सचिन पायलटांच्या लव्हस्टोरीपुढं राजस्थानच्या राजकारणाचा जांगडगुत्ता काहीच नाही…

राजस्थान काँग्रेस मध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला वाद आता टोकाला गेला. येणाऱ्या दिवसात विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पायलट यांचं बंड सुरु आहे.

आज काँग्रेस हायकमांड बैठक होईल आणि  निर्णय घेईल. पण राजकारणाचा हा जांगडगुत्ता काय कळायला मार्ग नाही.

पण हा राजकीय जांगडगुत्ता सोडला तर एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे सचिन पायलट आणि सारा अब्दुल्लाह यांच्या लव्हमॅरेजचा सुद्धा असाच जांगडगुत्ता झाला होता. मुख्यमंत्री पदासाठी जशा अडचणी येत आहेत तशाच अडचणी सचिन पायलट आणि सारा यांच्या लग्नात आल्या होत्या…का तर ‘अलग जात, अलग धरम’….दोघांचाही धर्म वेगळा असल्यामुळे लग्नात अडचणी येत होत्या. सारा यांचे वडील फारूक अब्दुल्लाह यांनी नकार दिला तरी सुद्धा ‘मिया बीवी राजी तो क्या करें पापाजी!’ म्हणत दोघांनी हटके स्टाईलने लग्न केलं होतं.

ही गोष्ट आहे १९९० ची. काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले सुरु झाले होते. तेव्हा राज्यातलं वातावरण तापलंय हे लक्षात घेऊन; काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाह यांनी त्यांची मुलगी साराला तिच्या आईकडे लंडनमध्ये पाठवून दिलं. याच दरम्यान अब्दुल्लाह यांच्याकडे एक फॅमिली फंक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. अब्दुल्लांचं कुटुंब लंडनमध्ये असल्यामुळे कार्यक्रम सुद्धा तिथेच पार पडला.

आता काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या घरचा कार्यक्रम म्हटल्यावर बडे-बडे राजकारणी तर येणारच. म्हणून अनेक फॅमिली फ्रेंड कार्यक्रमाला आले. त्यातलाच एक परिवार होता राजस्थानचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा. पायलट कार्यक्रमात गेले पण सोबत त्यांच्या पोराला म्हणजेच सचिन पायलट यांना सुद्धा घेऊन गेले. 

मग काय पायलटांचा सचिन आणि अब्दुल्लांची सारा दोघांची भेट-गाठ झाली.

किशोर वयात असलेल्या सचिन आणि साराच्या नजरेला नजरा भिडल्या, मनात प्रेमाचे लाडू फुटले. याला रंग चढतच होता पण लवकरच पायलट परिवार भारतात परतलं. तेव्हा सचिन भारतात आल्यामुळे हे प्रकरण नुसत्या हाय हॅलोवरच मर्यादित राहीलं.

पण म्हणतात ना ‘होनी को कौन टाल सकता हैं!’ अगदी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.

दिल्लीतल्या स्टीफन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करून सचिन एमबीए करण्यासाठी अमेरिकेला गेले. योगायोग तिथेच दोघांची पुन्हा भेट झाली. आता एवढ्या दिवसांनी भेट झाली म्हटल्यावर प्रेम तर बहरणारच. मग काय दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली आणि दोघे एकमेकांना डेट करायला लागले. यातच साचिन यांचं एमबीए कधी पूर्ण झालं हे कळलंच नाही. 

पेन्सीलव्हिनिया युनिव्हर्सिटीच्या व्हार्टन स्कुल ऑफ बिजनेस मधून एमबीए पूर्ण केल्यानंतर सचिन परत भारतात परतले, मात्र सारा अमेरिकेतच राहिल्या. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा एकदा लंबी जुदाईचा सीन सुरु झाला. पण या वेळेस त्यांच्या जुदाईत पूर्वीसारखा ब्रेक नव्हता. दोघंही फोनवर तासन् तास बोलत बसायचे. इमेल आणि टेक्स्ट मॅसेज करायचे.

स्वतः सारा यांनी ग्रेवाल शो मध्ये याबद्दल कबुली दिली होती. 

त्या म्हणाल्या, “आम्ही दोघे फोन, मॅसेज, ईमेलने एकमेकांच्या संपर्कात होतो. फोनवर तासन् तास बोलणं व्हायचं त्यामुळे बिल सुद्धा भरपूर यायचं.” 

बिल भरपूर यायचं पण प्रेम हे प्रेम असतं, त्यात बिल सारखे विषय बघायचे नसतात. मात्र लग्नाचं वय झालं म्हटल्यावर या गोष्टी घरच्यांच्या कानावर घालून लग्नाबिग्नाचं बघायला न्हवं ??? 

म्हणूनच दोघांनी ही गोष्ट आपापल्या आईवडिलांना सांगायचं ठरवलं. लंडनमध्ये असतांनाच साराने सचिनची भेट तिच्या आईशी घालून दिली आणि दोघांची लव्हस्टोरी सांगितली. सगळं ऐकून साराच्या आईने सचिनकडे पाहिलं. सचिनच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून त्यांनी दोघांच्या लग्नाला परवानगी देऊन टाकली. याचदरम्यान सचिनने सुद्धा त्याची आई रमा पायलट यांच्याकडून परवानगी घेतली होती. 

दोघांच्या आईने परवानग्या दिल्या होत्या मात्र साराचे वडील फारूक अब्दुल्लाह यांची परवानगी घेणे अजून बाकी होतं. ‘अब्बा नाही मानेंगे’ हे साराला माहित होतं, पण धाडस करून दोघांनी त्यांची लव्हस्टोरी अब्दुल्लाह यांनी सांगून टाकली. 

मुळात अब्दुल्लाह हे मुस्लिम आणि त्यांची पत्नी मोली या ख्रिश्चन असतांना सुद्धा त्यांनी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. तसेच त्यांना सचिनचा स्वभाव सुद्धा आवडत होता त्यामुळे वैयक्तिकरित्या ते या लग्नाच्या विरोधात नव्हते.  

मात्र हे लग्न झाल्यास काश्मीरच्या राजकारणात वादळ उठेल याचा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे त्यांनी या लग्नाला होकार दिला नाही. 

अखेर अब्दुल्लाह त्यांची शंका खरी ठरली. सचिन आणि साराच्या लव्हस्टोरीची गोष्ट काश्मिरात वाऱ्यासारखी पसरली. अब्दुल्लाह यांच्याविरोधात अपप्रचार सुरु झाला. अब्दुल्लाह यांची मुलगी एका काफिरासोबत लग्न करणार आहे, यावरून वादळ उठलं. पक्षाच्या आमदारांनी सुद्धा या लग्नावर आक्षेप घेतला आणि अब्दुल्लाह यांना सल्ला दिला.

त्यांनी म्हटलं, “मुस्लिम व्यक्ती एखाद्या गैरमुस्लिम महिलेसोबत लग्न करू शकतो. मात्र मुस्लिम महिला गैरमुस्लिम पुरुषाबरोबर लग्न करू शकत नाही. याची परवानगी इस्लामने दिलेली नाही.”

या सल्ल्यामुळे अब्दुल्लाह यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काश्मीरच्या राजकारणात हा मुद्दा चांगलाच तापेल याची कल्पना असलेल्या अब्दुल्लाह यांनी, सचिन आणि साराच्या फोनवर बोलण्यावर आणि एकमेकांना भेटण्यावर बंधनं घातली.

अचानक लादलेल्या या बंधनांमुळे दोघांनी काही काळ वाट बघण्याचं ठरवलं. मात्र दिवसा पाठोपाठ दिवस जात होते, यातच ३ वर्ष उलटून गेले होते. मात्र परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नव्हती. म्हणून केव्हा एकदा लग्न करण्यासाठी संधी मिळते याची दोघेही वाट बघायला लागले.

जानेवारी २००४ मध्ये फारूक अब्दुल्लाह लंडनला गेले होते. तर ओमर अब्दुल्लाह हे दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी भर्ती झाले होते. हीच संधी साधून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

१५ जानेवारी २००४ रोजी सचिन यांची आणि रमा पायलट यांच्या शासकीय बंगल्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडला आणि सचिन-साराची लव्हस्टोरी यशस्वी झाली. हिंदू मुस्लिम वधूवरांमुळे काश्मीरसोबतच भारतातील राजकीय वर्तुळात दोघांचं लग्न चर्चेचा विषय ठरला होता. पण काही वर्षांनंतर जेव्हा हा मुद्दा शांत झाला, तेव्हा अब्दुल्लाह परिवाराने सुद्धा या लग्नाला मान्यता दिली आणि सगळं काही सुरळीत झालं…. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.