भावा, तू चुकीच्या वाटेवर आहेस….
समजा तुम्हाला संगीतकार व्हायचे आहे तर तुम्ही असे म्हणाल का,
“मी भरपूर गाणी ऐकली आहेत. मला हार्मोनियमसुद्धा बऱ्यापैकी वाजवता येतो आणि माझ्याकडे वेळही आहे. आता ह्या रविवारी मी एक गाणं बनवतो”
तर अजिबात नाही!
पण बरेच पटकथालेखक अशीच सुरुवात करतात- “मी बरेच चित्रपट बघितले आहेत. माझी भाषेवर चांगली पकडही आहे. आता सुट्ट्यासुद्धा आहेत..”
जर तुम्हाला संगीतकार व्हायचे असेल तर तुम्ही आधी संगीताचे प्रॉपर शिक्षण घ्यायचे ठरवता. एखाद्या संगीत विद्यालयात प्रवेश घेऊन संगीताचे प्रकार, थिअरी आणि प्रॅक्टिकल समजून घेता. अनेक वर्षांच्या मेहनतीने तुम्ही संगीतातले मुलभूत ज्ञान मिळवता. हे ज्ञान तुमच्या कल्पकतेसोबत गुंफून तुम्ही संगीत बनवू लागता.
पण बऱ्याच लेखकांना याची जाणीवही नसते की एक चांगली पटकथा तयार करणे हे एक चांगले संगीत तयार करण्याइतकेच अवघड काम आहे. किंबहुना त्याहून जास्त!
हे मत आहे प्रसिद्ध लेखक रॉबर्ट मॅकी यांचं. माझं नव्हे.
हेच उदाहरण शॉर्ट फिल्म्स बनवणाऱ्या लोकांना लागू पडतं.
जसं आपल्या मोबाईल मध्ये कॅमेरा आहे म्हणून प्रत्येकाला फोटोग्राफर होता येत नाही तसंच शॉर्टफिल्मचं सुद्धा आहे. मला काहीतरी सुचलंय, चला शॉर्टफिल्म बनवूया अशी लाटच आलेली आहे असं वाटतं. एक काळ MPSC चा आला. गावातून पुण्याला यायचं आणि क्लास लावायचा. “हा उद्या झालाच फोजदार बिज्दार तर काय घ्या?” त्यामुळं गावात, पैपावण्यात प्रतिष्ठा वाढायची. या गोष्टीला प्रतिष्ठा आहे म्हंटल्यावर हेच करायचं पेव फुटलं. रस्त्यात कोणालाही विचारा तिघातला एक सांगणार MPSC करतोय. लोकांना दाखवायला, खोटी प्रतिष्ठा मिळवायला तरुणाई असल्या नादाला लागते.
तसं आता शॉर्टफिल्मबद्दल झालं आहे. खूप मुलेमुली ‘हवा करायला’ शॉर्टफिल्म बनवतात. गल्लोगली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु झाले आहेत. त्यात कुठेतरी सिलेक्शन झाले, टाक फेसबुकला पोस्ट ‘मौजे ढेरेवाडी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमची फिल्म सिलेक्ट झाली’. सोहळा साजरा होतो. अशा सुमारांची मांदियाळी झाली की चांगलं काम करणारे झाकोळले जातात. उठसूट कोणीही कविता करायला लागल्यामुळं कवी आहे म्हंटलं की हसू व्हायला लागलं. चांगल्या शॉर्टफिल्म बनवणाऱ्यांकडेसुद्धा बघण्याचा दृष्टीकोन असाच काहीसा होईल अशी शंका येते.
अशा लोकांमुळे नेहमी मनापासून मेहनत करणाऱ्या लोकांना त्रास होतोच परंतु जे असल्या प्रभावाला भुलून काही करतात त्यांना नंतर खूप समस्यांना सामोरं जायला लागतं कारण ऐन उमेदीचा काळ त्यांनी स्वत:ला फसवण्यात घालवलेला असतो.
कला, साहित्य क्षेत्रात जे काही चांगलं काम झालं आहे त्यासाठी, ते पुढं चालत राहण्यासाठी कित्येकांनी काम केलेलं आहे, करत आहेत. अनेक लोक किंवा तीन चार पिढ्या म्हणू हवं तर, ‘फिल्म सोसायटी’च्या माध्यमातून पदरमोड करत वर्षानुवर्षे चित्रपट महोत्सव आयोजित करून लोकांपर्यंत चांगल्या फिल्म्स पोहोचवून, जनमानसात ‘चित्रपट साक्षरता’ रुजवण्याचं महत्वाचं काम करत आहेत. चित्रपट महोत्सवांची विश्वासार्हता जपताहेत.
धंदेवाईक गल्लाभरू सिनेमांच्या चलतीत आशयप्रधान सिनेमे तयार होण्यामागं फिल्म सोसायटी चळवळीचा खूप मोठा वाटा आहे. आता गावोगावी सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमुळं खरोखर चांगलं काम करणाऱ्या महोत्सवांचीसुद्धा प्रतिष्ठा जात आहे. चित्रपट महोत्सव घेण्याला, त्यात सहभाग घेण्याला काहीच हरकत नाही. हरकत त्या मागच्या उद्देशांना आहे.
आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं पोस्टर पाहिलं तर त्यावर झाडाच्या दोन छोट्या डहाळ्या (Laurel Wreath) आणि त्यामध्ये काहीतरी लिहिलेलं दिसतं. त्याचा अर्थ प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्णी लागलीय, पुरस्कार मिळाला आहे. पोस्टरवरील लॉरेल्समुळं समजतं की चित्रपट दर्जेदार आहे. काही वर्षांपूर्वी मोठ्या सिनेमाच्या पोस्टरवर एखादं लॉरेल दिसायचं. हल्ली एखाद्या चित्रपटाचं, शॉर्ट फिल्मचं पोस्टर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की अशा लॉरेल्सनी पोस्टर भरलेलं असतं. जवळ जाऊन वाचल्यावर कळतं सगळे लोकल फेस्टिवल आहेत. या सगळ्यामागे झटपट यश मिळवणं, इतरांना ‘बघा आम्ही कसं ग्रेट काम केलंय’ हे दाखवणं आहे. चांगलं काम करणं, स्वत:मध्ये सुधारणा करत राहणं हा उद्देश नाही.
छोट्याश्या फेस्टिवलमध्ये शॉर्टफिल्म लागली, टाक फेसबुक पोस्ट. ‘मौजे ढेरेवाडी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ पुरस्कार मिळाला टाक फेसबुक पोस्ट. तुम्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघायला जाता का? आतापर्यंत किती फेस्टिवलला गेला आहात? तुमच्या शॉर्टफिल्मचं सिलेक्शन झालं.. तुमच्या स्पर्धेत किती आंतरराष्ट्रीय फिल्म आल्या होत्या? आलेल्या फिल्म्स मुळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होत्या का? की तुमच्यासारख्याच हौशी लोकांच्या होत्या? जरी तसं असलं तरीही हरकत नाही.
फिल्म फेस्टिवल मध्ये बघायला जाणं असुदे किंवा फिल्म दाखवायला जाणं असुदे.. जगाच्या इतर ठिकाणी समकालीन कसं काम सुरु आहे, आपल्यासोबतचे कसा विचार करतात, माध्यम कसं हाताळतात हे शिकायला हवं. लोकांशी आपल्या कामाबद्दल संवाद साधायला, कामात सुधारणा करण्यासाठी जायला हवं. आपली भूक ही चांगलं काम करण्याची असावी न की प्रसिद्ध होण्याची.
व्यक्त होण्याची गरज!
मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यामुळं मला झोप लागत नाही असं तुम्हाला होतंय का? तो विषय, ती कथा किंवा फक्त एक एक्सपीरीयंस आहे जो तुम्हाला अस्वस्थ करत आहे. चैन पडत नाहीय? सांगावा वाटतो, मांडावा वाटतो. जगातल्या सर्व कला प्रांतातील महान कलाकृती या गरजेतून तयार झाल्यात. व्यक्त होण्याची गरज! कलावंताची सगळ्यात मोठी गरज!
सगळ्यात महत्वाचं मला शॉर्टफिल्म का करायची आहे? कविता, कथा का लिहायची आहे? हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा आणि त्याची प्रामाणिक उत्तरं स्वत:ला द्यायला हवीत. प्रसिद्ध व्हायला, प्रतिष्ठा मिळवायला, पैसे मिळवायला असं असलं तर भावा, तू चुकीच्या वाटेवर आहेस. आता स्वत:ला फसवलंस तर काही वर्षांनी पश्चाताप तुलाच होणार आहे. व्यक्त होण्याची गरज! हे उत्तर असेल तरच आयुष्यभर या क्षेत्राशी चिकटून राहू शकशील.
फेस्टिवलला फिल्म लागणं किंवा एखादा पुरस्कार मिळणं खरंच इतकं महत्वाचं आहे का?
फेस्टिवलला सिलेक्ट झाली किंवा पुरस्कार मिळाला म्हणून एखादी फिल्म मोठी होत नाही आणि पुरस्कार मिळाला नाही म्हणून त्यासोबतची फिल्म कमी ठरत नाही. पुरस्कार मिळण्यात बऱ्याच गोष्टी असतात. परीक्षक मंडळ कोणत्या विचारसरणीचं आहे, त्यांच्या वैयक्तिक आवडी निवडी काय आहेत? असे अनेक घटक परिणाम करत असतात. सोपं करून सांगायचं तर पुरस्कार मिळाला म्हणजे त्यावर्षी सबमिट केलेल्या फिल्म्समध्ये तुमची फिल्म उजवी आहे. हे इतकंच असतं! पुरस्कार मिळाला म्हणून तुमची फिल्म ग्रेट वगैरे होत नाही. पुरस्कार महत्वाचे असतात आणि नसतातही.
हेच गणित बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत आहे. फिल्म चालली नाही म्हणजे वाईटच असते असं नाही. आपल्याकडं तर काही लोक फिल्म खूप चालली म्हणजे ती सवंग असणार म्हणून हिणवणारेसुद्धा आहेत. लोक काय म्हणतात याचा विचार करण्यात अर्थ नसतो.
पुरस्कारांना महत्व प्राप्त होण्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी चारपाच सुपरहिट सिनेमे दिलेले दिग्दर्शकसुद्धा शॉर्टफिल्म विभागात राष्ट्रपती पुरस्कारासाठी (National Film Awards) शॉर्टफिल्म पाठवतात. एकदा करीयर झालेल्या दिग्दर्शकांनी शॉर्टफिल्म विभागात पुरस्कारासाठी भाग घेऊ नये असं माझं मत आहे. त्यांनी शॉर्टफिल्म बनवूच नये असं माझं मत नाही. तुम्हाला आनंद मिळतोय, नक्की कराच. तुमच्या कामातून नवीन मुलांना शिकायलाही मिळतं. बऱ्याच वेळा पूर्ण लांबीची फिल्म बनवताना व्यावसायिक दडपणामुळं तडजोडी करायला लागतात. शॉर्टफिल्म बनवून मनासारखं काम करता येतं. ‘कामाचं समाधान’ मिळतं. नवीन काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. प्रस्थापितांनी हे लक्षात घ्यायला हवं की चांगलं काम असलेल्या एखाद्या नवीन मुलाला, त्याच्या शॉर्टफिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर माध्यमे त्याची दखल घेतात. त्याला त्याच्या पुढच्या फिल्मसाठी निर्माता मिळणं सोपं होऊ शकतं.
कोणी काय करावं आपण सांगू शकत नाही पण दिग्दर्शक हा कलाकार असतो, कलाकार सामाजिक बांधिलकीनं वागूच शकतो. बाकीच्यांना आपण सांगणारच नाही.
ठराविक लोकांची मक्तेदारी असलेलं तंत्रज्ञान आता सर्वसामान्य माणसाच्या हातात आलंय. इंटरनेटमुळं आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधू शकतो. आपलं काम कुठंही पोहोचवू शकतो. मार्गदर्शन घेऊ शकतो. सर्वसामान्य माणसाला ‘बसल्या जागी संधी’ मिळवून देणारा हा काळ आहे. मग वेळ घेऊन, अभ्यास करून काम सादर केलं तर नाही का चालणार? कसली घाई आहे? तुम्ही नाही केलं तर जगाचं काही अडणार आहे का? तुम्ही जे मांडणार आहात त्याने जगात काही बदल होणार आहे का? तुमच्यापैकीच काहीजण जाऊन उद्या सिनेमा बनवतील म्हणून तुमचा पाया चांगला हवाय.
पुरस्कार मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं आणि सोशल मिडीयावर वाहवा मिळवणं हे उद्देश असता नयेत. तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला हे सगळं मिळेलच. शेवटी जे खरं आहे ते टिकतं आणि चमकतंच. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांच्या ताब्यात असलेली इंडस्ट्री तुम्ही गाजवू शकता, मनापासून काम केलंत तरच.
सगळ्यात महत्वाची गोष्ट – गोष्ट!
काही गोष्टी या वाचायला चांगल्या असतात. वाचून मजा येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची फिल्म बनतेच असं नाही. शॉर्टफिल्म करायची म्हणजे काहीतरी सामाजिक मांडायचं असं काही डोक्यात असेल तर बाजूला काढा. सामाजिक समस्या हीच एक समस्या झाली आहे. शॉर्टफिल्म ही एखाद्या कवितेसारखी, ललित लेखासारखी छान हळूवार सुद्धा असू शकते. आहेत. सामाजिक समस्या मांडायची आहे मग चला शॉर्टफिल्म करू किंवा शॉर्टफिल्म करायची आहे तर चला सामाजिक समस्या मांडू. आपल्यावर असलेले सामाजिक दडपण बाजूला ठेऊन विचार करायला हवा. सामाजिक समस्या मांडायला विरोध बिलकुल नाहीय. पण हे माध्यम आधी समजून घ्या. त्याची ताकद समजून घ्या. मग हवं ते मांडा. ताकदीनं मांडा!
अमुकचं प्रतिक म्हणून हे वापरलंय.. तमुकचं प्रतिक म्हणून ते वापरलंय. याची गरज नसते. जागतिक सिनेमात तुम्हाला प्रतीकं दिसतात की कथा दिसते? जग २०२० च्या पुढचा सिनेमा बनवत आहे आणि आपण अजून ६० च्या दशकातच अडकून पडलो आहोत. रमलो आहोत! मराठीत बनणारे सिनेमे असतील किंवा साहित्य असेल जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात, अगदी शेजारच्या राज्यात तरी.. भाषेपलीकडं जाऊन पाहिलं, वाचलं जातं का?
अगोदर कथा, कथेची पटकथा करता यायला हवी. प्रतीके वगैरे या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. तुमची शॉर्टफिल्म बघून झाल्यावर प्रेक्षक म्हणत असतील की ‘छान लिहिलेय’ किंवा ‘डायलॉग भारी झालेत!’ तर तुमची शॉर्टफिल्म गंडलेली असू शकते. ही चित्र भाषा आहे. फिल्म मध्ये शब्द, रंग, चित्र, आवाज, संगीत, अवकाश,वेळ अशा सगळ्यांची गंमत असते. फक्त कोरसचं गाणं नसतं. कोरस हा साथीला असतो. सुरते आणि शाहीर यात फरक असतो. तसं फक्त शब्द आणि कॅमेरा झाला की चांगली शॉर्टफिल्म होईल असं नाही.
ज्यांना चांगलं काम करायचं आहे त्यांनी खूप बघितलं पाहिजे.
सर्व दृश्यकला, संगीत, आर्किटेक्चर, कॉस्च्युम, बोलीभाषा, भौगोलिक परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जगात समकालीन काय चाललं आहे, आधीच्या माणसांनी काय काम करून ठेवलं आहे हे बघितलं की मग नम्रता येते. आपण नेमकं कुठं आहोत ते समजतं. ते जितक्या लवकर समजेल तितकं आपल्या प्रगतीसाठी चांगलं आहे.
हे सगळ्याच कलांसाठी लागू आहे. म्हणून किमान तुम्हाला माहिती असायला हवं की जगाच्या तुलनेत तुमचं काम कुठं आहे. तुम्ही जगाला दाखवत असाल तुमचं काम भारी आहे (कधीकधी त्याची गरजही असते) परंतु तुम्हाला माहिती हवं तुमचं काम काय आहे. तरच कामात सुधारणा होणार. आपण हे सगळं वाचत आहात ते कामात सुधारणा व्हावी म्हणून. तुम्हाला सगळं येतंय असं वाटत असेल तर तुमच्याकडून फार मोठ्या कामाची आणि लांब पल्ल्याची अपेक्षा करू शकत नाही. ज्यांना या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाहीय त्यांनी उमेश कुलकर्णीच्या शॉर्टफिल्म बघण्यापासून सुरुवात करावी. चांगलं काय असतं ते समजायला मदत होईल.
ज्यांना खरोखर काही चांगलं मांडायचं आहे अशा लोकांना इतर लोकांपेक्षा जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं. कोणालातरी पुरस्कार मिळाला किंवा कोणाची फिल्म अमुक फेस्टिवलला सिलेक्ट झाली म्हणून आपण डिस्टर्ब होऊन चालत नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाला स्टार्टिंग लाईनला यायला वेगवेगळा वेळ लागतो. तुम्ही कोणत्या भौगोलिक परिसरातून येता, कोणत्या जातीत जन्मता, कोणत्या आर्थिक स्तरातून येता, कोणत्या सांस्कृतिक जडणघडणीतून येता यावरून प्रत्येकाचा सुरुवात करायचा वेळ मागंपुढं होऊ शकतो. पुढारलेल्या घरात जन्मलात तरीही नवीन क्षेत्र स्वीकारताना समस्या असतातच. बऱ्याच जणांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आवड जोपासायची असते. आपल्यात कालच्यापेक्षा आज सुधारणा झालीय का इतकंच बघावं, कोणाशीही तूलना करू नये. जे करायचं आहे ते स्वत:साठी करायला हवं. फिल्म असेल किंवा आणखी काही.
आपण आपल्या आनंदासाठी, आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी केलं पाहिजे. करत रहायला पाहिजे!
एक चित्रपट असतो, एक लघुपट असतो. तसंच एक पूर्ण लांबीची फिल्म असते आणि एक शॉर्टफिल्म असते.
बरेच भिडू बनवतात शॉर्टफिल्म आणि स्वत:ची ओळख ‘फिल्ममेकर’ अशी करून देतात. शॉर्टफिल्म बनवतोय तर शॉर्टफिल्ममेकर म्हणून सांगायला लाज कसली वाटते? शायनिंग जाते की काय?
कितीतरी शॉर्टफिल्म्स आहेत ज्या फक्त मिनिट दोन मिनिटांच्या आहेत पण प्रचंड बजेटच्या आणि पूर्ण लांबीच्या चित्रपटापेक्षा चांगल्या आहेत. त्यांचे परिणाम वर्षानुवर्षे मनावर राहतात. आपण शॉर्टफिल्म बनवली तर सगळीकडे शॉर्टफिल्ममेकर असा स्पष्ट उल्लेख करायला हवा. कोणतीही गोष्ट कमी किंवा खालची नाहीय. माजी आमदार जसा ‘मा. आमदार’ लिहून चालूगिरी करतो तसं हे आहे. हे स्वत:साठी आहे.
आपलं चारित्र्य छोट्या छोट्या गोष्टींनी घडत असतं. चारित्र्य खूप महत्वाची गोष्ट आहे. लघुकथा आणि कादंबरीमध्ये फरक असतो. लेखक लघुकथेला कादंबरी म्हणून सांगतो का? त्यानं जरी सांगितलं तरी लघुकथेला कादंबरी म्हणून मान्यता मिळेल का? Writer आणि Author मध्ये फरक असतो. आपण स्वत:शी आणि आपल्या कामाशी प्रामणिक असायला हवं.
‘मला हे माध्यम हाताळून बघायचं आहे.’ हा दृष्टीकोन चांगला आहे. करून बघावं!
काम करत राहिल्यावर समजलं की आपल्याला जमतंय, आपल्यासाठी हेच माध्यम योग्य आहे. मांडत राहावं. स्वत:ला ग्रेटब्रीट आहोत असे वाटायला लागलो तर जरा बाहेर डोकावून बघावं. किती थक्क करणारी कामे शॉर्टफिल्ममध्ये सुरु आहेत बघावं. जमिनीवर राहून काम करावं. अहंकारी माणूस आणि भ्रमात असलेला माणूस स्वत:च्या कर्माने बुडतो. त्याला शत्रूची गरज नसते.
बरेच भिडू सांगत असतात मी इतका संघर्ष केला, फिल्म करायला ह्यांव केलं अन त्यांव केलं.
पहिली गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण हे स्वत:साठी करत आहोत. दुसरी गोष्ट, हे कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम नाही. आणि तिसरी गोष्ट, संघर्ष आणि स्ट्रगल हे शब्द कशासाठीही वापरून इतके गिळगिळीत झालेत की त्यांचे अर्थ बदलले आहेत. संघर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला, महात्मा जोतीबा – सावित्रीबाईंनी केला. अशा महापुरुषांनी स्वत:चा संसार दावणीला लावून गावाचा उध्दार करायला आयुष्य खर्ची घातलं. फुले दाम्पत्याने गावाच्या मुली शिकाव्या म्हणून प्रसंगी अंगावर शेण झेललं.
आपण हे जे काय करतोय त्यात असा पॉइंट शून्य शून्य शून्य एक टक्का तरी उद्देश आहे का? स्वत:साठी करतोय तर उठसुठ स्ट्रगल स्टोऱ्या कसल्या सांगताय? स्वत:ची स्वप्नं पूर्ण करायला धडपडताय, सरधोपट मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळताय, चांगलं आहे. कामावर फोकस करायला पाहिजे. स्ट्रगलच्या रोमँटीसिझममध्ये रमायला नाही पाहिजे. ते एखाद्या नशेपेक्षा वाईट आहे. स्वत:शी कठोर वागायला हवं.
तुझं काम दाखव! काम चांगलं हवं.. ते तू उपाशी राहून केलंस की भरल्या पोटी केलंस याला अर्थ नाही.. असं स्वत:ला बजावता आलं पाहिजे.
संघर्ष करून केलीय म्हणून कोणतीही गोष्ट महान ठरत नाही. तीची महानता तिच्या दर्जावर ठरते. वास्तवात जगायला पाहिजे. तुझं काम लै भारी, आउटस्टँडिंग आहे म्हणणाऱ्या मित्र परिवारापासून पहिल्यांदा लांब राहायला पाहिजे. कारण त्यांनी सुद्धा जगात किती चांगलं काम आहे हे पाहिलेलं नाही आणि तुम्हीपण !! आणि भावा, समज तुझं काम चांगलं आहे आणि तू खरंच स्ट्रगलही केला आहेस. तर थांब. वाट बघायला शिक! ‘जग ज्याला यश म्हणते’ ते मिळेपर्यंत वाट बघ.
जोपर्यंत ते यश मिळत नाही तोपर्यंत तुझ्या माझ्या स्ट्रगलस्टोरीला काडीचीही किंमत नाही.
आता एक स्टेप पुढे जाऊ. समजा तुमचं काम चांगलं आहे. तुम्ही खरंच चांगल्या शॉर्टफिल्म्स बनवल्या आहेत. आता तुम्हाला फिल्म बनवायची आहे. तर शॉर्टफिल्म बनवणं आणि फिल्म बनवणं यात फक्त जमीन अस्मानचा फरक आहे. बाकी काही नाही. फिल्म ही जाता जाता होणारी गोष्ट नाही. फिल्म बनवणं ही पूर्ण वेगळी प्रोसेस आहे. नोकरी व्यवसाय सांभाळत होणारी गोष्ट नाही. फक्त पैसे आहेत किंवा फक्त क्रिएटीविटी आहे म्हणूनही होणारी गोष्ट नाही. नाहीतर गावोगावी चित्रपट दिग्दर्शक नसते का तयार झाले? तुमच्या नजरेत आहे का कोणी पार्टटाईम सिनेमा बनवणारा? किती फिल्म बनवल्यात त्याने?
फेसबुकवरच्या कोणत्याही, अगदी मोठ्या नावाजलेल्या लेखकानंही एखाद्या फिल्म/शॉर्टफिल्मची वारेमाप स्तुती केली तर ती खरी मानू नका.
हितसंबंध असू शकतात. आणि मुळात साहित्यातलं कळतं म्हणजे कलेच्या प्रत्येक फॉर्ममधलं कळतं असा बऱ्याच लोकांचा समज आहे. सिनेमा ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. त्याचा साहित्यापेक्षा खूप मोठा अभ्यास आहे. पंधरावीस वर्षं घालवल्यावर एखादा कोपरासुद्धा बघून झालेला नाही अशी माझी फिलिंग आहे.
मी ज्यांना चांगले साहित्यिक समजत होतो त्यांनी ज्या ज्या सामान्य मराठी सिनेमांचं कौतुक केलं ते बघून मला त्यांचा साहित्यिक म्हणूनही आदर वाटायचा बंद झाला आहे.
हे लोक जागतिक सिनेमांचे संदर्भ देऊन आपल्याकडच्या सामान्य दर्जाच्या सिनेमाची वाहवा करतात. त्यांना या सिनेमातही तीच निर्मितीमूल्यं दिसतात, दिग्दर्शकाला न दिसलेली प्रतीकंसुद्धा त्यांना दिसतात. सगळेच जेव्हा एखाद्या सामान्य कलाकृतीचं (ज्याला कलाकृती म्हणणंच चूक असतं. तसंही सिनेमात कला कमी आणि कौशल्य जास्त असतं.) वारेमाप कौतुक करत सुटतात, तेव्हा आपल्याला स्वत:च्या समजेबद्दलच शंका येऊ शकते. अशावेळी यांनी ग्रेट ठरवलेली फिल्म जागतिक स्तरावर काही कामगिरी करून आलीय का ते गुगल करून बघावं. हा सूर्य हा जयद्रथ.
जसं शॉर्टफिल्म बनवणाऱ्यांचं पेव फुटलं आहे तशीच फेसबुकवर चित्रपट समीक्षकांचीही जत्रा भरली आहे.
दोन महिन्यांचा फिल्म अप्रिसीएशन कोर्स करून जागतिक सिनेमावर अधिकारवाणीनं भाष्य करणारी एक वेगळीच जमात फेसबुकवर उदयास आली आहे. यांच्यामुळं चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून वर्षानुवर्षे सिनेमाचा अभ्यास करून लिहिणारेही वैतागले आहेत. तुम्हीही अशा अर्ध्या हळकुंडांमुळे संभ्रमित झालेले असाल तर सरळ लॉगआउट व्हा आणि खऱ्या जगात काय चाललं आहे बघा. तुम्हाला जे मांडावं वाटतंय त्याचा अभ्यास करा. लिहा! लिहिता येत नसेल तर लिहून घ्या.
सिनेमा हा एकट्याने करायचा विषय नाही. कोणतंही डीपार्टमेंट कमी महत्वाचं नसतं. आपल्याकडं बऱ्याच सिनेमात कॉस्च्युमसारख्या महत्वाच्या डीपार्टमेंटला बजेट ठेवलेलं नसतं, ना की त्यासाठी चांगला अनुभवी माणूस घेतलेला असतो. मित्रमित्र मिळून जरी शॉर्टफिल्म बनवत असाल तरीही सर्व विभागांना वेगळा माणूस असणं, रिसर्चपासून सर्व गोष्टींमध्ये दर्जासाठी आग्रही राहणं गरजेचं आहे. पटकथा खूप महत्वाची असते. पटकथा वाचताना तुम्हाला जर मजा आली तरच तुमची फिल्म बघणाऱ्या माणसाला मजा येणार आहे. ‘नाही ते ॲक्टिंग मध्ये येणार ना?’ असं होत नसतं. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? चांगलं लिहिलेलं नसेल तर मोठ्यात मोठा नटसुद्धा काहीही करू शकत नाही.
चांगलं लिहिलेलं असेल तर अगदी कमी खर्चात केलेल्या फिल्मसुद्धा चांगला परिणाम करून जातात. आणि सगळ्यात महत्वाचं ‘चांगलं लिहिलेलं’ म्हणजे चांगले डायलॉग नव्हेत. मग काय? शोधा! सगळंच आयतं मिळालं तर मजा राहील का आयुष्यात?
- लेखक: सचिन बाळासाहेब सूर्यवंशी
- संपर्क : sooryawanshi@gmail.com
परखड पण अगदी योग्य लिहिलंयस दादा।।।।
आपली कधी भेट झालेली नाही पण तुझ्या बद्दल खूप ऐकलेलं आहे….
तुला भेटायची इच्छा आहे….
कधी कोल्हापूर ला आलास तर नक्की भेटू…..
……अनिरुद्ध भागवत, इचलकरंजी