आहे.
हे हि वाच भिडू :
- सचिन पिळगावकर सांगतात, “मलाच पिक्चरमध्ये घ्यायचं म्हणून गुरुदत्त दोन वर्ष थांबले होते.”
- बनवाबनवी नंतर मराठीत कुठला बाप विनोदी पिक्चर झाला असेल तर तो “जत्रा”
- पुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं नाही.
- माणसात आणणारे ३५ दिवसांचे कोरोन्टाईन : पु.ल. उभे राहिले अन् अवचटांनी करुन दाखवलं