पुढं जाऊन क्रिकेटचा देव ठरलेलं पोरगं, त्यादिवशी शून्यावर आऊट झालेलं

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, दिवस २ एप्रिल २०११. बॉलर्सची भन्नाट कामगिरी, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंगचा धडाका या सगळ्यामुळं भारतानं वर्ल्डकप जिंकला. १९८३ नंतर हुलकावणी देत असलेलं स्वप्न २८ वर्षांनी मायदेशात पूर्ण झालं. सगळ्या ग्राऊंडमध्ये जल्लोष सुरू झाला. विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू एक-एक करुन मेडल घ्यायला पुढे येत होते.

तेवढ्यात नाव उच्चारलं गेलं, सचिन तेंडुलकर. वानखेडेमध्ये उपस्थित असलेली माणसं सोडा, निर्जीव खुर्च्यांच्या अंगावरही काटा आला असेल… असा जल्लोष वानखेडे स्टेडियममध्ये सुरू झाला. जमलेली काही हजार लोक एका सुरात ओरडू लागली, सचिन… सचिन! सचिन… सचिन!

सचिन रमेश तेंडुलकर या एका नावात भारतीय क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास सामावलेला आहे. आता सचिनचं नाव घेतलं की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक आठवणी येतात. २०११ ची वर्ल्डकप फायनल, २००३ च्या वर्ल्डकपमध्ये केलेला धुव्वा, अख्तरला मारलेला कडक सिक्स, कव्हर ड्राईव्ह न मारता केलेलं द्विशतक, जितक्या लिहाव्या तितक्या आठवणी कमीच.

पण खरं सांगायचं, तर सचिनच्या आठवणींचा कप्पा उघडला की, वयाच्या १६ व्या वर्षी कुरळ्या केसांचं घरटं आणि निरागस चेहरा घेऊन पाकिस्तानच्या तोफखान्यासमोर उभा राहणारा कोवळा सचिनच आठवतो. त्यानं १५ नोव्हेंबर १९८९ ला कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण केलं. वकार यूनुस आणि वसीम अक्रम या सगळ्या जगात दहशत निर्माण करणाऱ्या पेस बॉलर्सच्या आगीसमोर या कोवळ्या सचिनचा निभाव कसा लागणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पार पाकिस्तान दौऱ्यासाठी सचिनची निवड का करण्यात आली? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळं राजसिंह डूंगरपुर यांना टीकांचे बाणही सहन करावे लागले होते.

पहिल्याच मॅचमध्ये सचिनचं नाक फुटलं, १६ वर्षाचं पोरगं नाकात रक्त येत असूनही मैदानात उभं राहिलं. भले १५ रन्स करुन आऊट झालं असेल, पण हिंमत दाखवली हे खरं. पुढचा महिनाभर त्यानं कसोटी सिरीज गाजवली. भले रनांची टांकसाळ उघडली नसेल, पण सगळ्या जगाला कळून चुकलं होतं… पोरात दम आहे.

कसोटी सिरीज संपली, ती सचिनच्या सियालकोटमधल्या नाद बॅटिंगचं कोंदण घेऊनच. आता सगळ्या जगाला बघायचं होतं, की हे पोरगं वनडे क्रिकेटमध्ये काय दंगा करतंय. कसोटी सिरीज संपल्यानंतर लगेचच वनडे सिरीज होती. १६ डिसेंबरला पहिली वनडे मॅच होती. पण पावसानं धुव्वा केला आणि मॅच काय झालीच नाही.

मग दिवस उगवला दुसऱ्या वनडेचा, १८ डिसेंबर १९८९. त्याही दिवशी पावसाचा कल्ला सुरू होताच, पाऊस आणि खराब सूर्यप्रकाशामुळं सामना खेळवण्यात आला प्रत्येकी १६ ओव्हर्सचा. आता तो जमाना काय टी२० क्रिकेटचा नव्हता, त्यामुळं लय रन होणार नाहीत, याची खात्री असली तरी कायतरी वाढीव नक्की होईल असा सगळ्यांचा अंदाज होता.

झालंही तसंच. भारताच्या बॉलर्सनं पाकिस्तानच्या बॅटिंग लाईनअपचा पार बाजार उठवला. एक सईद अन्वरचा अपवाद सोडला, तर त्यांच्या एकाही बॅटरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांचा डाव फक्त ८७ रन्सवरच मर्यादित राहिला.

भारताची बॅटिंग पण अशी काय लय फॉर्ममध्ये नव्हती, पण ८८ रन्स म्हणजे काय लोड घ्यायचा विषय नव्हता. पण झालं भलतंच, बोर्डावर ३४ रन्स लावेपर्यंत भारताचे तीन कार्यकर्ते पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसले होते. मग ग्राऊंडवर आला सचिन तेंडुलकर. सगळ्यांच्या नजर त्या कोवळ्या पोरावर खिळल्या होत्या.

त्याच्या इनिंगचा दुसराच बॉल. बॉलर होता वकार युनूस, सचिननं त्याच्या इनस्विंगरला बॅट लावली आणि वसीम अक्रमनं सोपा कॅच घेतला आणि सचिन तेंडुलकर बोर्डावर एक रन लावायच्या आधीच आऊट झाला. तिथून पुढं भारताच्या बॅटर्सनं पॅव्हेलियनला जायची रांग लावली. फक्त ८८ रन्सचा पाठलाग करणाऱ्या भारताला फक्त ८० रन्स करता आले.

सचिन फक्त शून्यावर आऊट झाला, याची मजबूत चर्चा रंगू लागली. पोराचा तुक्का लागला होता की काय असं सगळे बोलू लागले. कारण पुढच्या दोन मॅचेसमध्ये सचिनला संधीच मिळाली नाही. पुढं टीमचा कॅप्टन बदलला, मोहम्मद अझरुद्दीननं सचिनला पुन्हा एकदा संधी दिली आणि सचिननं त्या संधीचं सोनं केलं.

सचिन त्या पहिल्या अपयशाला धरून बसला असता, तर क्रिकेटचा देव कधीच झाला नसता. १८ डिसेंबर १९८९ ला जे झालं ती फक्त एक खराब सुरुवात होती, आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास होता. आजही सचिनच्या विक्रमांचे आकडे पाहिले, की चटकन विश्वास बसत नाही… वनडे क्रिकेटमध्ये हे पोरगं पहिल्याच मॅचमध्ये शून्यावर आऊट झालेलं.

सचिन तेंडुलकरचंच एक वाक्य आहे, Don’t stop chasing your dreams, because dreams do come true!

हे ही वाच भिडू:

Web Title: Sachin Tendulkar odi debut : this day master blaster sachin tendulkar made his odi debut against Pakistan in 1989

Leave A Reply

Your email address will not be published.