मॅकग्रा इतका खडूस बॉलर होता, की खुद्द सचिननं त्याला शिवी घातली होती…

नाईंटीजच्या काळात बालपण घालवलेल्या पोरांची एक गोष्ट भारी होती, हातात मोबाईल नसले, तरी मनोरंजन करायला इतक्या अफवा होत्या की बालपण लय भारी झालं. अंडरटेकर सात वेळा मरुन जिवंत झालाय, धोनी रोज चार लिटर दूध पितो, पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे आणि ग्लेन मॅकग्रा १२ टाईप्सचे स्विंग टाकतो.

हे मॅकग्रा प्रकरण फार डेंजर होतं… कुणी म्हणायचं तो सहाही बॉल्स वेगळे टाकू शकतो, कुणाच्या मते त्याच्याकडे १२ स्विंग होते आणि कुणाच्या मते सचिनला मॅकग्राची बॉलिंग अजिबात झेपत नाही, सचिन मॅकग्राला घाबरतो. आता कट्टर सचिन फॅन्सना ‘सचिन कुणालातरी घाबरतो’ हे पचवणंच लई जड होतं.

एक मात्र होतं जेव्हा हे दोघं समोरासमोर यायचे, तेव्हा बघायला खतरनाक मजा यायची.

ही त्या दोघांच्या लढाईची गोष्ट आहे, पण गोष्टीला धाडकन सुरुवात केली तर क्लायमॅक्स वाचायला तुम्हाला मजा नाय येणार, त्यामुळं थोडीशी बॅकग्राऊंड देतो. ऑस्ट्रेलियन टीम कितीही भारी असली, तरी सचिन तेंडुलकर त्यांचा बाप होता. सचिन फॉर्मात असला की तो भल्याभल्यांना ऐकायचा नाही, त्यात ब्रेट ली, वॉर्न, गिलेस्पी आणि कधीकधी मॅकग्राही भरडून निघायचा.

दुसऱ्या बाजूला मॅकग्रा म्हणजे अचूकता होती, त्याचा स्पीड फार डेडली नव्हता, पण लाईन आणि लेन्थ इतकी अचूक असायची की फलंदाज बधीर व्हायचा. त्यात जर मॅकग्रा कोणताही आदर्श बॉलर करतो त्याप्रमाणं टॉप ऑफ द ऑफ स्टम्पचा वेध घ्यायला लागला, तर समोरच्या फलंदाजांची आऊट व्हायची रांग लागायची रांग. मग समोर भारत असला की त्यात सचिनचा पण नंबर लागायचा.

दोन्ही कार्यकर्ते लई खुंखार आणि त्यांच्यातली ही लढाई पण तेवढीच भारी…

साल होतं २०००, आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीची पहिली क्वार्टर फायनल… भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. भारताची पहिली बॅटिंग, पहिल्या ओव्हरचा चौथाच बॉल. मॅकग्राचा बॉल सचिनच्या मांडीवर आणि मग हातावर आदळला. त्या क्षणी मॅकग्रा जे हसला याचं वर्णन जगातला कुठलाच लेखक करु शकत नाय. त्याच्या हास्यात दया होती आणि जिंकल्याची फीलिंग. सचिननं आधी दाखवलं नाय, पण नंतर मात्र तो कोपरा चोळू लागला. मॅकग्राचा घाव बरोबर बसला होता.

हे असं काही झाल्यावर मॅकग्राला आणखी चेव आला, पण सचिनच्या डोक्यात प्लॅन पक्का होता. याला आणखी चिडू द्यायचं म्हणजे याची एकाग्रता तुटेल आणि बॉलिंग बिघडेल. त्यानं तसं गांगुलीला बोलून पण दाखवलं. तिसऱ्या ओव्हरला मॅकग्रा आला आणि सचिननी पहिलाच बॉल घुमवला, नेमका टॉप एज लागला, पण बॉल इतका जोरात होता की डायरेक्ट सिक्स गेला. आता मॅकग्रा पण खवळला आणि त्यानं पुढचे पाचही बॉल डॉट टाकले. ज्या प्रकारे दोघांची नजरानजर होत होती, त्यावरुन कुणालाही अंदाज लागला असता की आज विषय खोल आहे.

पाचव्या ओव्हरचा पहिलाच बॉल सचिन मिस झाला, पण मॅकग्राला कायतरी बोलला. या गड्यानं पुढचा बॉल आणखी भारी टाकला, सचिनला झेपलाच नाही. असं वाटत होतं आज मॅकग्रा वरचढ ठरतोय. पण ऐकेल टॉप सचिन कसला? पुढच्या बॉलवर साहेबांनी स्टेपआऊट केलं, आणि मॅकग्राच्या डोक्यावरून सिक्स, त्याच्या पुढचा बॉल डोक्यावरुन फोर. सचिनचे डोळे आणि बॅट दोन्हीकडे आग दिसत होती. मॅकग्रानं शेवटचा बॉल आणखी चवताळून टाकला… सचिननं तो सोडून दिला.

मॅकग्रानं त्याच्याकडे बघितलं, तर सचिननं त्याला शिवी घातली. सचिनच्या ओठांची हालचाल ‘फ***’ अशी काही झाली आणि मॅकग्रा आणखीनच पेटला. सचिन सनासना ३८ मारुन आऊट झाला आणि मॅकग्राला सगळ्या मॅचमध्ये एकपण विकेट मिळाली नाही. त्याची लाईन आणि लेंथ हलवायला खुद्द सचिनलाही शिवी द्यावी लागली होती… इतका मॅकग्रा भारी होता.

त्याच्याकडे १२ प्रकारचे स्विंग नसतीलही, पण त्याच्या इतका अचूक बॉलर आजवर झाला नाही, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.